मन्रो, हेक्टर ह्यू : (१८ डिसेंबर १८७०-१३ नोव्हेंबर १९१६). विख्यात इंग्रजी विनोदकार. ब्रहादेशातील अक्याब येथे जन्मला. इंग्लंडमधील एक्सामाउथ आणि वेडफोर्ड येथील शाळांतून त्याने शिक्षण घेतले. १८९३ मध्ये ब्रहादेशातील पोलीसखात्यात त्याने नोकरी धरली, परंतु लवकरच तो पत्रकारीकडे वळला. १८९४ पासून इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर गॅझेट ह्या नियतकालिकातून ‘साफी’ ह्या टोपणनावाने तो उपरोधप्रचुर राजकीय लेखन करू लागला. हे लेखन पुढे वेस्टमिन्स्टर अँलिस (१९०२) ह्या नावाने ग्रंथरूप झाले. अँलिस इन वंडरलँड लिहिणारा प्रसिद्ध इंग्रज लेखक लुई कॅरोल ह्याचा प्रभाव मन्रोच्या ह्या लेखनावर जाणवतो. १९०२ ते १९०८ मध्ये द मॉर्निग पोस्ट ह्या वृत्तपत्राचा परदेशीय वार्ताहर म्हणून फ्रान्स, रशिया आणि बाल्कन देशांचा त्याने प्रवास केला. १९०८ साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. खुसखुशीत कथा, शब्दचित्रे असे लेखन त्याने केले. पहिल्या महायुद्धात एक सैनिक म्हणून तो लष्करात शिरला व रणभूमीवरच त्याला मरण आले.
खोचक विनोद, तसेच कल्पकतापुर्ण उपरोध हे मन्रोच्या कथांचे लक्षणीय वैशिष्टय होय. रेजिनाल्ड (१९०४), रेजिनाल्ड इनरशिया (१९१०), द कॉनिकल्स ऑफ क्लोव्हिस (१९१२), बीस्ट्स अँड सुपरबीस्ट्स (१९१४) आणि द स्क्वेअर एग (१९२४) हे त्याचे उल्लेखनीय असे काही कथासंग्रह होत. द अनबेअरेबल बॅसिग्टन (१९१२) आणि व्हेन विल्यम केम (१९१४) ह्या त्याच्या कादंबर्या. द राइज ऑफ द रशियन एंपायर (१९००) हा भारदस्त इतिहासग्रंथही त्याने लिहिला आहे.
देसाई, म. ग.