मनमाड: नासिक जिल्ह्याच्या मनमाड तालुक्यातील मध्य रेल्वे वरील एक प्रस्थानक लोकसंख्या ५१,४३२ (१९८१) . हे नासिकच्या ईशान्येस सु. ७२ किमी. अंतरावर वसले आहे. याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. पूर्वी हे विंचुरकर घराण्याच्या ताब्यात होते. लोहमार्गाचे एक महत्वाचे प्रस्थानक म्हणूनच यास विशेष महत्व असून येथून मुंबई, पुणे , जळगाव इ. शहरांना रूंदमापी आणि औरंगाबादला मध्यममापी लोहमार्ग जातात. राज्य परिवहन महामंडळाचे हे जिल्ह्यातील एक महत्वाचे केंद्र आहे. वाहतुकीच्या विशेषतः लोहमार्गाच्या, सुविधांमुळे याचा विकास होऊन व्यापारी दृष्ट्या हे महत्वाचे ठिकाण बनले आहे. येथे रेल्वे कर्मचाऱ्याकरिता निवासव्यवस्था ,तालुक्याचे ठिकाण या अनुषांगाने येणारी कार्यालये आणि नागरी सुविधा, कापूस वटणगिरण्या, हाडांची भुकटी करण्याच्या दोन गिरण्या इ. आहेत. मनमाडच्या दक्षिणेला ⇨अंकाई-टंकाई हे ऐतिहासिक स्थान आहे.

संकपाळ, ज. बा.