मधमाशीपालन : ध्रुवीय प्रदेश सोडून सांप्रत मधमाश्या जगात सर्वत्र आढळतात. इ. स. सु. पंधराव्या शतकापूर्वी मात्र त्या फक्त आशिया, यूरोप व आफ्रिका या खंडांतच मर्यादित होत्या. आदिमानवाच्या कालापूर्वी या भूप्रदेशात मधमाश्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) होत होता. अतिप्राचीन काळापासून मधमाश्यांच्या पोळ्यांत गोड मध मिळतो, हे मानवास ज्ञात होते. साखरेचा शोध लागण्यापूर्वी खाद्यपदार्थांस गोडी आणण्यासाठी मधाचा वापर होत असे. मानव मध काढीत आहे, असे दर्शविणारे रंगीत चित्र स्पेनमध्ये एका डोंगरातील दगडावर सापडले आहे. हे चित्र इ. स. पु. ७,००० वर्षे या काळातील असावे, असा अंदाज आहे.

इतिहास : अतिप्राचीन काळी  पोळ्यातून जमा करण्याची  पध्दत फार ओबडधोबड होती. वृक्षाच्या ढोलीत असलेली पोळी वृक्ष तोडून हस्तगत केली जात व ती पिळून त्यांतील मध काढला जात असे. या कृतीत पोळ्याची व त्यात असलेल्या अंडी, डिंभ (अळ्या) इत्यादींची हानी होत असे. पोळे हस्तगत करण्यापूर्वी मधमाश्या मारण्यात येत असत.

इ. स. पू. ५,००० वर्षापूर्वी मधमाश्यांना पोळे तयार करता यावे म्हणून नळ्यांचा उपयोग करण्यात येऊ लागला. या नळ्या मातीच्या, लाकडांच्या सालीच्या किंवा लाकडांचे ओंडके पोखरून केलेल्या असत. मधमाश्यांना प्रलोभन म्हणून या नळ्यांवर गोड पदार्थ शिंपडण्यात येई. या नळ्यांकडे आकर्षित झालेल्या माश्या इतर माश्यांना सूचना देत व यथाकाळ मोठ्या संख्येने या नळीत मधमाश्या जमत व पोळे तयार करीत. ईजिप्तमध्ये नाईल नदीतील मातीपासून तयार केलेल्या अशा नळ्यांचे अवशेष आढळून येतात. या नळ्यांत मधाचा भरपूर साठा झाला आहे असे आढळले म्हणजे धूर करून किंवा अन्य प्रकारे मधमाश्या मारून किंवा त्यांना हाकलवून आतील मध गोळा केला जात असे आणि रिकाम्या नळ्या पुन्हा मधमाश्यांच्या उपयोगाकरिता योग्य जागी ठेवल्या जात असत.

कृषी व्यवसायात जसजशी प्रगती झाली तसतशी नवी साधने अस्तित्वात आली. नळ्यांऐवजी गवताच्या विणलेल्या करंड्या वापरात आल्या. या करंड्या बुडाशी रूंद असून वर निमुळत्या होत गेलेल्या असत. या करंडीचे तोंड म्हणजे लहान भोक असे व त्यातून मधमाश्यांची ये-जा चालू असे. सर्वसाधारणपणे या करंडीचा आकार घंटीसारखा असे. अशा करंड्या इ. स. पू. ३,००० ते २,००० या काळात अस्तित्वात असाव्यात. या करंडीत मध जमला की, मधमाश्यांस मारून मध व मेण जमा करण्यात येत असे. याही प्रकारात मधमाश्यांचा नाश अटळ होता. अशी  पोळी यूरोप, ईजिप्त इ. प्रदेशांत अस्तित्वात होती. मधमाश्यांस संरक्षण देऊन त्यांच्याकडून मध व मेण तयार करवून घेणे एवढाच हेतू या तर्‍हेच्या मधमाशीपालनामागे होता. त्या वेळी मधमाश्यांसंबंधी विशेष माहिती उपलब्ध नव्हती. या माश्यांच्या समूहाचा मुख्य नर की मादी हेही ज्ञात नव्हते कामकरी माश्याचे लिंग कोणते याविषयीही माहिती नव्हती. मधमाश्यांच्या ⇨ परागणातील (परागसिंचनातील) महत्त्वाविषयी तर संपूर्ण अज्ञान होते.

पोळ्याचा नाश करून जमा केलेला मध जर न गाळता खाण्यात आला, तर त्यात असलेल्या फण्यांच्या तुकड्यांत नांगी असलेली मधमाशी, मधमाशीची अंडी किंवा डिंभ हे असण्याचा संभव असे व हे पोटात जाण्याची शक्यता असे. कधीकधी परागकणांचे गोळेही मधात तरंगताना आढळत. मधमाश्यांचा व पोळ्यांचा नाश टाळता यावा या हेतूने ज्या गवताच्या करंड्या पोळे बांधण्यास उपलब्ध करून देण्यात येत असत, त्यांत दांडे लावण्याची व्यवस्था करण्यात आली. यात हेतू हाच की, पोळे दांडीस चिकटविले जावे म्हणजे इतर सर्व पोळ्यांचा नाश न करता दांड्यास चिकटलेली फणी तेवढी काढता येईल. इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या सुमारास एका पोळ्यातून राणीमाशी नसलेल्या फण्या विलग करण्यात आल्या व पुढे असे आढळून आले की, यात कामकरी माश्यांनी राणीमाशी निर्माण केली व परिणामी एका पोळ्यापासून दोन पोळी अस्तित्वात आली.

गवताच्या करंड्या किंवा लहान गाडगी-मडकी यांऐवजी चौकोनी  लाकडी पेट्या ठेवल्या व त्यांत आडवे दांडे बसविले, तर मधमाश्यांस पोळे करण्यास अधिक सोयीस्कर होईल, हे गृहीत धरून लाकडी पेट्यांच्या अवलंब करण्यात आला पण यात प्रमाणीकरण नव्हते. काही पेट्या अष्टकोनी, काही चौरस, काही चौकोनी तर काही गोल अशा निरनिराळ्या आकारांच्या पेट्या अस्तित्वात आल्या. काही पेट्यांस आतील निरीक्षण करता यावे म्हणून काचा लावण्यात आल्या.

इ. स. १५०० ते १८५१ या काळात या क्षेत्रात बरीच प्रगती झाली. मधमाशीच्या शरीराची रचना व तिचे जीवनचक्र यांविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली. मधमाशीपालनास लागणारी साधने व तंत्र यांसंबंधी काही सुधारणा सुचविणारे लेख प्रसिध्द झाले. याच काळात मधमाश्यांचा प्रसार जुन्या जगातून म्हणजे आशिया-यूरोप-आफ्रिका या खंडांतून नव्या जगात म्हणजे उत्तर व दक्षिण अमेरिका, तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत झाला. मधमाश्यांच्या समूहात मुख्य मादी असते व तिला राणीमाशी म्हणतात, हे वर्णन १५८६ साली स्पेनमधील एल्. एम्. द टॉरेस या शास्रज्ञांनी प्रसिध्द केले. १६०९ मध्ये या समूहात नरही असतात हे इंग्‍लंडमधील चार्ल्स बटलर या शास्त्रज्ञांनी दाखविले. १६३७ मध्ये कामकरी माश्या या माद्या असतात हे आर्. रेमनंट यांनी दाखविले. ए. जान्स्का यांनी १७७१ मध्ये राणीमाशी व नर यांच्या मीलनातील प्रमुख बाबींचे वर्णन करणारा एक वृत्तांत प्रसिध्द केला. जर्मनीतील एच. सी. हॉर्नवोस्टेल यांनी १७४४ मध्ये मेणाची उत्पत्ती मधमाश्यांपासून होते हे सिध्द केले. आर्थर डॉब्स यांनी मधमाश्या एका वेळी एकाच फुलातील परागकण जमा करतात याविषयी  माहिती प्रसिध्द केली आणि तसे नसते, तर अनर्थकारी संकरण उद्‍भवेल असे त्यांनी सुचविले. स्वित्झर्लंडमधील अंध मधमाशीपालक फ्रांस्वा यूबेअर यांनी आपली मधमाशीवरील निरीक्षणे प्रसिध्द केल्यानंतर वर्षभराने फुलांच्या फलनक्रियेतील मधमाश्यांचे कार्य सी. के. श्प्रेंगेल यांनी १७९३ मध्ये स्पष्टपणे प्रस्थापित केले. यामुळे आधुनिक मधमाशीपालनाशास्त्राचा पाया योग्य प्रकारे घातला गेला.

याच काळात मधमाश्यांना न मारता मध कसा गोळा करता येईल, यावरही विचार सुरू झाला. झाडाच्या ढोलीतील मोठ्या पोळ्याचा मध असलेला खालचा भाग कापून त्यातून मध काढला व ज्यात अंडी व डिंभ असतात तो वरचा भाग तसाच ठेवला, तरपोळ्याची व मधमाश्यांची हानी होत नाही, असे दिसून आले. मधमाश्यांना पोळे बांधण्यास लाकडी पेट्या (मधुपेट्या) वापरण्यात आल्या. या पेट्यांत फण्या चिकटविणे सोपे व्हावे म्हणून आडवे दांडे बसविण्यात आले. या सुधारणा केल्या, तरी मधमाश्या आपल्या फण्या पेटीस चिकटवीत असत व त्यामुळे कापल्याशिवाय याफण्या बाहेर काढता येत नसत.

याच काळात मधमाश्यांचा प्रसार सर्व जगभर झाला. १५३० च्या सुमारास पोर्तुगालमधून मधमाश्यांचे पोळे ब्राझीलला नेले गेले. याच सुमारास दक्षिण, मध्य व उत्तर अमेरिकेतही मधमाश्यांची पोळी नेली गेली. ऑस्ट्रेलियात मधमाश्यांच्या पोळ्यांचा प्रवेश सिडनी येथे १८२२ साली झाला, तर न्यूझीलंडमध्ये १८४२ साली झाला. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जरी  मधमाश्या आधी  आल्या असल्या, तरी कॅलिफोर्नियात म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर त्यांचा प्रसार होण्यास १८५० हे साल उजाडले. त्यानंतरच्या एक-दीड शतकात त्यांचा प्रसार आता जगात सर्वत्र झाला आहे. सायबीरियीच्या विस्तीर्ण प्रदेशात मधमाश्यांचे आगमन अगदी अलीकडे म्हणजे विसाव्या शतकात झाले.

इ. स. १८५१ नंतरच्या काळात मधमाशीपालनात खूपच सुधारणा झाली. योग्य अशा मधुपेट्यांच्या अभावी मधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होत नव्हते. यावर विचार करून एल्. एल्. लँगस्ट्रॉथ या अमेरिकेतील धर्मगुरूंनी आपली मधुपेटीची योजना पुढे मांडली. पूर्वीच्या मधुपेट्यांतील दांडे किंवा चौकटी हलविता येत नसत कारण मधमाश्या स्वत:च्या मेणग्रंथीतून मेण निर्माण करून त्याने किंवा बाहेरून जमा करून आणलेल्या प्रोपोलिस या चिकट पदार्थाने फण्या मधुपेटीच्या आतील बाजूस चिकटवीत असत. यामुळे मध जमा करण्याच्या वेळी पोळे कापून काढावे लागत असे व त्यात पोळ्याचा, त्यातील अंड्यांचा व अळ्यांचा नाश होण्याचा संभव असे. लँगस्ट्रॉथ यांनी या चौकटीत व पेटीच्या वरील झाकण्याच्या व बाजूच्या फळ्यांत योग्य अंतर ठेवले . त्यामुळे मधमाश्यांना पोळी चिकटविता येईनात व चौकटी एकमेकींपासून दूर राहिल्यामुळे त्या हलविणे सोपे झाले. इतर फण्या न दुखावता एकच फणी असलेली चौकट बाहेर काढता येऊ लागली. पेटीतही मधमाश्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली. लँगस्ट्रॉथ यांनी सुचविलेल्या मधुपेटीच्या आराखड्यात अनुभवानुसार थोड्याफार सुधारणा करण्यात आल्या व मोजमापांचे प्रमाणीकरण करण्यात आले. यामुळे या पेट्या तयार करणाऱ्या उद्योजकांनाही उत्पादन करणे सुलभ व फायदेशीर झाले. या पेटीचा आराखडा निरनिराळे भाग व त्यांची सर्वसाधारण मापे पुढे दिली आहेत. लँगस्ट्रॉथ हे जरी या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक मानले गेले असले, तरी त्यांच्या काळापेक्षा आता किती तरी जास्त माहिती उपलब्ध झाली आहे. जे. मेरिंग, एम्. क्वीनबी, सी. सी. मिलर इत्यादींचे या क्षेत्रातील काम महत्त्वाचे आहे. फ्रांझ फोन हरूश्का यांनी १८६५ मध्ये मध-उत्सर्जक यंत्र [भिन्न घनतेच्या व एकमेकांत न मिळणाऱ्या द्रवांच्या मिश्रणातील घटक अथवा द्रवात मिसळलेले घन पदार्थ त्यातून वेगळे काढणारे केंद्रोत्सारक यंत्र; ⟶ केंद्रोत्सारण] तयार केले. यामुळे फणीचा नाश न करता जास्तीत जास्त मधाचे उत्पादन करणे व चौकटीतील फणीचा पुन:पुन्हा उपयोग करणे शक्य झाले.

अमेरिकन बी जर्नल, ग्‍लिनिंग्‍ज इन बी कल्चर, बी जर्नल ऑफ एपिकल्वचर रिसर्च, बी वर्ल्ड, कॅनेडियन बी जर्नल, ऑस्ट्रेलियन बी जर्नल, वगैरे निरनिराळ्या नियतकालिकांत मधमाशीपालन आणि संबंधित विषयांवरील वार्तापत्रे, अतांत्रिक अहवाल, तांत्रिक निबंध इ. अद्ययावत माहिती प्रसिध्द करण्यात येते.

महत्त्व : परागणातील मधमाशीचे स्थान महत्त्वाचे आहे, हे अलीकडील काळात सर्वांना मान्य झाले आहे. मध व मेण यांच्या उत्पादनापेक्षा कृषिक्षेत्रात परागण महत्त्वाचे आहे. परागण करणाऱ्या कीटकांच्या काही जाती कीटकनाशकांमुळे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे मधमाश्यांस हे काम करणे आवश्यक झाले आहे. प्रत्येक फळबागेत व शेतात मधमाशीच्या पेट्या व त्यांत पोळी असली म्हणजे फळांचे व शेतीचे उत्पादन वाढते, असे आढळले आहे.

मधमाशीपालन या शब्दावरून असे वाटते की, जसे आपण कुत्री, मांजरे इ. प्राणी पाळतो, तसेच हेही पालन आहे, पण ते असे नाही. पाळीव प्राण्यांच्या खाण्यापिण्याची व संरक्षणाची जबाबदारी मालकावर असते. मधमाश्या स्वत:चे अन्न स्वत:च मिळवितात आणि हे करीत असताना परागण करून शेतीचे उत्पादन वाढवितात.

आपल्या पिलांचे व समूहाचे अन्न जमा करून यातूनच त्या आपल्याला मधाचा व मेणाचा पुरवठा करतात. त्यांच्या संख्येच्या मानाने त्यांना अत्यल्प जागा पुरते. त्या स्वत:च्या व समूहाच्या संरक्षणाकरिता त्यांना असलेली नांगी व तिच्यातील विष वापरतात. या विषापासून मात्र जपणे आवश्यक असते. एका पोळ्यापासून दोन पोळी करणे किंवा नवीन पोळ्यांची स्थापना करणे हेही त्यांचे कार्य आहे. आपल्या पोळ्यापासून मधमाश्या सरासरी ३-४ किमी. त्रिज्येच्या क्षेत्रात उडतात व या क्षेत्रातील झाडांच्या फुलांतील मकरंद जमविणे, परागकण जमविणे व परपरागण करणे हे त्यांचे कार्य असते. मध व मेण यांच्या उत्पादनापेक्षा परागणामुळे याच्या दसपट उत्पादन येते.

भारतातील मधमाशीपालनाचा इतिहास : पुरातन काळापासून जरी भारतात मधाचे उत्पादन होत असले, तरी त्याचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास अलीकडील काळापर्यंत झालेला नव्हता. त्यामानाने पाश्चिमात्य देशांत या क्षेत्रात खूपच प्रगती झाली. याचे समालोचन वर केलेच आहे. १८८२ साली बंगालात व १८८३ साली पंजाबात प्रथम या विषयाकडे विशेष लक्ष दिले व पाश्चिमात्य देशांतील काही पध्दती अंमलात आणल्या गेल्या. नंतर १९०७ साली पुसा येथील कृषी संशोधन संस्थेत हे कार्य हाती घेण्यात आले. दक्षिण भारतात रेव्हरंड न्यूटन यांनी या क्षेत्रात काम केले व परिणामी १९१७ साली त्रावणकोर व १९२५ साली म्हैसूर येथे मधमाशीपालन केंद्रे स्थापन झाली. १९२८ साली कृषिविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार कुटिरोद्योगास चालना मिळाली. यामुळे १९३१ मध्ये मद्रास, १९३३ मध्ये पंजाब, १९३४ मध्ये कूर्ग व १९३८ मध्ये उत्तर प्रदेश या प्रांतात पुष्कळ ठिकाणी मधमाशीपालन केंद्रे स्थापन करण्यात आली. ऑल इंडिया बी-किपर्स असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावरील संस्थाही १९३८-३९ साली स्थापण्यात आली. या संस्थेतर्फे इंडियन बी जर्नल हे नियतकालिक प्रसिध्द करण्यात येते. १९४५ साली पंजाबात १९५९ साली कोईमतूर (मद्रास) येथे मध्यवर्ती मधमाशीपालन संशोधन संस्था स्थापण्यात आल्या. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे हे संशोधन १९५२ साली सुरू झाले. या सर्व प्रयत्‍नांमुळे या उद्योगास संघटित स्वरूप प्राप्त झाले. १९५२-५३ साली अखिल भारतीय खादी व ग्रामउद्योग मंडळ स्थापन झाले. व १९५६ साली या मंडळाचे रूपांतर खादी व ग्रामोद्योग आयोगात झाले. या आयोगाने पुणे येथे सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट १९६२ साली स्थापन केली.

भारतातील काही विद्यापीठे, कृषी  विद्यापीठे, शासकीय संस्था इ. ठिकाणी निरनिराळ्या स्तरांवर मधमाशीपालनासंबंधीचे शिक्षणक्रम सुरू आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेनेही या क्षेत्रातील काही समन्वयी प्रकल्पांना मान्यता व अनुदान देऊन या क्षेत्राच्या विकासास गती आणली आहे. भारतीय मानक संस्था आणि दर्जा व विशुध्दता दर्शक ‘अँगमार्क’ हे चिन्ह देणारी यंत्रणा यांचेही सहकार्य या प्रकल्पांना लाभले आहे.

विकास व उत्पादन आढावा : मधमाशी क्षेत्रातील जागतिक किर्तीच्या ईव्हा क्रेन या ब्रिटीश संशोधिकेने १९६० च्या सुमारास प्रसिध्द केलेल्या माहितीवरून असे दिसते की, पूर्व यूरोपातूल काही देशांत प्रत्येक शासकीय मधमाशीपालकाला सरासरी १०० पोळ्यांची  देखभाल करावी लागते. इंग्‍लंडमध्ये व्यावसायिक मधमाशीपालकाकडील पोळ्यांची संख्या २०० ते २५० पर्यंत असते, तीच ऑस्ट्रेलियात ३०० वा अधिक तर अमेरिकेत (कॅलिफोर्नियात) १,००० इतकी असते. यावरून अमेरिकेत या धंद्याचा किती विकास झाला आहे, याची कल्पना येईल. अमेरिकेत प्रत्येक पोळ्यापासून दर वर्षी सरसरी १८ ते ३६ किग्रॅ. मध मिळतो. उत्तम तर्‍हेने काळजी घेतलेल्या काही पोळ्यांत हा साठा ९० ते १८० किग्रॅ.  इतका मिळाला आहे. यूरोप, आशिया व आफ्रिका या खंडात मधमाशीपालन हा मुख्यत: हौशीखातर केलेला व्यवसाय म्हणून समजण्यात येतो. यामुळे मधमाशीपालकाजवळ सरासरी ५ ते ५० इतकीच पोळी असतात व प्रत्येक पोळ्यापासून त्याला फक्त ४.५ ते किग्रॅ. पर्यंत मध मिळतो. या क्षेत्रातील विकासाचा व उत्पन्नाचा प्रत्येक खंडातील आढावा खाली दिला आहे.

यूरोप खंड : रशिया सोडून या खंडात मधमाश्यांची १.२५ कोटी पोळी आहेत.हे प्रमाण दर चौ. किमी. स. २-४ याप्रमाणे आहे. इतर खंडांच्या मानाने हे प्रमाण तिप्पट आहे, तरी पण मध उत्पादन मात्र जास्त नाही. प्रत्येक पोळ्यातून सरासरी ९ किग्रॅ. मध निघतो. यूरोप खंडात मधाचा वापर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मधाची आयात करावी लागते. १९५५ मध्ये अंदाजे ५०,००० टन मधाची आयात अमेरिकेतून करावी लागली. यांपैकी एकट्या पश्चिम जर्मनीने ३८,००० टन मधाची आयात केली. १९६० साली रशिया सोडून बाकी यूरोप खंडात मधाचे एकूण उत्पादन १,१०,००० टन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार रशियात अंदाजे १ कोटी पोळी आहेत. रशियाचे मधाचे उत्पादन दरवर्षी १ लक्ष टन आहे. पोळ्यामागे १९ किग्रॅ. मध मिळतो. रशिया मधाची आयात करीत नाही व निर्यातही करीत नाही. पोळ्यांची व्यवस्था सरकारी क्षेत्रात किंवा सहकारी संस्थांकडे असते. मधमाश्यांचे परागणातील महत्त्व लक्षात घेऊन शासनाने मधमाशीपालन व कृषिक्षेत्र यांची सांगड घातली आहे. मेणाच्या उत्पादनावरही शासनाचे लक्ष असते. रशिया मेणाचीही  आयात करीत नाही. इतर मध उत्पादन करणारे देश मेणाची आयात करतात.

आशिया खंड : या खंडातील मध उत्पादनाची आकडेवारी उपलब्ध नाही. आशियातील रशियाचा भाग सोडून इतरत्र सु. ४० लक्ष पोळी असावीत, असा अंदाज आहे. यांपैकी बरीच पोळी जुन्या प्रकारची, चौकटी न काढता येणारी अशी आहेत. या खंडातील उष्ण प्रदेशात पुष्कळसा मध एपिस डॉरसॅटा या मोठ्या आकारमानाच्या रानटी मधमाशीच्या पोळ्यातून जमविला जातो. प्रत्येक पोळ्यापासून साधारणपणे सु. ७ किग्रॅ. मध मिळतो. या खंडातील मधाचे उत्पादन सु. ३०,००० टन इतके आहे. यूरोपातील मधमाश्या ए. मेलिफेरा या आशियात आणल्या जात आहेत आणि यामुळ मधाचे उत्पादन वाढेल असा, अंदाज आहे.चीन मध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि त्याची वाढ झपाट्याने आहे. ज्या क्षेत्रात १९४९ साली अवघी ८,००० पोळी होती, त्या क्षेत्रात १९५९ साली १,९५,००० पोळी निर्माण करण्यात आली. या प्रमाणात जर सर्वत्र प्रगती झाली, तर आशिया खंडाचे या बाबतीतील चित्र लवकरच बदलेल, अशी अपेक्षा आहे.

भारतात खादी व ग्रामोद्योग आयोगाने या क्षेत्रात पुढाकार घेऊन बरेच कार्य केले आहे. या क्षेत्रातील सर्वागीण आकडेवारी उपलब्ध नाही. ह्या आयोगाने प्रसिध्द केलेली आकडेवारी कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. १. भारतातील मधमाशीपालनाविषयक माहिती

वर्ष मधुपेट्यांचे वितरण मध-उत्सर्गक यंत्रांचे वितरण मधमाशीपालनाचे शिक्षण घेतलेल्यांची संख्या
१९७८-७९ ३५,६९६ १,५२६ १३२
१९७९-८० २३,६४८ १,८२४ ३६७
१९८०-८१ ३३,३०४ २,०६२ ३४
१९८१-८२ २७,९२६ २,०१३ ११३

आयोगाने हा कार्यक्रम १९५३ साली हाती घेतला तेव्हापासून १९८२ सालापर्यंत एकूण ७,४७,०६८ इतक्या मधुपेट्या व १५,०७८ इतकी मध-उत्सर्गक यंत्रे वापरात आली. या काळात एकूण ५, २४३ लोकांना मधमाशीपालनाचे शिक्षण देण्यात आले. कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीचा भारतात अजून व्हावा तितका प्रसार झालेला नाही. ए. इंडिका या भारतीय मधमाशीची सुधारित संकरित जात मिळविण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. अशी जास्त मधोत्पादन करणारी जात मिळाल्यास ए. मेलिफेरा या यूरोपीय मधमाश्या आयात कराव्या लागणार नाहीत.

आयोगाच्या अहवालानुसार भारतातील मधोत्पादनात केरळ राज्याचा पहिला, तमिळनाडूचा दुसरा, बिहारचा तिसरा, तर महाराष्ट्राचा बारावा क्रमांक लागतो. भारताची या क्षेत्रातील प्रगती कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.

उपलब्ध आकडेवारीवरून असे आढळते की, भारतात ५ कोटी हेक्टर जमीन मधमाशीपालनास योग्य व परागणामुळे फळे व पिके यांना उपयुक्त अशी आहे. एवढ्या जमिनीवर मधमाशीच्या कमीत कमी १ कोटी वसाहती सहज जोपासता येतील. हा आकडा जगात सध्या असलेल्या वसाहतींच्या पावपट आहे.

कोष्टक क्र. २. भारताची मधोत्पादनातील प्रगती

वर्ष मधमाशी पालकांची संख्या वसाहतींची संख्या मध उत्पादन (किग्रॅ.) मेण उत्पादन (किग्रॅ.) एका वसाहतीचे सरासरी उत्पादन (किग्रॅ.) मध व मेणाचे एकूण मूल्य
१९५३-५४ २३२ ८०० १,२०० १.५ रूपये ४२००/- (रू. ३.५ प्रती किग्रॅ.)
१९८०-८१ १७,००० ७,१०,२७८ ५०,३६,६२२, १२,७०२ ७.०१ रूपये ७५९.०१ लाख (मध रू. १५/-प्रती किग्रॅ. मेण रू. ३०/-प्रती किग्रॅ.)

आफ्रिका: उत्तर किनाऱ्यावरील प्रदेशांत मधमाशीपालनाचे चित्र भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावरील इतर देशांसारखेच आहे. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस मात्र परिस्थिती वेगळी आहे. अफ्रिकेत अंदाजे ८० लक्ष पोळी आहेत. यांपैकी ३/४ पोळी टांझानिया–अंगोला यांसारख्या उष्ण प्रदेशांत आहेत. या पोळ्यांत मधापेक्षा मेणाचे उत्पन्न जास्त होते. मध हे दुय्यम उत्पादन समजले जाते. मधमाश्यांच्या मेणाच्या जगातील उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन येथे होते. आफ्रिकेतून दर वर्षी सु. ३,५०० टन मेण निर्यात होते, त्यामानाने मधाचे उत्पादन फक्त ४५,००० टनच आहे. आफ्रिकेच्या दक्षिण भागात ए. मेलिफेरा कॅपेन्‍सीस या मधमाशीची पोळी आढळतात. या पोळ्यातील कामकरी माश्या अंडी देऊ शकतात व या अंड्यांपासून राणीमाशी किंवा कामकरी माश्या अनिषेकजनन (नर-मादीचा संयोग न होता) पध्दतीने निर्माण होतात.

अमेरिका : या खंडात मधमाश्यांचा प्रसार होण्यापूर्वी मधमाश्यांच्या दृष्टीने उपयुक्त अशा वनस्पती येथे होत्या. या वनस्पतींची फळे पुष्कळ मकरंद व परागकण देणारी होती. त्यामुळे येथे मधमाश्यांचे आगमन होताच त्यांना उपयुक्त अशी परिस्थिती लाभली व याचा परिणाम मधाचे जास्त उत्पादन होण्यात झाला.

उत्तर अमेरिकेत सु. ५५ लक्ष पोळी आहेत. प्रत्येक पोळ्यातून सरासरी २० किग्रॅ. मध मिळतो. कॅनडातील पोळ्यांतून तर हा साठा प्रत्येक पोळ्यामागे ४० किग्रॅ. पर्यंत असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये दर २.६ चौ. किमी.ला दोन असे पोळ्यांचे प्रमाण आहे. कॅनडात हेच प्रमाण दर २६ चौ. किमी.ला एक इतके आहे. अमेरिकेत पुष्कळ लोकांचा मधमाशीपालन हा पूर्णवेळाचा उद्योग आहे. काही लोकांच्या मालकीची प्रत्येकी १,००० पोळी आहेत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) यूरोपसारखे आहे. त्यामुळे या भागात यूरोपसारखे मध उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. मध्य अमेरिकेत सु. १५ लक्ष पोळी आहेत. पोळ्यांचे प्रमाण दर २.६ चौ. किमी.ला दोन असे पडते. या भागात आणखी पोळी ठेवण्यास वाव आहे.

दक्षिण अमेरिकेत साधारणपणे १५ लक्ष पोळी असावीत. पोळ्यांचे प्रमाण दर ११.७ चौ. किमी.स एक असे आहे. येथे जास्त पोळी ठेवण्यास पुष्कळ वाव आहे. या पोळ्यांतून दर वर्षी २६,००० टन मध मिळतो. बहुतेक सर्व मधाची निर्यांत होते. याखेरीज येथे नांगी नसणाऱ्या मधमाश्यांचीही बरीच पोळी आहेत.

ऑस्ट्रेलेशिया : न्यूझीलंड : या देशांत २ लक्ष पोळी असून त्यांपासून दर वर्षी ६,००० टन मधाचे उत्पादन होते. यापैकी ३/४ मध यूरोपला निर्यात होतो. पोळ्यांचे प्रमाण दर २.६ चौ. किमी.स दोन असे आहे.प्रत्येक पोळ्यातून दर वर्षी अंदाजे २९ किग्रॅ. मध मिळतो.

ऑस्ट्रेलिया : कॅनडाच्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पोळ्यांतून मधाचे उत्पन्न मिळते. प्रत्येकी ३६ किग्रॅ. मध देणारी पोळी येथे आहेत. काही पोळी तर दर वर्षी ९० किग्रॅ. पर्यंत मध देतात. दर वर्षीचे मधाचे उत्पादन १५,००० टन आहे. यांपैकी ११,००० टन मध यूरोपला निर्यांत होतो. दर १८.२ चौ. किमी.स एक असे पोळ्यांचे प्रमाण आहे.

सर्व जगातील मधाचे उत्पादन १९६० च्या सुमारास अंदाजे ५ लक्ष टन इतके होते (१९७९ मध्ये १०.३१ लक्ष टन). हे उत्पादन ४ ते ४.५ कोटी पोळ्यांतून मिळाले. या क्षेत्रात त्या वेळी ५० लक्ष लोक काम करीत होते.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, मधमाशीपालनात मकरंद जमविण्यास लागणाऱ्या वनस्पती, तसेच मधमाशीचे स्वभाववैशिष्ट्य हे समजावून घेऊनच मानवाला हा व्यवसाय करता आला आहे. यावर अजून नियंत्रण ठेवता आले नाही.

आ. १. बाहेरून दिसणारी सुधारित डेडांट प्रकारची मधुपेटी

मधमाशीपालनाचे साहित्य : यूरोप व दक्षिण अमेरिकेतील काही भागांत अद्यापही मधमाश्यांना मधाचे पोळे बांधण्याकरिता घुमटाच्या आकाराच्या उभ्या करंडीचा उपयोग करतात; पण आता आधुनिक पध्दतीत हलविता येणाऱ्या चौकटी असलेल्या लाकडी पेट्यांचा उपयोग केला जातो. या चौकटीस मेणाची चादर चिकटवून त्यावर मधमाश्यांना पोळे बांधता येईल अशी व्यवस्था केली जाते. या व्यवस्थेमुळे मधमाशीपालकास चौकटी हलवून बघता येतात व आत काय चालले आहे, याचा अंदाज घेता येतो.

मधुपेटी व तिच्यातील चौकटींचे आकारमान निरनिराळे असू शकते. त्यातल्या त्यात ‘लँगस्ट्रॉथ’ व ‘सुधारित डेडांट’ (चार्ल्स डेडांट व त्यांचा मुलगा सी. पी. डेडांट यांनी तयार केलेल्या मूळ मधुपेटीचा सुधारित नमुना) हे नमुने जास्त वापरात आहेत. दहा चौकटी असलेल्या लँगस्ट्रॉथ मधुपेटील चौकटीची लांबी ४४.७७सेंमी. व रूंदी २३.१८ सेंमी. असते. सुधारित डेडांट मधुपेटीतील चौकटीची मापे यापेक्षा निराळी आहेत. या निरनिराळ्या प्रकारांच्या मधुपेट्या बनविण्याचे कारखाने आहेत आणि ते प्रमाणबध्द, ठराविक आकारमानाच्या मधुपेट्या व त्यांचे सुटे भाग बनवितात. त्यामुळे मधमाशीपालकास ज्या भागाची जरूरी असेल तेवढाच भाग बाजारातून आणता येतो. एकदा एक प्रकारची पेटी सतत वापरणे फायदेशीर पडते कारण प्रमाणबध्द सुटे भाग बाजारात केव्हाही मिळू शकतात. मधमाश्या स्वत:चे पोळे रेखाबध्द व भूमितीच्या नियमांनुरूप बांधतात. त्यामुळे पोळे बांधण्याकरिता तयार केलेल्या मधुपेट्या व त्यांतील चौकटी तयार करताना भूमितीचा काटेकोरपणा पाळावा लागतो.

आ. २. मधुपेटीचे भाग : (१) मधमाश्यांना पोळ्यांत शिरण्यासाठी वा बाहेर पडण्यासाठी उतरती फळी, (२) चौपाई (बैठक), (३) तळपाट, (४) शिशुकोश, (५) मधुकोश, (६) आतील झाकण, (७) वरील झाकण, (८) पोळ्याचे प्रवेशद्वार.

नमुनेदार मधुपेटी : मधुपेटी नेहमी चौपाईवर (बैठकीवर)ठेवणे जास्त योग्य असते. ही चौपाई लाकडाची बनविलेली असते आणि तिच्या प्रत्येक पायाखाली पाणी भरलेली  वाटी  असते. यामुळे पोळ्यात मुंग्या शिरू शकतनाहीत. लाकडाऐवजी काही ठिकाणी सिमेंटच्या घडवंच्याही वापरतात. जेव्हा मधुपेटी कायमची एकाच ठिकाणी ठेवायची असते तेव्हा सिमेंटची घडवंची जास्त सोयीस्कर पडते. मधुपेटीचा तळपाट या लाकडी चौपाईवर किंवा सिमेंटच्या घडवंचीवर ठेवावा लागतो. या तळपाटावरच मधुपेटीचे सर्व वजन पडते. या तळपाटातच पोळ्याचे प्रवेशद्वार असते. प्रवेशद्वाराचे आकारमान लहानमोठे करता येते. प्रवेशद्वारापासून लाकडी चौपाईच्या किंवा सिमेंटच्या घडवंचीपर्यंत एक उतरती फळी असते. मधमाश्यांना पोळ्यांत शिरण्यास किंवा प्रवेशद्वारातून बाहेर पडण्यास या उतरत्या फळीचा (प्रवेशपट्टीचा) उपयोग होतो. तळपाटावर एक पेटी आधारलेली असते, तिला शिशुकोश असे म्हणतात. शिशुकोशातील मजल्यांची संख्या वसाहतीतील मधमाश्यांची संख्या व उत्पादित करावयाच्या मधाचा प्रकार यांवर अवलंबून असते. शिशुकोशावर मधाच्या साठवणीकरिता दुसरी एक उथळ पेटी आधारलेली असते, तिला मधुकोश म्हणतात. राणीमाशी शिशुकोशाच्या बाहेर जाऊ शकणार नाही, पण कामकरी माश्या मात्र शिशुकोशात ये-जा करू शकतील, अशी रचना असलेली पट्टी शिशुकोशावर बसविलेली असते. मधुकोशाचे एक किंवा अनेक मजले असू शकतात. मजल्यांची संख्या किती असावी हे मधमाश्यांचा समूह किती मोठा आहे व तो मकरंद जमा करू शकतो, यांवर अवलंबून असते. या मकरंदाच्या प्रवाहास मधप्रवाह असे म्हणतात. मधुकोशावर एक झाकण असते. या झाकणातून मधमाश्या बाहेर जाऊ शकतात. मधुपेटीचा शिखरभाग पेटीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने धातूच्या पत्र्याने आच्छादिलेला असतो. काही वेळा हे आच्छादन लाकडी फळीचेही बनविलेले असते.

शिशुकोशात मधमाश्यांची अंडी व डिंभ, तसेच राणीमाशीही असते. मधुकोशात मधाचा साठा असतो. या दोन्ही कोशांचे मिळून पोळे होते. दोन्ही कोशांत हलविता येतील अशा चौकटी असतात. शिशुकोशाच्या चौकटीच्या पृष्टभागातील पोकळीत सर्व बाजूंनी माश्यांना इतस्थत: हालचाल करता येईल इतकी मोकळी जागा असते. मधुकोशातही अशाच पण थोड्या कमी उंचीच्या चौकटी प्रत्येक मजल्यास चिकटवून ठेवलेल्या असतात.

जेव्हा द्रव मध जमा करावयाचा असेल तेव्हा वरीलप्रमाणे मधुकोश वापरता येतो. फण्या असलेल्या चौकटी बाहेर काढून त्यांतील कोशावरील मेणाचे झाकण काढले जाते व उत्सर्गक यंत्राने त्यांतील मध काढून घेण्यात येतो. यात फण्यांची हानी होत नाही व फण्यांसहित या चौकटीचा पुन्हा वापर करता येतो. चौकटीवर मेणाच्या पायावर बांधलेली फणी मधमाश्या पुन:पुन्हा वापरू शकतात. ४५० ग्रॅ. वजनाची फणी तयार करण्यास मधमाश्यांना सु. २.७ ते ४.५ किग्रॅ. मध वापरावा लागतो. यामुळे तीच फणी दुसऱ्यांदा वापरली की, दुसऱ्या हंगामात ही फणी तयार करण्यास लागणारा मध वाचतो व या प्रमाणात मधाचे उत्पादन वाढते. द्रव मध काढण्याचे साहित्य महाग असते, त्यामुळे सुरूवातीची एक-दोन वर्षे या साहित्याची किंमत भरून काढण्यास लागतात.

फण्यांसकट विकण्यात येणाऱ्या मधाला फणी–मध म्हणतात, असा मध तयार करण्यासाठी पूर्ण खोलीचे मधुकोश सहसा वापरीत नाहीत. सामान्यत: निम्मी खोली असलेले व १०.८×१०.८ सेंमी. मापाचे २८ विभाग  असलेले मधुकोश वापरण्यात येतात. प्रत्येक वर्षी मेणपत्र्यांचा पाया तयार करणारे आरंभक द्रवयुक्त नवीन विभाग वापरावे लागतात. तथापि हे त्या मानाने स्वस्त असल्याने आणि मध-उत्सर्गक यंत्राची आवश्यकता नसल्याने या प्रकारच्या मधाचे उत्पादन कमी खर्चांचे असते. मध उथळ चौकटीत तयार केला जातो व तिच्यातून पूर्ण फणी काढली जाते. हा मध फण्यांच्या स्वरूपात किंवा फण्या कापून व त्यांतून काढून सेलोफेनच्या आवेष्टनात विकला जातो.

राणी-पिंजरा : राणीमाश्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोस्टाने, रेल्वेने किंवा अन्य वाहनाने पाठविण्याकरिता या पिंजऱ्यांचा उपयोग करतात. तसेच कामकरी माश्यांच्या समूहास नवी राणीमाशी देऊन नवी वसाहत किंवा पोळे निर्माण करण्यासाठीही हे राणी-पिंजरे वापरले जातात. राणीमाशी पिंजऱ्यात असल्यामुळे कामकरी माश्या तिच्यावर हल्ला करत नाहीत. या राणीमाशीसमवेत पिंजऱ्यात काही कामकरी माश्या व काही दिवस पुरेल इतके अन्न असते. यामुळे ओळख होऊन समूहाने या नव्या राणीमाशीचा स्वीकार करेपर्यंत तिला जगता येते. या प्रकारास ‘राणीमाशीची स्थापना करणे’ असे म्हणतात.

मेणपत्रे : मधमाश्यांच्या शुध्द मेणापासून मेणपत्रे तयार केले जातात. या मेणपत्र्यांवर दोन्ही बाजूंस मधमाश्यांच्या नैसर्गिक पोळ्याच्या आकाराचे (२० सेंमी. लांबीत २० ते २४) षट्‍कोनी ठसे असतात. हा मेणपत्रा प्रत्येक लाकडी चौकटीच्या वरील पट्टीला आतून मध्यरेषेवर चिकटविला जातो. अशा चौकटी मधुपेटीत ठेवल्यास मधमाश्या स्वत:च्या मेण ग्रंथीद्वारे निर्माण केलेल्या मेणाच्या पुटांच्या साह्याने मेणपोळे निर्माण करतात. अशा रितीने तयार झालेली पोळी मजबूत असतात. असे पोळे निर्माण करण्यात मधमाश्यांचे बरेच श्रम व वेळ वाचतो.

धूम्रक : धुराचे फवारे सोडण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साधनास धूम्रक असे म्हणतात. धूर करण्याकरिता यात ताग, तरटाचे बोळे किंवा कापसाचे बोळे वापरले जातात. काही वेळा विशिष्ट प्रकारच्या काटक्यांचाही उपयोग करण्यात येतो. हा धूर योग्य प्रमाणातच सोडावा लागतो. पुष्कळशा पोळ्यांत प्रवेशद्वाराजवळ दोन-चार फवारे सोडले, तरी पुरे होतात. धूर सोडण्याचा उद्देश मधमाश्यांना पेटीतील मधुकोशाकडे हाकलणे व तेथे त्यांना पुष्कळ मध प्यावयास लावणे हा असतो. योग्य प्रमाणात धूर सोडला, तर माश्या शांत राहतात व त्यांना हाताळणे सोपे जाते. या स्थितीत त्या नांगी मारीत नाहीत. धुरामुळे असे का घडते हे अद्याप समजले नाही. कदाचित पुष्कळ मध प्यायल्यामुळे माशीला जडत्व येत असावे व ती समाधानी असल्यामुळे नांगी मारीत नसावी. दुसरे हेही कारण असू शकेल की, तिच्या शरीरातील मध-जठर पूर्ण भरलेले असल्यामुळे तिला शरीर वाकविणे इ. क्रिया करता येत नसाव्यात.

धूम्रकातून धूर सोडून मधमाश्यांना मधुकोशात जावयास लावण्याच्या पध्दतीला पर्याय म्हणून इंग्‍लंडमध्ये निर्जंतुक केलेले कापड वापरतात. या कापडावर जंतुनाशक द्रव्याचा फवारा मारलेला असतो. असे कापड पोळ्यावर टाकले म्हणजे या वासाने मधमाश्या मधुकोशात जातात.

झिंजिवरेसी कुलातील मोमम क्युलिएटा या वनस्पतीचा रस अंगाला चोपडून ए. डॉरसॅटा सारख्या भयंकर मधमाश्या हाताळणे व मधुवनात पाळणे शक्य होईल, असे द. अंदमान बेटांवरील अनुभवावरून निदर्शनास आले आहे. तसेच तेथील ओंगी जमातीतील आदिवासी अँनोनेसी कुलातील ओरोफिया कॅट्सचॅलिका या मूळच्या तेथील वनस्पतीची पाने चघळून तयार झालेली थुंकी अंगाला लावतात व चुळकाभर रस पोळ्यावर थुंकतात. त्यामुळे मधमाश्या दूर पळून जातात व नांगी मारत नाहीत. . क्युलिएटाचे खोड पिळून रस काढतात. हा रस ए. सेराना इंडिका या भारतीय माशीवरही परिणामकारक असल्याचे आढळले आहे.

पटाशी किंवा तत्सम चाकू : मधुकोशातील लाकडी चौकटी मेणामुळे एकमेकींस चिकटल्यास त्या अलग करण्याकरिता या हत्याराचा उपयोग करावा लागतो. तसेच मधुकोश किंवा शिशुकोश यांच्या तळावर काही घाण चिकटून बसल्यास ती या हत्याराने खरडून काढता येते.

मध-उत्सर्गक यंत्र : पोळ्यातील मध काढण्याकरिता यंत्राचा उपयोग केला जातो. मधाने भरलेल्या चौकटी यात ठेवून गोल फिरविल्यास  केंद्रोत्सारक प्रेरणेने त्यांतील मध बाहेर फेकला जातो व यंत्राच्या तळाशी असलेल्या नलिकेतून तो जमा केला जातो. या पध्दतीत पोळ्याची व माश्यांची हानी होत नाही. मोकळी चौकट पुन्हा मधुपेटीत ठेवल्यास मधमाश्या तिच्यातील फणीत पुन्हा मध साठवितात. तसेच पोळे परत बांधण्यासाठी लागणारे मेण व ते तयार करण्यासाठी लागणारा मध यांचीही  बचत होते. मधमाशांचा वेळ वाचतो व परिणामी मधाचे उत्पादन वाढते.

आ. ३. मध-उत्सर्गक यंत्र : (१) चौकटी फिरविण्याची यंत्रणा, (२) मधाने भरलेल्या चौकटी.

इतर साधने : रानावनात मिळालेल्या वसाहती आणण्याकरिता हलकी प्रवासी मधुपेटी किंवा कापडी जाळी वापरतात. मधमाशांनी दंश करू नये म्हणून कापडी जाळीचा बुरखा आणि हातमोजे यांचा उपयोग केला जातो.

वरील साधनांच्या आकारमानात व मापात एकसूत्रता यावी म्हणून बहुतेक देशांत मानक संस्थांमार्फत अनुरूप प्रमाणीकरण केले जाते. भारतीय मानक संस्थेने काही साधनांची मोजमापे व त्यांची सामग्री यांचीनिश्चिती केली आहे. उदा., मधुपेट्या (आय एस : १५१५-१९६९), प्रवासी मधुपेट्या (आय एस : ५४२६-१९६९), मेणपत्रे (आय एस : २०७२-१९७७), मध-उत्सर्गक यंत्र(आय एस : ५४२७-१९६९), वगैरे.

आ. ४. कापडी जाळीचा बुरखा

मधुगृहे : काही देशांत पोळ्यांतील मध यंत्राने काढण्याचे काम व्यक्तिगत स्वरूपाचे नसून या कामाकरिता ठिकठिकाणी मधुगृहे उभारण्यात आली आहेत.  ही मधुगृहे आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असतात.येथे पोळी आणून दिली की, यंत्राने  त्यांतील मध काढून व मधाचे मोजमाप करून रिकामी पोळी पुन्हा वापरण्यास परत दिली जातात आणि मधाचा योग्य़ तो मोबदला दिला जातो. फोन ह्‍रूश्का यांनी केंद्रोत्सारक प्रेरणेच्या तत्त्वावर आधारलेले मध-उत्सर्गक यंत्र प्रथम तयार केले.  तेच लँगस्ट्रॉथ यांनी अमेरिकेत वापरले.  याचीच सुधारित प्रतिकृती या मधुगृहांत वापरली जाते.

मधुपेटी ठेवण्यासाठी योग्य स्थान : मधुपेटी  कोठेही ठेवता येते; पण तीतून जर जास्तीत जास्त मध मिळावा अशी अपेक्षा असेल, तर ती  पेटी योग्य जागेवर ठेवली पाहिजे.  शहरातील आपल्या बंगल्याच्या आवारात जर ही पेटी ठेवली, तर आजूबाजूस झाडे कमी असल्यामुळे मधमाशांना मकरंद व पराग गोळा करण्यास दूरवर जावे लागेल आणि यामुळे पेटीपासून निघून परत मकरंद व पराग घेऊन पेटीपर्यंत येण्याच्या त्यांच्या फेऱ्या कमी होतील आणि यामुळे मधाचे उत्पादन घटेल. याउलट मधुपेटी जर ग्रामीण भागात फळांच्या बागांजवळ, शेताजवळ वा जंगलाजवळ ठेवली, तर मधमाश्या जास्ती वेळा मकरंद आणि पराग घेऊन पेटीत येतील व यामुळे मधाचे उत्पादन वाढेल.  मधुपेटी  ठेवण्यास योग्य जागेची निवड करणे फार महत्त्वाचे आहे.  जागा व हवामान यांखेरीज मधमाश्यांचे आरोग्य व समूहाचा जोम यांवरही मधाचे उत्पादन अवलंबून असते. मधुपेटीच्या जागेपासून सु. ३ ते ५ किमी. त्रिज्येच्या क्षेत्रातून निरनिराळ्या फुलांतून मधमाश्या मकरंद, पराग, प्रोपोलिस व पाणी जमा करतात. या त्रिज्येतील क्षेत्रात सु. ५० ते २०० मधुपेट्या ठेवता येतात. यापेक्षा जास्त पेट्या ठेवावयाच्या असल्यास त्या या क्षेत्राच्या बाहेर ठेवणे उचित ठरेल. जेव्हा या क्षेत्रातील जमीन सपाट असेल तेव्हा मधुपेटी कोठेही ठेवली तरी चालेल; पण हा प्रदेश जर उंचसखल किंवा टेकड्यांनी आणि डोंगरांनी युक्त असेल, तर मधुपेटी उतारावर ठेवणे जास्त चांगले कारण मकरंद व पराग यांचे ओझे घेऊन येणाऱ्या माश्यांना उतारावरून उडत येणे जास्त सोपे पडते. मधुपेटी नेहमी चांगला सूर्यप्रकाश असेल तेथे ठेवावी. पेटीच्या प्रवेशद्वाराचे तोंड दक्षिण किंवा आग्‍नेय दिशेकडे असावे. या पेटीच्या प्रवेशद्वारावर वाऱ्याचा झोत येणार नाही अशी काळजी घ्यावी. याकरिता पेटीच्या प्रवेशद्वारासमोर थोड्या अंतरावर वारा अडवील असे उंच कुंपण घातले, तर सोयीस्कर पडते. मधुपेट्या ठेवून मधुवन तयार करण्याची जागा थंडी, ऊन, पाऊस, वारा, धूर यांपासून संरक्षित असावी. माकडे, अस्वले, साप, बेडूक, पक्षी, मुंग्या व वाळवी या प्राण्यांपासून उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी. मधमाश्यांना स्वच्छ पाणी मिळण्याची सोयही या मधुवनात असावी. मधुवनातील मधुपेट्या एकमेकींपासून माफक अशा अंतरावर ठेवाव्यात. मधमाशीपालनाचा अनुभव येईपर्यत सुरुवातीस एक किंवा दोन पेट्या ठेवणे जास्त श्रेयस्कर ठरेल. एका ठिकाणी जास्त मधुपेट्या असल्या, तरी मधमाश्या आपली स्वत:ची पेटी अचूक ओळखतात.

मधमाश्यांची निवड व पोळ्याची स्थापना : प्रत्येक मधुपेटीत मधमाश्यांची एक संपूर्ण वसाहत ठेवता येते. या वसाहतीत राणीमाशी व कामकरी माश्या असतात. मधमाशीपालन सुरू करण्यापूर्वी किंवा मधुवनाची स्थापना करण्यापूर्वी सर्व साहित्याची जमवाजमव करावी लागते व मग वसाहत मिळवावी लागते. नैसर्गिक वसाहती झाडांच्या ढोल्यांत किंवा खडकांच्या पोकळ्यांत आढळतात. त्या पकडून प्रत्येक मधुपेटीत एक अशी त्यांची विभागणी करावी लागते.

काही देशांत अशा वसाहती विकत मिळतात. या वसाहतीत अंडी घालणारी राणीमाशी असते. तसेच पोळ्याच्या काही फण्या असतात. हिच्यातील कामकरी माश्या मकरंद व परागकण जमवितात व घातलेल्या अंड्यांची व त्यांतून बाहेर येणाऱ्या पिलांची देखभाल करतात. अशी वसाहत विकत घेऊन तिची स्थापना मधुपेटीत करता येते व इतर काही अडचणी न येता मधमाशीपालनास सुरुवात करता येते. अशा वसाहती विकत घेण्यास बरीच किंमत पडते. ही किंमत त्या वसाहतीत किती फण्या आहेत, यावर अवलंबून असते. सुरुवातीस जरी हा खर्च जास्त वाटला, तरी मध उत्पादनास सुरुवात झाली की तो भरून निघतो.

मधमाश्यांच्या लहान समूहास ‘केंद्र’ असे म्हणतात. मोठ्या समुदायाचा हा एक भाग असतो. यात फक्त तीन किंवा चार चौकटी असून त्यांत एक तरुण राणीमाशी असते. मधमाश्या विक्रेत्याकडून पूर्ण वसाहत विकत घेण्यापेक्षा हे केंद्र विकत घेणे स्वस्त पडते. केंद्रापासून निर्माण केलेल्या मधुपेटीतील पोळ्यात पहिल्या वर्षी मधाचे उत्पादन अत्यल्प असते, पण पुढे ते वाढते. केंद्राची स्थापना मधुपेटीच्या शिशुकोशात करावी लागते व तेथे त्याची हळूहळू वाढ होते.

काही वेळा मधमाशीच्या मोठ्या समूहात माश्यांचा उठाव होतो व यामुळे पोळ्याचे विभाजन होते. उठावात जुनी राणीमाशी व पुष्कळ प्रौढ व तरुण कामकरी माश्या असतात. या उठावाच्या माश्या पोळे सोडून बाहेर जातात. मधमाश्या विक्रेते हे उठावसमूह पकडून विक्रीस ठेवतात. हे उठावसमूह जर मधुपेटीत सोडले, तर नवीन पोळे निर्माण करतात. या उठावसमूहाची विक्री वजनावर होते. प्रत्येक किग्रॅ. मध्ये अंदाजे ८,००० ते ९००० माश्या भरतात. या माश्यांची मधु-जठरे भरलेली असल्यामुळे इतर माश्यांपेक्षा त्या जड असतात. इतर माश्या एक किग्रॅ. मध्ये अंदाजे १०,००० ते ११,००० भरतात. नवीन पोळे बांधण्यास जितका जास्त वजनाचा उठावसमूह मिळू शकेल तितके चांगले असते. जर या समूहातील राणीमाशी प्रौढ असेल, तर तिची अंडी देण्याची क्षमता कमी असते. अशा परिस्थितीत ती बदलणे जरूर पडते.

पहिल्या उठावानंतर त्याच पोळ्यातून दुसरा उठाव व त्यानंतर तिसरा उठाव होण्याचाही संभव असतो. या मागील उठावांत समागम न झालेल्या राणीमाश्या व थोड्या संख्येने कामकरी माश्या असतात. या उठावसमूहापासूनही नवे पोळे स्थापन करता येते.

बरेच नवशिके मधमाशीपालक व्यावसायिक विक्रेत्याकडून निषेचित (फलित) राणीमाशी व पुष्कळ कामकरी माश्या असलेले समूह घेणे पसंत करतात.

बाहेरील तापमानाचा मधमाश्यांच्या हालचालीवर परिणाम होतो. जेव्हा तापमान १०से. इतके खाली जाते, त्या वेळी मधमाश्यांना नीट उडता येत नाही. याही खाली तापमान गेले, तर त्यांचे पाय आखडतात व यामुळे कधीकधी त्या दगावतात. जसजसे बाहेरचे तापमान वाढते तसतशी मधमाश्यांची हालचालही वाढते. तापमान ३४ से. वर आले म्हणजे राणीमाशी अंडी घालावयास सुरुवात करते. याच पोळ्यातील कामकरी माश्याही फण्या बांधणे, मेण तयार करणे इ. कामांस लागतात. पोळ्याच्या आतील तापमानावर माश्यांचे नियंत्रण असते व ते बाहेरील तापमानाशी संबंधित असते. मधुपेटीतील माश्यांची तपासणी करावयाची असेल, तर आतील तापमान योग्य इतके आहे हे जाणून घेतल्यावरच ती केली पाहिजे. मधमाश्या शीतनिष्क्रियतेत(हिवाळ्यातील निष्क्रिय अशा गुंगीच्या अवस्थेत) जात नाहीत; पण थंडीच्या दिवसांत त्या विश्रांती जरूर घेतात व अगदी कमी हालचाल करतात. या दिवसांत कामकरी माश्या एकमेकींच्या अंगावर चढून पुंजका करतात. तापमान १५से. च्या खाली आले की, असे पुंजके दिसू लागतात.

नवीन पोळ्यात सुरुवातीस फक्त कामकरी माश्या व राणीमाशी अशा दोनच जाती असतात. कामकरी माश्या जननेंद्रियाची वाढ न झालेल्या माद्या असतात. त्या आकारमानाने लहान असतात व त्यांची संख्या मोठी असते. पोळ्याची काळजी घेणे व संरक्षण करणे, मकरंद व पराग जमविणे, पाणी व प्रोपोलिस आणणे आणि मेण निर्माण करणे ही त्यांची कामे होत. राणीमाशी आकारमानाने मोठी असते व कधीकधी पोळ्यात हिंडताना दिसते. तिचे मुख्य व महत्त्वाचे काम म्हणजे अंडी घालणे हे होय. तिला अन्नपाणी पुरविणे व तिची देखभाल करणे ही कामे कामकरी माश्या करतात. पोळ्यातील हालचालींचा निर्णय एकट्या राणीमाशीचा नसतो, तर तो सर्व कामकरी माश्यांचा सामुदायिक स्वरूपाचा असतो. राणीमाशी सर्वसमूहाची माता म्हणून राहते पण जेव्हा तिची अंडी घालण्याची क्षमता कमी होते तेव्हा कामकरी माश्या तिला बदलण्याचा प्रयत्‍न करू लागतात. राणीमाशी बदलणे हा निर्णय कामकरी माश्यांनीच घ्यावयाचा असतो.

शिशुकोशातील चौकटींची पाहणी केली असता फणीच्या मध्यभागी असलेले कोश जास्त तपकिरी असतात असे दिसून येते. या तपकिरी कोशांतच राणीमाशी अंडी घालते व या अंड्यांतूनच निरनिराळ्या अवस्थांचा विकास होऊन कामकरी माशी बाहेर पडते. रिकाम्या झालेल्या कोशांत पुन्हा अंडी घातली जातात. सतत वापराने आणि राणीमाशी व कामकरी माश्या यांच्या वर्दळीमुळे शिशुकोशातील फण्यांच्या या भागास रंग येतो. या रंगीत भागाच्या भोवती असलेल्या कोशांत मध व परागकण जमा केलेले आढळतात. यांच्या मिश्रणाचे केलेले अन्न कामकरी माश्या डिंभांना पोहोचवितात. मोठ्या आकारमानाच्या कोशात घातलेल्या अंड्यातून नर निर्माण होतात. ही अंडी अनिषेचित असतात. नर आकारमानाने मोठे असतात. त्यांना नांगी नसते. नर समूहाकरिता काहीही काम करीत नाहीत. कामकरी माश्या त्यांना अन्न देतात व राणीमाश्या निर्माण होईपर्यत त्यांना जगवतात. राणीमाशीबरोबरील समागमाचे कार्य पूर्ण झाल्यावर नर मरतात किंवा कामकरी माश्यांकडून मारले जातात. नर जगविण्यास बराच मध खर्ची पडतो. राणीमाशीशिवाय समूह जगू शकत नाही आणि नराशी समागम झाल्याशिवाय राणीमाशी निषेचित अंडी घालू शकत नाही म्हणून मध खर्ची पडला, तरी समूहाच्या द्दष्टीने नर जगविणे महत्त्वाचे असते.

कामकरी माश्या व नर ज्या कोशांतून निर्माण होतात, ते कोश फणीत एकमेकांजवळ आढळतात; पण ज्या कोशात राणीमाशीचा विकास होतो ते कोश मात्र वैशिष्ट्यपूर्ण आणि ओळखण्यास सोपे असतात. हे कोश आकारमानाने मोठे, उलट्या केलेल्या कपासारखे व फणीत तुटक बाजूला असे असतात. हे कोश दर वर्षी नवीन केले जातात. राणीमाशी पद्धतशीरपणे फणीतील कोशावरून हिंडते व प्रत्येक कोशात एक याप्रमाणे अंडी घालते. पोळ्यात किती अन्न आहे, यावर किती अंडी घालावयाची हे ठरविले जाते. एक दिवसात ५,००० ते ७,५०० अंडी घातली जातात; पण साधारणपणे याची सरासरी १,५०० ते २,००० आढळते.

नवीन घातलेल्या अंड्याचे वजन सरासरी ०.१३२ मिग्रॅ. इतके असते.  ज्या अंड्यांतून कामकरी माश्या निर्माण होतात ती अंडी निषेचित असतात.  नर अनिषेचित अंड्यापासून होतात.  राणीमाशी निर्माण करणारी अंडी निषेचित असतात व सुरूवातीस ती कामकरी माश्या निर्माण करणाऱ्या अंड्यांसारखीच असतात. तीन दिवसांत अंड्यांचे डिंभांत रूपांतर होते.  या डिंभास कामकरी माश्या अन्न देतात व हळूहळू त्यांचा विकास होतो.  प्रत्येक डिंभास दिवसातून सरासरी १,३०० वेळा अन्न दिले जाते.  सरासरी पाच दिवसांत डिंभाचे वजन २३० पटींनी वाढते.  त्याचे आकारमान सुरूवातीच्या आकारमानापेक्षा १,५७० पटींनी वाढते.  माशीच्या वाढीस लागणारी कालमर्यादा तिच्या जातीवर व परिस्थितीवरही  अवलंबून असते.

मधमाश्यांचा उठाव : मधमाशीपालनात माश्यांचा उठाव ही घटना फार महत्त्वाची आहे. थंडी संपल्यावर उठाव सुरू होतात. पोळ्यातील काही कामकरी माश्या व राणीमाशी उठावात भाग घेतात. उठाव ही जरी नैसर्गिक घटना असली, तरी यामुळे पोळ्याचे मधोत्पादन घटते. उठाव कशामुळे होतो हे अजून नीटसे समजलेले नाही. हा कदाचित मधमाशीच्या उपजत प्रवृत्तीमुळे होत असावा, असे समजले जाते. उठावाची पूर्वचिन्हे म्हणून काही घटना घडत असतात. राणीमाशीकडून नर उत्पन्न करणारी अंडी घातली जाणे हे एक पूर्वचिन्ह होय. तसेच शिशुकोशात असलेल्या चौकटींवरील फण्यांत जर गर्दी झाली व राणीमाशीस अंडी घालण्यास मोकळे कोश मिळाले नाहीत, तर ती उठावास प्रवृत्त होते. शिशुकोशातील चौकटी वाढवून किंवा मजले चढवून ही अडचण दूर केली, तर उठाव होत नाही. काही वेळा मध व पराग या अन्नाची सुबत्ता किंवा याविरूद्ध तुटवडा हीही उठावाची कारणे होऊ शकतात. हे उठाव जर टाळावयाचे असतील व मधोत्पादनावर त्यांचा परिणाम होऊ द्यावयाचा नसेल, तर वेळोवळी पोळ्यांची तपासणी करून उठावाची संभाव्य कारणे दूर केली पाहिजेत.

ज्या वेळी समूहात कामकरी माश्यांची संख्या खूप वाढते व बाहेर फुलांचा हंगाम व इतर पोषक परिस्थिती असते, त्या वेळी उठाव होण्याची जास्त शक्यता असते. पोळ्यात नर निर्माण होणे, हे उठावाचे आणखी  एक लक्षण मानले जाते. अंडे घातल्यापासून नर बाहेर पडेपर्यंत अंदाजे २४ दिवस लागतात. नर प्रौढ होऊन समागमास योग्य होण्यास आणखी १२ ते १४ दिवस लागतात. नर निर्माण करणारी अंडी हे जर उठावाचे पूर्वचिन्ह मानले, तर उठावाची तयारी  ३६ ते ३८ दिवस अगोदर सुरू होते, असे म्हणता येईल. ह्या अंड्यांचा जर नाश केला, तर उठावास प्रतिबंध होतो असे जरी आढळले असले, तरी हा मार्ग नेहमीच योग्य ठरेल असे नाही.

राणीमाशीच्या उत्पादनाकरिता पोळ्यात जर वैशिष्ट्यपूर्ण कोश बांधण्यास सुरूवात झाली, तर हे उठाव सूचित करणारे दुसरे पूर्वचिन्ह म्हणून समजावे. हे कोश नेहमीच्या कोशांसारखे षट्‍कोणी नसतात. ते आकारमानाने मोठे असून फणीच्या कडेस चौकटींच्या वर किंवा खाली उलट्या कपासारखे चिकटविलेले असतात. समूहात असलेल्या राणीमाशीस या कोशांत अंडी घालण्यास उद्युक्त केले जाते. या अंड्यांतून तीन दिवसांत डिंभ बाहेर येतात. या अवस्थेपर्यंत या डिंभांत व कामकरी माश्या निर्माण करणाऱ्या डिंभांत फरक नसतो. यानंतरच्या पाच दिवसांत मात्र राणीमाशी निर्माण करणाऱ्या डिंभास विशिष्ट प्रकारचे अन्न दिले जाते, या अन्नास राजरस (रॉयल जेली) असे म्हणतात. तरूण कामकरी माशीच्या ग्रंथीतील स्राव अन्नात मिसळून हा विशेष प्रभावी रस तयार केला जाते. या अन्नरसामुळे राणीमाशीची वाढ झपाट्याने होते, तसेच तिच्या जनन तंत्राची (जनन संस्थेची) पूर्ण वाढ होऊन ते कार्यक्षम बनते. यानंतर कोश बंद केला जातो. सात दिवसानंतर या कोशातून तरूण समागम न झालेली राणीमाशी  बाहेर येते. असे झाले म्हणजे उठावाची तयारी पूर्ण झाली असे समजावे. याबरोबरच आणखी एकदोन कोशांतही राणीमाश्या वाढत असतात. या सुमारांस पहिली जुनी राणीमाशी व बऱ्याच कामकरी माश्या योग्य वेळ पाहून उठाव करतात. उठाव साधारण सूर्यप्रकाश असेल त्या दिवशी सकाळी १०-३० ते दुपारी २ च्या दरम्यान होतो. राणीमाशी बाहेर पडल्याबरोबर कामकरी माश्या तिला घेरतात व सर्व मिळून उड्डाण करतात.

उठावातील माश्या पकडून त्यांचे पुन्हा पोळे स्थापन करता येते. या वेळी कामकरी माश्या सहसा नांगी मारीत नाहीत. त्यांची मधुजठरे मधाने गच्च भरलेली असतात. या स्थितीत कामकरी माश्या समाधानी व आनंदी असतात. उठाव पकडताना खबरदारी म्हणून तोंडावर जाळी घालणे योग्य ठरते. उठावातील माश्या झाडाच्या फांदीवर, खोडावर किंवा खबदाडीत पुंजका करून राहतात. या पुंजक्याखाली एखादी टोपली धरली व फांदी हलविली, तर माश्या पटापट टोपलीत पडतात. जर हा पुंजका झाडाच्या खोडावर किंवा झाडाच्या खबदाडीत असला, तर ब्रशाने माश्या टोपलीत पाडता येतात. जर पोळ्यातील रिकामी फणी या टोपलीजवळ ठेवली, तर माश्या या फणीतील कोशांत शिरतात. पकडलेल्या माश्यांना सायंकाळी ऊन कमी झाल्यावर मधुपेटीत घालता येते. या नव्या मधुपेटीत मेणाचे पत्रे चिकटविलेल्या चौकटी शिशुकोशात बसविलेल्या असतात. राणीमाशीसह उठावातील सर्व कामकरी माश्या या पेटीत शिरतात व नवा समूह कार्यान्वित होतो. या नव्या समूहातील माश्या नव्या फण्या अत्यंत तत्परतेने बांधतात. पूर्वीच्या पोळ्यातून आपल्या मधु-जठरात साठविलेला मध त्यांना या वेळी उपयोगी पडतो. जर राणीमाशीत जोम असेल, तर हा समूह झपाट्याने वाढीस लागतो. उठावाच्या मधमाश्यांपासून निर्माण केलेल्या पोळ्यातून जर जास्त मधोत्पादनाची अपेक्षा असेल, तर हे पोळे ज्या पोळ्यातून उठाव झाला असेल तेथेच निर्माण करणे जास्त फायदेशीर ठरते.  मात्र उठावातील जुनी राणीमाशी परत या जुन्या पोळ्यात ठेवता कामा नये. नवी राणीमाशी यथाकाल तयार होते व पोळे पूर्ववत कार्यक्षम होते.

उठावाच्या माश्या व जुनी  राणीमाशी उडून गेल्यावर जुन्या पोळ्यात नवी राणीमाशी निर्माण होऊन पोळे पूर्ववत कार्य करू लागते. जर आणखी काही राणीमाश्या निर्माण झाल्या, तर ही नवी राणीमाशी त्यांचा नाश करते. जर या प्रकारे ज्यादा राणीमाश्यांचा नाश झाला नाही, तर नवी राणीमाशी व काही कामकरी माश्या दुय्यम उठावास सिद्ध होतात. मुख्य उठाव झाल्यानंतर सात-आठ दिवसांतच ह्या दुय्यम उठावाची शक्यता असते. हा दुय्यम उठाव पकडून त्यापासूनही पोळेनिर्मिती  शक्य असते. या पोळ्यात समागम न झालेली राणीमाशी व नर मात्र असली पाहिजेत.

समागमाकरिता राणीमाशीबरोबर केलेले उड्डाण हा नराच्या जीवनातील अत्यंत मोलाचा क्षण असतो. नरास मेण बसविता येत नाही, मकरंद किंवा पराग जमविता येत नाहीत किंवा समूहाचे संरक्षणही करता येत नाही; नरास नांगी नसते. तरीही राणीमाशीस समागम करण्यास नर आवश्यक असल्यामुळे समूहाचा हा एक महत्त्वाचा घटक आहे. नरास दोन शृंगिका(संधियुक्त  स्पर्शें-  द्रिये) असतात व त्यावर एकूण ३०,००० संवेदनाक्षम पट्टिका असतात. ही संख्या कामकरी माश्यांतील पट्टिकांपेक्षा पाचपट, तर राणीमाशीतील पट्टिकांपेक्षा १५ पटींनी जास्त आहे.  राणीमाशीचा सुगावा त्वरित लागावा म्हणून ही संवेदनक्षमता नरास लाभली असावी. राणीमाशी व नर यांचा समागम अंतराळात उड्डाण करीत असताना होतो.

मधमाश्याची पैदास : चांगल्या प्रकारच्या मधमाश्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून राणीमाशी व नर यांच्या समागमास फार महत्त्व आहे पण चांगली म्हणून निवडलेली राणीमाशी  जेव्हा अंतराळात समागमाकरिता उड्डाण करते, तेव्हा तिचा समागम कोणत्या नराशी होईल हे सांगणे कठीण आहे. अमेरिकेत व काही प्रमाणात भारतातही नैसर्गिकरित्या समागमाची वाट न पाहता राणीमाशीच्या जननेंद्रियात नराचे शुक्राणू (पुं-जनन पेशी) घालून कृत्रिम वीर्यसेचन करण्याचे प्रयोग चालू आहेत. यात बरेच यश लाभले आहे आणि अमेरिकेत व इतर काही प्रगत देशांत चांगल्या मधमाश्या निर्माण करण्याकरिता हे तंत्र वापरले जात आहे. यामुळे आनुवंशिकीच्या नियमानुसार काही चांगले गुणधर्म एकत्र आणणे शक्य ङोईल. जर जननेंद्रियातील शुक्राणू कमी झाल्यामुळे राणीमाशीची अंडी घालण्याची क्षमता कमी झाली असेल, तर तिच्या जननेन्द्रियात शुक्राणूंचे अंतःक्षेपण करून ही क्षमता वाढविता येईल. ही पद्धती फक्त कुशल मधमाशीपालकासच वापरणे शक्य आहे.

नव्या राणीमाशीचे समागम उड्डाण होऊन समागम झाल्यानंतर साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून राणीमाशी अंडी  घालू लागते. उठावाच्या दिवसापासून साधारणपणे चौदा दिवसांनी नव्या राणीमाशीची अंडी शिशुकोशात दिसू लागतात. असे झाले म्हणजे समागम सफल झाला असे समजावे. समागमासाठी उड्डाण करणाऱ्या राणीमाश्यांना काही संभाव्य धोक्यांनाही तोंड द्यावे लागते. त्यांना मुख्य भीती पक्ष्यांपासून असते. चुकून जर समागमानंतर ही राणीमाशी दुसऱ्या पोळ्यात शिरली, तर तेथील राणीमाशी व कामकरी माश्या तिला मारून खातात.

समागमानंतर जर राणीमाशी परत समूहात आली नाही, तर काही कामकरी माश्यांची जननेंद्रिये उद्दीपित होऊन कार्यक्षम होतात व या माश्या अनिषेचित अंडी घालू लागतात. अंड्यांपासून नरांची उत्पत्ती होते. या प्रकाराने घातलेली अंडी व त्यांपासून निर्माण झालेले नर प्रमाणबद्ध नसतात. ही परिस्थिती मधमाशीपालकाच्या ध्यानात येताच योग्य अशी राणीमाशी या समूहात सोडली जाते व पुनश्च समूहाची घडी बसविली जाते. नवी राणीमाशी आल्याबरोबर या अंडी घालणाऱ्या कामकरी माश्यांचा नाश होतो. जर नवी राणीमाशी मिळविणे शक्य नसेल, तर या कामकरी माश्या इतर राणीमाशी असलेल्या समूहात सोडल्या जातात व त्या या पोळ्याशी लवकरच एकरूप होतात. या पोळ्यात कामकरी माश्यांची संख्या वाढल्यामुळे मधाचे उत्पादनही वाढते.

मधमाशीपालन पद्धतीत सर्व देशांत सर्वसाधारणपणे जरी सारखेपणा असला, तरी परिस्थिती व वातावरणास योग्य असे बदल तीत करावे लागतात. भारतात ज्या काही ठिकाणी माधमाश्यांसाठी मधुवने निर्माण करण्यात आली आहेत, त्यांत महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाचा समावेश आहे. येथील मधमाश्यांच्या वसाहतीत दर पोळ्यामागे सरासरी १०किग्रॅ. मध मिळतो. जर परिस्थिती अनुकूल असली, तर हे प्रमाण दर पोळ्यामागे ४०किग्रॅ. इतके असू शकते.

वसाहतींपासून मधाचे उत्पादन वाढविण्याच्या द्दष्टीने अनुकूल नैसर्गिक परिस्थितीइतकेच मधमाश्यांच्या जातीलाही महत्त्व आहे. नवीन तंत्र वापरून आता सुधारित संकरित जाती निर्माण केल्या गेल्या आहेत. पुष्कळ मधोत्पादन करणाऱ्या मधमाश्या ज्या पोळ्यात असतात, त्यात जन्मलेली व समागम न झालेली राणीमाशी आणून अशाच चांगल्या वसाहतीत निर्माण झालेल्या नराच्या शुक्राणूंनी तिचे कृत्रिम वीर्यसेचन केले, तर तिच्यापासून चांगल्या कामकरी माश्या निर्माण होऊ शकतात. ह्या राणीमाशीच्या पोळ्यातून मधोत्पादन चांगले होते. ह्या पद्धतीने पोळी तयार करण्याकडे आता बऱ्याच देशांचे लक्ष लागले आहे. भारतात या दिशेने प्रयत्‍न चालू आहेत. भारतातील ए. इंडिका या मधमाशीचा जर चांगला संकरित पुरवठा उपलब्ध झाला, तर मधोत्पादनात या भारतीय मधमाश्या यूरोपीय ए. मेलिफेरा या मधमाश्यांची बरोबरी करू शकतील.

मधमाश्या व परागण : मध व मेण निर्माण करणारा महत्त्वाचा कीटक म्हणून सामान्य माणूस मधमाशीस ओळखतो. सकृत् दर्शनी ते खरेही आहे. मध आणि मेण यांचे उत्पादन, आयात व निर्यात यांविषयीची पुष्कळ देशांतील आकडेवारी उपलब्ध आहे पण याहीपेक्षा मधमाशीचे महत्त्वाचे कार्य कृषिक्षेत्रात आहे. या कार्याची आकडेवारी शक्य नाही व म्हणून याचे महत्त्व सामान्य माणसास ज्ञात नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते हे कार्य मध व मेण यांच्या उत्पादनाच्या तुलनेत अंदाजे दसपटींनी तरी जास्त असावे. कमीत कमी पन्नास तरी फळे-फुले व वन्य झाडांचे परागण मधमाशीवर अवलंबून असावे. अमेरिकेतील एका पाहणीत असे आढळले की, २२ प्रकारची फळझाडे व ३३ प्रकारची अन्नधान्ये निर्माण करणारी पिके यांचे उत्पादन जर मधमाश्या त्यांच्या सान्निध्यात असतील, तर बरेच वाढते.

या क्षेत्रात बऱ्याच शास्त्रज्ञांनी काम केले आहे. त्यात सी. के. श्प्रेंगेल, चार्ल्स डार्विन, एम्. बी. वेट, डब्ल्यू. एच्. ब्रिटन, आर्. हटसन इ. शास्त्रज्ञांचे काम विशेष उल्लेखनीय आहे. मधमाशी स्वत:च्या व पोळ्यात असलेल्या आपल्या परिवाराच्या निर्वाहाकरिता आजूबाजूच्या झाडांच्या फुलांतून मकरंद व परागकण जमा करते आणि हे करत असतानाच फुलांचे परागण करते. मधमाशीची शरीररचना या कार्यास योग्य अशीच आहे. मकरंद व परागकणांचा साठा पोळ्यात होत असल्याने मधमाशीच्या झाडाकडे वारंवार खेपा होतात व झाडावरची बहुतेक सर्व फुले त्या धुंडतात.

मधमाशीपालनात मधमाशीचे पोळे लाकडी पेटीत असते. ही मधुपेटी जेथे गरज लागेल तेथे म्हणजे फळबागा, फुलबागा, शेते इत्यादींच्या सान्निध्यात हलविता येते. यामुळे मधमाशीस मकरंद व परागकण मिळतात आणि फुलांचे नकळत परागण होते. कीटकनाशके, जंगलतोड, प्रदूषण इत्यादींमुळे परागण करणाऱ्या कीटकांच्या इतर जातींचा नाश होत आहे. याउलट नव्या जमिनी लागवडीखाली येत आहेत आणि फळबागा वाढत आहेत. यांचे परागण करण्यास मधमाश्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास होणे आवश्यक आहे. मधमाशीपालन आणि शेतमालाचे व फळबागांचे उत्पादन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. याकरिता मधमाशीपालक, बागाईतदार व शेतमालक यांनी एकमेकांशी सहकार्य केले पाहिजे.

वनस्पतींच्या फुलात किंजदल व केसरदल (परागकोशयुक्त तंतूसारखे दल) असे अनुक्रमे स्त्री-व पु-ल्लिंगी घटकधारक भाग असतात [⟶ फूल]. त्यांच्या परस्पर संयोगाने बीजधारणा किंवा फलधारणा होते. याकरिता परागण ही क्रिया आवश्यक आहे. काही वनस्पतींत एकाच फुलातील अथवा एकाच झाडावरील अनेक फुलांतील किंजल्क (किंजदलाचे टोक) व पराग (केसरदलापासून निघालेले सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) यांचा संयोग झाल्यास ह्या क्रियेस स्वपरागण किंवा स्वफलन असे म्हणतात. भात, गहू, वाल, वाटाणा यांसारख्या पिकांत बव्हंशी या पद्धतीने फलधारणा होते. या पिकांचे उत्पादन मधमाशी किंवा तत्सम कीटकांवर अवलंबून असत नाही.

काही वनस्पतींत निरनिराळ्या झाडांच्या फुलांतील परागांचे परस्पर सिंचन होते. या क्रियेस परपरागण असे म्हणतात. ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या बाबतीत एका झाडावरील परागकण दुसऱ्या झाडावरील फुलावर पडतात व यामुळे फलधारणा होते. अशा झाडांना परागणाकरिता मधमाश्यांची किंवा तत्सम कीटकांची आवश्यकता असते. फुलांतील मकरंद व पराग मधमाश्या गोळा करतात. हे करत असताना एका झाडावरून त्याच जातीच्या दुसऱ्या झाडावर त्या जातात. त्यांच्या केसाळ शरीरावर पहिल्या झाडावरील फुलातले असंख्य परागकण चिकटलेले असतात. या स्थितीत मधमाशी त्याच जातीच्या दुसऱ्या झाडावरील फुलात शिरली, तर या परागकणांचे सिंचन नकळत दुसऱ्या फुलात होते व ते किंजल्कावर पडून नंतर फलधारणा होते. मकरंद व पराग गोळा करण्याकरिता मधमाश्यांनी जर एखाद्या विशिष्ट वनस्पतीची निवड केली, तर त्या वनस्पतीवर फुले असेपर्यत मधमाश्या दुसऱ्या वनस्पतीकडे जात नाहीत. वनस्पतींशी एकनिष्ठ राहणे हे मधमाश्यांचे वैशिष्टय आहे. इतर कीटक एका जातीच्या फुलावरून दुसऱ्या जातीच्या फुलावर जातात. तसे मधमाशीचे नाही. या वैशिष्ट्यामुळे परपरागणाच्या कार्यात मधमाशी जास्त महत्त्वाची आहे.

बहुतेक कडधान्ये, गळिताची धान्ये, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी इ.भाज्या, बहुतेक फळझाडे, कापूस, कांदा, लसूण इ. पिके परपरागणाने येतात. हे परपरागण प्रामुख्याने मधमाश्या किंवा तत्सम कीटक करतात. पीक फुलावर असताना जर मधमाश्यांची पोळी जवळपास असली, तर पिकात वाढ होण्याची खूपच शक्यता असते. इतर देशांप्रमाणे भारतातही मधमाश्यांची पोळी शेताजवळ व फळबागेत ठेवून त्यांचे परिणाम आजमवण्यात आले आहेत. काही पिकांचे उत्पादन वाढल्याचे आढळले आहे, तर काही पिकांची प्रत सुधारली आहे. यासंबंधीची आकडेवारी पाहिली, तर असे आढळून येते की, पिकाच्या उत्पादनात मधमाश्यांमुळे झालेली वाढ, त्यांच्यापासून मिळणाऱ्या मध व मेण यांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. यावरून मध व मेण हे मधमाश्यांपासून मिळणारे दुय्यम उत्पन्न होय, असे समजल्यास चालेल. इतर काही देशांत शेतमालाच्या उत्पादनात मधमाशीच्या महत्त्वाच्या भूमिकेची जाणीव झाली आहे. भारतात मात्र अजून शेतकऱ्यांना याची विशेष जाणीव झालेली नाही.

मकरंदाचे संपादन व मधाचा संग्रह : जेव्हा मधमाश्या नियमितपणे पोळ्यातून बाहेर जातात व तितक्याच नियमितपणे मकरंद व पराग यांचे ओझे घेऊन परत येताना दिसतात, तेव्हा मकरंद संपादनाचे कार्य जोरात चालू आहे असे समजावे. पोळ्यातून बाहेर पडताच ताशी २४ ते ४० किमी. वेगाने मधमाशी उड्डाण करू लागते व त्वरित सरळ रेषेत जाऊन फुलावर बसते, परत येताना मात्र ओझ्यामुळे तिचे उड्डाण थोडे मंदावते. मार्गनिर्देशन (मार्गाची दिशा निश्चित करण्याच्या ) व उड्डाण कार्यात मधमाशी अत्यंत तरबेज आहे. उडत असताना पंखांच्या जलद हालचालींनी ती इंग्रजी आठाच्या (8) आकड्याप्रमाणे वर, पुढे, खाली, मागे अशा रीतीने मार्ग क्रमते. अशा प्रकारच्या उड्डाणामुळे तिला नुसते दूरवर उडून जाता येते असे नाही, तर आपल्या स्वत:च्या वजनापेक्षा जास्त वजनही वाहून नेता येते. जेव्हा कामकरी माशी नको असलेल्या आपल्यापेक्षा जड असलेल्या नरास उचलून, उडत जाऊन बाहेर फेकून देते तेव्हा तिच्या शक्तीची कल्पना येते.

मधमाशीस प्रत्येक बाजूस दोन पंख असतात. यांपैकी पुढील पंख आकारमानाने मोठे असतात तर मागील त्यांपेक्षा लहान असतात; पण उड्डाणात हे दोन्ही पंख जणू काही एकच असल्यासारखे कार्य करतात. जेव्हा कसरतीसारख्या वेड्यावाकड्या उड्या घ्यावयाच्या असतील, तेव्हा मात्र पुढील व मागील पंखांच्या हालचाली भिन्न-भिन्न असतात. विमाने जितक्या अचूकपणे व सहजगत्या जमिनीवर उतरतात तितक्याच अचूकपणे मधमाश्या पोळ्याच्या प्रवेशपट्टीवर (उतरत्या फळीवर) उतरतात. थंडी संपल्यावर जेव्हा वनस्पती फुलतात तेव्हा मधमाश्याची मधुरस गोळा करण्याकरिता वर्दळ सुरू होते. निरनिराळ्या फुलांचे निरनिराळे हंगाम असतात.

फुलापासून पोळ्याकडे परतणारी मधमाशी आपल्या स्वत:च्या वजनाच्या निम्म्या वजनाचा मकरंद घेऊन येते. ४००ग्रॅ. मध तयार करण्याकरिता मधमाशीस सु. ३७,००० उड्डाणे करावी लागतात. प्रत्येक उड्डाणास अंदाजे ३५ ते ६० मिनिटे लागतात. हा वेळ पोळ्यापासून फुलाचे अंतर व हवामान यांवर अवलंबून असतो.

मकरंद म्हणजे मध नव्हे. हा मधाकरिता वापरण्यात येणारा कच्चा माल आहे व यापासून मधमाशी आपल्या शरीरात मध तयार करते. मधमाशीच्या शरीरात पचन तंत्रातील उदरापूर्वीच्या भागास मधु-जठर म्हणतात. फुलांतून मुखावाटे ओढून घेतलेला मकरंद या मधु-जठरात साठविला जातो व त्यात मधमाशीच्या ग्रंथीतून निर्माण झालेली काही एंझाइमे [जीवरासायनिक विक्रियेस मदत करणारी प्रथिने; ⟶ एंझाइमे] मिसळली जातात. या प्रक्रियेमुळे मकरंदातील शर्करेचे डेक्स्ट्रोज व लेव्ह्युलोज या मधात आढळणाऱ्या शर्करांत रूपांतर होते. बाहेरून मकरंद आणणाऱ्या माश्यांच्या मधु-जठरात या प्रक्रियेस सुरुवात झालेली असते. या माश्या पोळ्यात शिरल्याबरोबर हा मकरंद आपल्या तोंडातून पोळ्यात असलेल्या तरुण कामकरी माश्यांच्या तोंडात घालतात. त्यांच्या मधु-जठरात राहिलेली प्रक्रिया पूर्ण होते. असे झाले म्हणजे या माश्या आपल्या मधु-जठरातील मध काढून पोळ्यातील फणीच्या कोशात साठवितात व तेथे हळूहळू मधाचा संचय होतो. पोळ्यातील कामकरी माश्या आपले पंख सतत हालवत ठेवून पोळ्यात हवा खेळवतात व यामुळे मधात असलेल्या जादा पाण्याचे बाष्पीभवन होते. हे झाले म्हणजे टिकणारा मध तयार होतो व नंतर त्या कोशावर मेणाचे झाकण लावले जाते.

ज्या वेळी पोळ्यात नैसर्गिक रीत्या जमविलेल्या अन्नाचा साठा कमी होतो किंवा तुटवडा पडतो, त्या वेळी अन्न म्हणून मधमाश्यांना साखरेचा पाक देतात.  हे करण्याची आवश्यकता थंडीच्या दिवसात पडते कारण या वेळी झाडावर विशेष फुले नसतात आणि त्यामुळे मकरंद व पराग जमविता येत नाहीत. थंडी संपून वसंत ऋतू सुरू झाला म्हणजे साखरेच्या पाकाऐवजी खडीसाखर देण्यात येते. थंडीचा हंगाम सुरू झाला व बाहेरून अन्न मिळविणे कठीण झाले की, पोळ्यात असलेल्या नरांना बाहेर हाकलण्याची मोहीम सुरू होते कारण त्यांना अन्न पुष्कळ लागते व ते काहीही काम करीत नाहीत. त्यांना एकदा बाहेर हाकलल्यावर पुन्हा आत प्रवेश मिळत नाही. बाहेर काढण्यापूर्वी काही दिवस त्यांना उपाशी ठेवण्यात येते.

काही मधमाशीपालक थंडीच्या दिवसांत आपल्या पोळ्याचा गठ्ठा बांधून ठेवतात. या गठ्‍ठ्यास माश्यांना बाहेर जाण्यास प्रवेशद्वार असते. व थंडीपासून संरक्षणाकरिता कागद किंवा त्यासारख्या प्रकाराचे वेष्टन असते.  या गठ्‍ठ्यात पुरेशी खेळती हवा व पुरेसा अन्न पुरवठा असेल याची काळजी घेतली जाते. थंडी संपल्यावर पुन्हा हे गठ्ठे पूर्ववत मधुपेटीत ठेवले जातात.

मधाचे विलगीकरण : पोळ्यातीलमधास जो स्वाद असतो, तो टिकवणे महत्त्वाचे असते.  मध काढण्यापूर्वी मधमाश्यांना उठवावे  लागते. हे काम धूम्रकाच्या साहाय्याने करतात; पण या क्रियेत मधास धूराचा वास लागण्याचा संभव असतो. स्वत: डोक्यावर जाळी घालून मध जमा करणे सर्वात चांगले पण यात काही मधमाश्या नांगी मारण्याचाही संभव असतो. मधुकोशातील चौकटीवर असलेल्या फण्यांतून मध अलग करावा लागतो. या फण्यातील कोशाच्या दोन्ही बाजूंस असलेली मेणपटले योग्य त्या आकाराच्या चाकूने दूर करावी लागतात व नंतर ही मध भरलेली फणी यंत्रात ठेवून ते यंत्र फिरविले की, फणीतील मध उत्सर्गकात पडतो आणि त्याच्या तळाशी असलेल्या छिद्रातून तो काचपात्रात किंवा इतर स्वच्छ धातूपात्रात जमा  केला जातो. नवीन सुधारित मध-उत्सर्गक यंत्रे निघाली आहेत; त्यामुळे हे काम बरेच सोपे झाले आहे. जमा केलेला मध गाळण्यात येतो. हा मध मेणाने बंद केलेल्या कोशांतून मिळविलेला असल्यामुळे तो मुळातच परिपक्व असतो व हवाबंद काचपात्रात किंवा डब्यात ठेवला म्हणजे बरेच दिवस टिकतो.

प्रमाणित आकारमानाच्या चौकटीत असलेल्या फणीतून सर्व परिस्थिती अनुकूल असल्यास अंदजे १.३ किग्रॅ. मध मिळू शकतो. मोकळी झालेली चौकट पुन्हा मधुपेटीत बसविता येते. काही प्रगत देशांत मधाचे  विलगीकरण करणारे व विक्रीकरिता हवाबंद काचपात्रात तो भरणारे कारखाने निघाले आहेत. या कारखान्यास ‘मधुगृह’ असे म्हणतात. मधमाशीपालकाने मध भरलेल्या चौकटी या कारखान्यात नेऊन दिल्या की, यांतील मध काढून त्याचा योग्य तो मोबदला दिला जातो.

मेण : मधाप्रमाणेच मेणाचेही उत्पादन पोळ्यापासून मिळते. मधमाशीपालनास सुरूवात केल्यावर पहिल्या वर्षी फारसे मेण मिळत नाही. जसजसे मधोत्पादन वाढते तसतसे मेणाचे उत्पादनही वाढते.

कामकरी माशीच्या उदराच्या अधर (खालच्या) भागावरील खंडावर असलेल्या ⇨ कायटिनयुक्त चर्मावर मेण निर्माण करणाऱ्या ग्रंथी असतात.  या ग्रंथीखालचा भाग आरशासारखा चकचकीत असतो. या ग्रंथीची उत्पत्ती अधिचर्म कोशिकांपासून (शरीराला आच्छादणाऱ्या म्हणजे मोकळ्या पृष्ठभागाला झाकणाऱ्या समान कोशिकांच्या–पेशींच्या–थरातील कोशिकांपासून) झालेली असते. मेणाचा स्राव प्रथम द्रवरूप असतो. हा स्राव वाळल्यावर त्याचे पत्रीसारखे तुकडे बनतात. या मेणाचा उपयोग पोळ्यातील फण्या तयार करण्याकरिता व त्यांतील मध भरलेला कोश बंद करण्याकरिता केला जातो. या ग्रंथी फक्त कामकरी मधमाश्यांतच आढळतात. या माश्या वयाने १२ ते १८ दिवसांच्या झाल्या की, या ग्रंथी पूर्णपणे कार्यान्वित होतात. शेवटच्या चार उदरखंडांत जेथे खंडांचा एकमेकांशी संयोग होतो त्या जागेतून हे मेण बाहेर येते. चार उदरखंडांच्या प्रत्येक बाजूस एक अशा आठ मेणाच्या पत्र्या बाहेर दिसतात. मेण निर्माण होण्यास ३३–३५ से. तापमान असावे लागते. मध व मकरंदापासून मेण तयार होते. डब्ल्यू. व्हाइटकोम्ब या शास्त्रज्ञांच्या मते १ किग्रॅ. मेण तयार करण्यास मधमाश्यांना सरासरी ८.१० किग्रॅ. मध वापरावा लागतो.

जी. एफ. टरानॉव्ह यांनी परागकणांपासून मधमाश्याकडून मेणनिर्मिती  करविली. नुसते साखरेचे पाणी मधमाश्यांना देऊनही मेण निर्मिती करता आली; पण या प्रयोगात मधमाश्यांचे वजन २०% घटते, असे आढळले. यावरून असे दिसते की, मधमाश्यांनी आपल्या शरीरातील प्रथिने मेणनिर्मितीत वापरली असावीत.

मेणनिर्मितीच्या कार्यात गुंतलेल्या कामकरी मधमाश्या प्रथम खूप मध पितात व हळूहळू सु. २४ तासांत या मधापासून मेणनिर्मिती करतात. पोळे बांधण्यास व मेणाने फण्या चिकटविण्यास लागणारी उर्जाही त्यांना या मधापासून मिळते.

शरीराबाहेर मेणाच्या पत्र्या टाकल्यावर त्यांवर पुढे काय प्रक्रिया केली जाते, याचा अभ्यास डी. बी. कॅस्टील यांनी केला आहे. मागील पायांवर असलेल्या काट्यांनी  मेणाच्या पत्र्या उदराखालून उचलून तोंडात घेतल्या जातात व तेथे जंभांच्या (जबड्यांच्या) साहाय्याने त्यांचे चर्वण होते. या चर्वणामुळे मेणाच्या पत्र्यांत जंभ ग्रंथीतील रस मिसळला जातो व हे मिश्रण छिद्रिष्ट (स्पंजासारख्या)स्वरूपात फणी चिकटविण्यास वापरले जाते. थोड्याच काळात ते घट्ट व मऊ बनते. उदराच्या अधर भागांतून मेणाची एक पत्री पायाने काढून, तोंडात घालून, तिचे चर्वण होऊन फणी चिकटविण्याच्या जागेवर पोहोचविण्यास सु. ४ मिनिटे लागतात.

मेणाच्या साहाय्याने पोळे बनविण्याचे किंवा मध भरलेल्या कोशांचे तोंड बंद करण्याचे काम असंख्य कामकरी मधमाश्या एकत्र येऊन करतात. मेणनिर्मिती  थांबली की, या मेण ग्रंथींचा र्‍हास होतो व त्या जागी पुन्हा अधिचर्म कोशिका तयार होतात.

पोळ्याच्या फण्यांतील कोशांची झाकणे मेणाची  असतात. ही झाकणे आणि निरनिराळ्या कारणांमुळे निरूपयोगी झालेल्या फण्या यांपासून मेण काढले जाते. जर फण्यांतून १,००० किग्रॅ. मध मिळाला, तर त्यांच्या झाकणांपासून १० ते १२ किग्रॅ. मेण मिळते. मेण काढण्यापूर्वी फण्यांचा पृष्ठभाग कापून ही कोशांची झाकणे बाजूस काढली जातात. ही झाकणे गरम पाण्यात वितळविली म्हणजे त्यापासून मेण मिळते.

बहुतेक मधुगृहांत व मधमाशीपालन केंद्रांत मेण काढण्याकरिता उत्सर्गक यंत्र असते. सौर उर्जेवर कार्य करणारी अशी यंत्रेही आता वापरात आली आहेत. फण्यांतील कोशांची झाकणे, फण्यांचे तुकडे, निकामी झालेल्या फण्या इत्यादींपासून मेण काढले जाते. उन्हाने उत्सर्गक तापला म्हणजे मेण वितळते व त्याचे थेंब खालील भांड्यात पडतात. जेव्हा जास्त प्रमाणात मेण काढावयाचे असते, तेव्हा फण्यांचे तुकडे पाण्यात उकळतात व मेण वितळले म्हणजे गाळून ते निराळे करतात. थंड झाल्यावर मेणाचा जाड थर भांड्याच्या तळाशी तयार होतो. हलकी  मलद्रव्ये या थरावर व जड मलद्रव्ये या थराखाली स्थिरावतात. चाकूने किंवा सुरीने ही मलद्रव्ये मेणावरून खरवडून काढली जातात. 

मेणाचे भौतिक व रासायनिक गुणधर्म ‘मेण’ या नोंदीत दिलेले आहेत. मेणाचा सर्वात जास्त उपयोग सौंदर्यप्रसाधानाच्या उद्योगधंद्यात होतो.

कातडी मऊ रहावी म्हणून वापरण्यात येणारा ‘क्रिम’ या मलईसद्दश सौंदर्यप्रसाधनात विरंजित (रंग काढून टाकलेले ) मेण हाच मुख्य घटक असतो. पुष्कळशी मलमे, धावन द्रव व इतर सौंदर्यप्रसाधनांतही मेण वापरले जाते. भारतात स्त्रिया कोरडे कुंकू लावण्यासाठी अगोदर मेण लावून त्यावर कुंकू लावतात. मेणसद्दश कृत्रिम पदार्थाचा शोध लागल्यामुळे उद्योगधंद्यात मधमाशीनिर्मित नैसर्गिक मेणाचा वापर कमी प्रमाणात होऊ लागला आहे. रोमन कॅथलिक व इतर चर्चमध्येही धार्मिक समारंभास लागणाऱ्या शुद्ध मेणाच्या मेणबत्त्या या नैसर्गिक मेणापासून केल्या जातात. मधमाशीपालनात कृत्रिम पोळी तयार करताना नैसर्गिक मेण वापरले जाते. हे मेण खराब होत नाही. पोळे खराब झाले किंवा निकामी झाले की, पुन्हा हे मेण दुसरे पोळे तयार करण्यास उपयोगी पडते. यामुळे हे मेण मेणपत्रे तयार करणाऱ्या कारखान्यांना विकणे सोयीस्कर पडते व याच्या बदल्यात मधमाशीपालनास लागणारी इतर साधने त्यांच्याकडे त्वरित मिळू शकतात.

मेणाचा इतर क्षेत्रांतही उपयोग केला जातो. दंतवैद्यकात दातांचे ठसे घेण्यास, काही औषधियुक्त मलमे करण्यास, प्रतिकृती (मॉडेल) करण्यास, तसेच लाकडी सामान, फरशी, पादत्राणे व इतर कातडी वस्तूंना पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यात मेण हा एक मुख्य घटक असतो.

मेण काढल्यानंतर मलद्रव्ययुक्त असा जो चोथा शिल्लक राहतो, त्याला ‘स्लमगम’ असे म्हणतात. यावर रासायनिक प्रक्रिया करून रेझीन, डिंक यांसारखी द्रव्ये मिळतात.

प्रोपोलिस : हा एक चिकट पदार्थ पोळ्यात आढळतो.मधमाश्या याचा उपयोग पोळ्याच्या बाजू व फण्या बळकट करण्याकरिता, चिरा बुजविण्याकरिता, प्रवेशद्वारे लहान करण्याकरिता किंवा पोळ्यात शिरलेल्या उपद्रवी प्राण्यांना बंदिस्त करण्याकरिता करतात. या पदार्थामुळे पोळ्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो.

निरनिराळ्या वनस्पतींच्या कळ्यांपासून प्रोपोलिस जमा केले जाते. मुंग्यांसारख्या कीटकांपासून पोळ्याचे संरक्षण करण्याकरिता मधमाशी या द्रव्याचे कडे पोळ्याच्या प्रवेशद्वाराभोवती बांधते. कामकरी माश्यांच्या समूहातील काही माश्यांकडेच फक्त प्रोपोलिस जमविण्याचे काम असते. या माश्या प्रोपोलिसांचा साठा असलेल्या कळीच्या भागांवर आपल्या जंभाने चीर पाडतात व हे द्रव्य जमा करून पायावर असलेल्या परागकणांच्या पावासारख्या गोळ्यावर चिकटवितात. हे सर्व करण्यास सु. एक तास लागतो. प्रोपोलिस घेऊन मधमाशी पोळ्याजवळ आली की, दुसरी कामकरी माशी  तिच्या पायावर असलेले प्रोपोलिस घेऊन पोळ्यात जेथे गरज असेल तेथे नेऊन ठेवते. प्रोपोलिसाचे ओझे उतरले की, मोकळी झालेली पहिली मधमाशी पुन्हा प्रोपोलिस जमा करण्यास बाहेर जाते. जरूर भासेल तेव्हा प्रोपोलिस जमा करणाऱ्या कामकरी माश्या मकरंद जमा करण्याचे कामही करू लागतात.

उपउत्पादने : परागकण : फुलातील धुलिकणांसारख्या लघुबीजुकांना (प्रजोत्पादक सूक्ष्म घटकांना) पराग असे म्हणतात. त्याचे आकारमान २ ते २,५०० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-३मिमी.) इतका सूक्ष्म असतो. हे परागकण जमा करण्यास मधमाशीला आपली मुखांगे, अंगावरील सूक्ष्म केस आणि पायांच्या तीन जोड्या या इंद्रियांचा उपयोग होतो. शरीराचे हे सर्व भाग एकाच वेळी कार्य करीत असतात. परागकोशातून मुखांगाच्या साहाय्याने परागकण खरवडून काढले जातात व त्यांत मकरंद कालवून ते ओले केले जातात. अंगावरील सर्व परागकण स्पर्शकांच्या (स्पर्शेंद्रियांचे व पकडण्याचे कार्य करणाऱ्या मुखाभोवतील लांब लवचिक वाढींच्या) व पायांच्या साहाय्याने तोंडात नेले जातात आणि त्यांत मकरंद मिसळला जातो. सर्व ओल्या केलेल्या परागकणांचे पावासारखे गोळे केले जातात. मधमाशीच्या शरीराच्या तुलनेत ह्या पावाचे आकारमान बरेच मोठे असते. हा परागकणांचा पाव मधमाशीच्या सर्वात शेवटच्या पायांच्या जोडीवरील अंतर्गोल पृष्ठभागावर थापला जातो. यास ‘पराग परडी’ असे म्हणतात. या पावावरच इतरत्र वनस्पतींतून जमा केलेले प्रोपोलिस हे द्रव्यही थापले जाते. हे ओझे घेऊन कामकरी मधमाशी पोळ्यात येते व तेथे पोळ्यात असणाऱ्या मधमाश्या तिला हे ओझे उतरविण्यास मदत करतात. परागकण फणीच्या कोशांत साठविले जातात आणि त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो. प्रोपोलिस जरूर त्या ठिकाणी पोळ्यात पोहोचविले जाते.

प्रयोगाअंती असे आढळले आहे की, एका वसाहतीत ४,५४० मधमाश्यांची निपज होण्यास ४५०ग्रॅ. परागकण अन्नरूपात लागतात. या हिशोबाने एका क्रियाशील वसाहतीत एका वर्षात सु. २० किग्रॅ. परागकण गोळा केले जातात. जेव्हा पोळ्यात माश्यांचे प्रजनन वेगाने होत असते, तेव्हा दर दिवशी ४००ते ८०० ग्रॅ. परागकण गोळा केले जातात. दर वर्षी सु. ५२ किग्रॅ. परागकण अन्न म्हणून वापरण्यात येतात. पायांवर परागकणांचे ओझे घेऊन जेव्हा मधमाशी पोळ्यात येते तेव्हा सर्व काही ठीक आहे व प्रजननाची तयारी चालू आहे, असे समजावे.  परागकण निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यात पिवळा, नारिंगी, फिकट हिरवा ते किरमिजी व काळा हे प्रमुख रंग होत. परागकण सूक्ष्मदर्शकाने तपासले म्हणजे असे आढळून येते की, निरनिराळ्या जातींच्या फुलांतून मिळालेल्या परागकणांचे आकार निरनिराळे असतात. हे परागकण कधीकधी मधात आढळतात व त्यांच्या आकारावरून मध कोणत्या फुलांपासून मिळविला आहे, याचे अनुमान करता येते.

प्राचीन काळी ग्रीस, ईजिप्त, इराण, चीन इ. देशांत परागकणांचा अन्न म्हणून उपयोग केला जात असे, असे उल्लेख सापडतात. खजुराच्या परागकणांत काही जनन ग्रंथी पोषक हॉर्मोने (उत्तेजक द्रव्ये) असतात, असे आढळले आहे. मधमाश्यांनी जमा केलेले परागकण खाण्यायोग्य असले, तर ते मधमाश्यांकडून पोळ्यात शिरण्यापूर्वी जमा करून त्यांच्या गोळ्या बनविल्या जातात व पूरक अन्न म्हणून हे वापरले जाते. अजूनही या विषयावर पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. परागकणांत सर्वसाधारणपणे प्रथिने २६% असतात, तर अ, ब (सर्व प्रकार), क, ड व ई ही जीवनसत्वे व खनिजेही असतात. शर्कराचे प्रमाण २९%, तेले ५ % व जलांश ३ ते ४ % असतो.

राजरस : (रॉयल जेली). हा रस निर्माण करणाऱ्या ग्रंथी कामकरी माश्यांच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंस असतात. हा रस मुख्यत्वेकरून ज्या कामकरी माश्यांच्याकडे डिंभ व राणीमाशी यांच्या संगोपनाचे कार्य असते, त्यांच्या डोक्यावरील ग्रंथींत निर्माण होतो. पहिले काही दिवस अंड्यांतून बाहेर पडलेल्या सर्व डिंभांना हा रस दिला जातो. राणीमाशीस मात्र पूर्ण विकास झाल्यानंतर व प्रौढावस्थेतही हा रस पुरविला जातो. या ग्रंथी दोऱ्याच्या गुंत्यासारख्या दिसतात. कामकरी माश्या हा रस आपल्या तोंडाने डिंभांना व राणीमाशीस देतात. राणीमाशीचा पूर्ण विकास होण्यापूर्वी काही दिवस ती असलेले कोश बंद केले जातात. कोश बंद करण्यापूर्वी त्यांत पुरेशा राजरसाचा साठा ठेवण्यात येतो. विकासावस्थेत राणीमाशीच्या जनन तंत्राची व इतर अवयवांची वाढ या रसामुळे होते. कामकरी माश्या या पूर्ण विकास न झालेल्या माद्या होत. त्यांना जर हा रस दिला, तर त्यांच्या जननेंद्रियांची वाढ होऊन त्या अंडी घालतात. या रसामुळे त्यांचे आयुष्य १० ते २० पटींनी वाढते.

हा रस जमा करून व्यापारी द्दष्टीने त्याची विक्रीही केली जाते यासाठी राणीमाश्यांना किंवा त्यांच्या डिंभावस्थेतील माश्यांना त्यांच्या कोशातून बाहेर काढून त्यात साठविलेला राजरस गोळा केला जातो. जेव्हा हे कार्य अल्प प्रमाणात करावयाचे असेल तेव्हा लहान चमचे वापरून तो काढला जातो; पण जर मोठ्या प्रमाणात हे काम करावयाचे असेल, तर निर्वात पंपाचा [⟶ निर्वात] उपयोग करतात. रस गोळा केल्यानंतर राणामाशीस पुन्हा कोशात ठेवतात व पुन्हा १०–१५ दिवसांनी याच पद्धतीने रस गोळा करतात. या प्रकारात पोळ्याची हानी होणे किंवा मधोत्पादनावर परिणाम होणे हे टाळता येत नाही. मधुपेटीत फण्यांच्या चौकटी ठराविक कालांतराने ठेवणे, मधुपेट्यांची संख्या वाढविणे इ. मार्ग अनुसरून या राजरसाचे उत्पादन वाढविता येते.  हा जमा केलेला रस काचपात्रात किंवा प्लॅस्टिकच्या पात्रात भरून प्रशीतकात (रेफ्रिजरेटरमध्ये) ठेवावा लागतो.

खाद्यपदार्थ निर्माते व औषधांचे कारखानदार यांच्याकडून या रसास  मागणी असते. याचे निर्जलीकरण करून चूर्णाच्या स्वरूपातही हा विकला जातो. मधात मिश्रण करून किंवा जीवनसत्वात मिसळून गोळ्यांच्या स्वरूपात हा बाजारात विक्रीस येतो. राजरसात प्रथिने ४५%, शर्करा २०%, मेद (स्‍निग्ध पदार्थ) १५%, खनिजे ४% व जीवनसत्वे १% असतात. यातील विशेष प्रभावी रसायनांचे स्वरूप अद्याप समजलेले नाही. तसेच मानवावर या रसाचे काय परिणाम होतात, याविषयीही अचूक माहिती उपलब्ध नाही. या रसात खास औषधी गुणधर्म असल्याचा दावा करण्यात येतो, तथापि त्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप सापडलेला नाही आणि कोणत्याही अधिकृत संस्थेने त्याला औषधी म्हणून मान्यता दिलेली नाही.

मधमाशीचे आरोग्य : मधमाशीस होणारे रोग व इतर उपद्रव यांचे पुढील चार प्रकारांत विभाजन करता येईल : (१) शरीरक्रिया वैज्ञानिक विकार, (२) डिंभांचे रोग (३) जीवोपजीवीजन्य (दुसऱ्या सजींवावर उपजीविका करणाऱ्या सजींवामुळे होणारे) रोग आणि (४) विषबाधा.

शरीरक्रियावैज्ञानिक विकार : यांत आमांश हा मधमाश्यांचा सामान्य विकार आहे.मधमाश्या जात्याच स्वच्छतेविषयी व स्वत:च्या आरोग्याविषयी  प्रसिद्ध आहेत. त्या आपले पोळे स्वच्छ ठेवतात. उडत असताना म्हणजे पोळ्याबाहेर त्या मलोत्सर्जन करतात. जेव्हा त्यांना अजीर्ण होते तेव्हा त्याची परिणती आमांशात होते. अशा आजारी  मधमाश्या पोळ्यातच मलोत्सर्जन करतात. त्यांच्या मलास घाण येते व या मलाचे किरमिजी  किंवा पिवळे डाग पोळ्यांत दिसू लागतात. आमांशाची साथ पोळ्यात उद्‍भवली म्हणजे मधमाश्या बाहेर उड्डाण करीत नाहीत. जेव्हा फुलांचा हंगाम नसतो व मकरंद मिळत नाही तेव्हा मधमाश्या मावा या कीटकांनी स्रवलेला गोड पदार्थ [⟶ मधुरस) किंवा काही वनस्पतींच्या देठापासून मिळणारा रस जमा करतात. यामुळे त्यांना आमांश होतो व त्याची साथ पोळ्यात पसरते. काही वनस्पतींच्या फुलांपासून मिळविलेला मकरंद जर मधमाश्यांनी खाल्ला, तर त्यापासूनही आमांश होतो.

यावर उपाय म्हणून  पोळे कोरडे व स्वच्छ ठेवले पाहिजे. जेव्हा मकरंदाचा तुटवडा भासेल तेव्हा साखरेचा पाक मधमाश्यांस दिला पाहिजे. पोळ्यांत स्वच्छ व कोरडी हवा खेळती ठेवली पाहिजे. ही काळजी घेतली, तर मधमाश्यांना आमांशाचा आजार होणार नाही.

डिंभाचे रोग : परिदूषित संतती किंवा बिनवासाचा ‘फाउलब्रूड’ हा रोग सर्वात भयानक रोग आहे. बॅसिलस लार्व्ही या बीजाणू (सूक्ष्मप्रजोत्पादक घटक) निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूपासून हा रोग होतो. याची लागण झाली आहे, हे लक्षात येण्यास बराच वेळ लागतो. हा लागट (सांसर्गिक) रोग आहे. जर बीजाणू निर्माण होण्यापूर्वी याची लागण समजली नाही, तर नुसती एक मधुपेटीच नव्हे, तर सर्व मधुवनच नष्ट होण्याची भीती असते. या रोगाचा प्रादुर्भाव साधारणपणे उन्हाळ्यात होतो. हिवाळ्यात याचे साथीचे स्वरूप रहात नाही. डिंभ चार किंवा पाच दिवसांचे असताना याची लागण होते व लागण झालेले डिंभ अस्ताव्यस्त स्थितीत मरून पडतात. त्याचा नेहमीचा पांढरा रंग जाऊन ते पिवळे किंवा काळपट दिसतात. ज्या कोशांत हे डिंभ असतात, त्यांची झाकणे आत वळलेली व भोके पडलेली असतात.

या रोगाचे नियंत्रण करणे कठीण असल्यामुळे ज्या वसाहतीत या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्या वसाहती समूळ नष्ट करणे इष्ट ठरते. या लागण झालेल्या वसाहतींसाठी वापरलेली उपकरणे निर्जंतुक केल्याशिवाय पुन्हा वापरण्यासाठी घेतली जात नाहीत. हा रोग अमेरिकेतील मधमाश्यांत जास्त प्रमाणात आढळतो.

यूरोपीय मधमाश्यांत बॅ. प्ल्यूटॉन या सूक्ष्मजंतूमुळे डिंभ दगावतात. दगावलेल्या डिंभात नंतर बॅ. लव्ही हे सूक्ष्मजंतूही आढळतात. दुर्बल मधमाश्यांत याची लागण होते. हाही लागट रोग आहे. याचा फैलाव संबंध मधुवनात चोरमाश्यांकडून होतो. या रोगाने पछाडलेली पोळी नष्ट करणे हा एकच प्रतिबंधक उपाय आहे. बीजाणू निर्माण होण्यापूर्वी हा रोग झाल्याचे आढळले, तर काही जंतूनाशक औषधे वापरून याचे निर्मूलन करता येते.

काही जंतुजन्य डिंभांच्या रोगात वास येतो. हा रोग जास्त हानिकारक आहे व लागटही आहे. या रोगाने पछाडलेले डिंभ सरळ स्थितीत कोशांत कोरडे आढळतात व त्यांत जंतूचे बीजाणू झालेले असतात. यावर उपाय म्हणजे या वसाहती जाळून नष्ट करणे हा होय. चोरमाश्यांकडून किंवा विकतचा मध जर पोळ्यात अन्न म्हणून दिला, तर हा रोग उद्‌भवण्याचा संभव असतो.

काही वेळा अत्यंत थंडीमुळे डिंभ मरतात. हा काही रोग नव्हे. अशा रीतीने मेलेले डिंभ कामकरी माश्या उचलून बाहेर फेकून देतात.

काही वेळा डिंभ मरून त्यांची एक पिशवी बनते. असा आजार क्वचितच उद्‌भवतो. असे समुदायही नष्ट करावे लागतात.

काही वेळा फक्त नरात रूपांतर होणारे डिंभ मरतात व मेल्यानंतर ते खडूसारखे कठीण बनतात. म्हणून याला ‘चॉकब्रूड’ म्हणतात. हा रोग पेरिसायटीस एपिस या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो.

जीवोपजीवीजन्य रोग : मधमाश्यांच्या शरीरावर राहणारे काही परजीवी प्राणी आहेत. हे माइटांसारखे व त्याच वर्गातील प्राणी होत. कॅरॅपिस वुडी या सूक्ष्म माइटमुळे होणाऱ्या रोगास ‘आइल ऑफ वाइट रोग’ म्हणतात (इंग्‍लिश खाडीतील आइल ऑफ वाइट या बेटावरील मधमाश्यांपासून ही सूक्ष्म माइट १९०४ मध्ये मिळविण्यात आली होती). ही माइट मधमाशीच्या श्वासरंध्रातून वक्षभागातील श्वासनालात जाते व तेथे असंख्य अंडी घालते. कालांतराने माइटचे डिंभ सर्व शरीरभर हिंडतात व मधमाशीच्या मृत्यूस कारणीभूत होतात. मेलेल्या मधमाशीच्या शरीरातून निघून या माइट दुसऱ्या मधमाश्यांवर जातात व रोग फैलावतो. या रोगाने पछाडलेल्या मधमाशीस नीट उडता येत नाही यामुळे सर्व पोळ्याची कार्यक्षमताच संपुष्टात येते. हळूहळू सबंध मधुवनात हा रोग फैलावतो. यावर उत्तम उपाय म्हणजे ज्या पोळ्यात या माइट आढळल्या त्याचा समूळ नाश करणे हा होय. यावर आता काही औषधे उपलब्ध झाली आहेत.

नोसेमा एपिस या नावाचा एक सूक्ष्म आदिजीव (प्राटोझोआ) मधमाश्यांच्या जनन तंत्रात आढळतो. मधमाशीच्या उदरात हा पाण्यातून किंवा अन्नातून शिरतो व हळूहळू सर्व मधमाश्यांस याची लागण होते. यावर योग्य असा उपाय अजून सापडला नाही. व्हालकॅंफिया (मालपीघामीबा) मेलिफिका हा आदिजीवही मधमाश्यांच्या उत्सर्जन (निरूपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणाऱ्या) नलीकेत आढळतो. याचे जीवनचक्र अजून ज्ञात नाही.

बॅ. पिसेप्टिक्स हे जंतू मधमाशीच्या रक्तात आढळतात. यामुळे विशेष असा परिणाम होत नाही.

विषबाधा : कीटकनाशके व कवकनाशके मधुवनाच्या आसपास वापरली, तर त्यांचा परिणाम मधमाशीवरही होतो व बऱ्याच वेळा मधमाश्या दगावतात.

मधमाश्यांचे शत्रू : यांना अनेक शत्रू आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे आहेत. उंदीर पोळ्यात शिरून नासधूस करतात. पिसाळलेल्या मधमाश्या मोठ्या संख्येने उंदरावर हल्ला करतात व त्यांना नांगी मारतात. यामुळे काही वेळा उंदीर मरतो. मेलेला उंदीर बाहेर टाकणे मधमाश्यांच्या शक्तीबाहेरचे काम असते. अशा वेळी मधमाश्या या उंदराभोवती प्रोपोलिसचा थर देतात. उंदीर पोळ्यात शिरणार नाही अशी व मेलेला उंदीर आढळल्यास तो त्वरित बाहेर काढून टाकण्याची काळजी मधमाशीपालकाने घेतली पाहिजे. मधमाश्यांच्या आणि राणीमाशीच्या प्रवेशद्वाराला उंदरास आत शिरता येणार नाही अशी जाळी लावली पाहिजे.

अस्वलानांही मध फार प्रिय असल्याने मधमाशीच्या नांगीचा धोका पत्करूनही अस्वले पोळ्यातील मध खातात. यामुळे पोळ्याचा व मधमाश्यांचा नाश होतो.

गांधील माशी किंवा कुंभारीण या पराग व मकरंद घेऊन येणाऱ्या मधमाशीवर हल्ला करतात. पोळ्यात शिरून या मध खातात व मेणाची झाकणे मुखांगाने तोडतात. कामकरी माश्यांपैकी पोळ्याच्या संरक्षणाचे काम ज्या माश्यांकडे असते त्या माश्या यांना सहजासहजी आत येऊ देत नाहीत.

पुष्कळदा मुंग्या पोळ्यात शिरून मध खातात. पोळी ज्या चौपाईवर ठेवली असतील त्या चौपाईचे पाय पाणी असलेल्या वाट्यांत ठेवले म्हणजे मुंग्या येऊ शकत नाहीत. हलगर्जीपणामुळे जास्त मुंग्या पोळ्यात शिरल्या, तर फण्यांची नासाडी होते.

पुष्कळदा कोळी मधुपेटीत शिरून मधुपेटीच्या कोपऱ्यात जाळी करतात. यांच्याकडून मधमाश्यांस तसा विशेष त्रास होत नाही.

गॅलेरिया मेलोनेला क्रॉइया ग्रिझेला हे दोन पतंग मधमाश्यांचे शत्रू होत. हे आपली अंडी पोळ्यातील खाचांत घालतात. अंड्यांतून अगदी लहान आकारमानाचे डिंभ बाहेर येतात व सर्वत्र पसरतात. पोळ्यातील मेण, पराग व मध हे यांचे अन्न होय. अंडी घातल्यापासून पतंग तयार होण्यास तीन ते चार आठवडे लागतात. जर मधमाश्यांचा समूह जोमदार असेल, तर अंडी घातल्याबरोबर कामकरी माश्या त्यांचा नाश करतात.

मधमाशीच्या अंगावर ब्राऊला सीका या नावाची ऊ असते. मधमाशी जो मकरंद जमा करून आणते, तो ही ऊ तिच्या तोंडातून आपल्या तोंडात घेते. या उवा बाह्य जीवोपजीवी (शरीराबाहेर पृष्ठभागावर राहून अन्न मिळविणाऱ्या) म्हणून मधमाशीच्या अंगावर जगतात. या पोळ्यातच अंडी घालतात. तंबाखूच्या पानाचा धूर जर पोळ्यात सोडला, तर त्या मधमाशीच्या शरीरावरून गळून पडतात.

काही वेळा राणीमाशी समागमाचे उड्डाण करून पोळ्याकडे परतत असली म्हणजे एखाद्या पक्ष्याच्या मध्यस्थानी पडते. किंग क्रो हा पक्षी मधमाश्या खातो. वेडा राघू (बी ईटर) या नावाचे पक्षीही मधमाश्या खातात. या पक्ष्यांना मधुवनातून हुसकावून लावणे एवढाच मधमाश्या यांच्यापासून वाचविण्याचा एक उपाय आहे.

मधमाशी हे भेकांचे आवडते खाद्य आहे. मधुवनात साधारणपणे पुष्कळ भेक इतस्तत: वावरताना दिसतात. मधमाश्यांची पोळी उंचावर असल्यामुळे व भेकांना इतक्या उंच उड्या मारता येत नसल्यामुळे सामान्यत: मधमाश्यांचे या भेकांपासून संरक्षण होते. दुर्बल मधमाश्या मधुपेटीच्या खाली घोटाळत असतात, त्यांवर हे भेक ताव मारतात व यामुळे या नको असलेल्या मधमाश्यांचा संहार करून एक प्रकारे ते मधमाशीपालकावर उपकारच करतात.

यांशिवाय झुरळे, काही पतंग, चोरमाश्या, चतुर, खंडोबाचा किडा, वाळवी इ. कीटकांपासूनही मधमाश्यांना आणि पोळ्याला उपद्रव पोहोचतो.

चोरमाश्या : स्वत:च्या पोळ्यातील मध कमी झाला व जवळपास मकरंद जमा करण्यासारखी  फुले नसली, तर अशा पोळ्यातील काही माश्या दुसऱ्या पोळ्यातून मधाची चोरी करतात.  अशा चोरी करणाऱ्या माश्यांत पिवळ्या रंगाच्या माश्यांचे प्रमाण जास्त असते.  या चोरी करणाऱ्या मधमाश्या वयाने प्रौढ आणि आकारमानाने मोठ्या असतात. याच्या अंगावरचे केस झडलेले असल्यामुळे यांची पाठ गुळगुळीत दिसते. या माश्या पोळ्याच्या प्रवेशद्वाराजवळ घुटमळताना दिसतात व संधी मिळाली की आत शिरतात. हळूहळू यांचे प्रमाण वाढत जाते. आत शिरल्यावर यांची व पोळ्यातील माश्यांची लढाई जुंपते व यात पोळ्यातील फण्यांचे नुकसान होते. एकदा मधाची चोरी करण्याची सवय लागली  की त्या पोळ्यातील इतर माश्याही हेच करू लागतात व नैसर्गिक मार्गाने मकरंद जमविण्याचे सोडून देतात.

चोरमाश्या आढळल्याबरोबरच मधमाशीपालकाने आपल्या पोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. पोळ्याचे प्रवेशद्वार लहान केले व पोळे चांगले बळकट असले म्हणजे रक्षण करणाऱ्या कामकरी माश्या चोरमाश्यांना आत येऊ देत नाहीत. तसेच जवळजवळ असणाऱ्या पोळ्यांतील मध एकाच वेळी काढून घेतला व मधाचे सुगंध बाहेर दरवळणार नाही याची काळजी घेतली म्हणजे चोरमाश्या पोळ्याकडे आकर्षित होत नाहीत. (चित्रपत्र ५७).

पहा : पराग; परागण; मध; मधमाशी; मेण.

संदर्भ :  1.  Crane, E. Beekeeping- Past and Present, Hamilton, 1ll., 1963.

2. Flower,  A. B. Bee-keeping  up-to Date, London, 1952

3. Gront, R. A. Ed, The Hive and the Honey Bee, Hamilton I11, 1963.

4. Ribbands, C. R. The Behaviour and Social Life of Honeybees, New York, 1968.

5. Singh, S. Beekeeping in I India, New Delhi, 1962.

6. Smith, F. G. Beekeeping, New York, 1963.

7. Whitehead, S. B.; Shaw, F. R. Honeybees and their Management, Princeton, 1959.

देवडीकर, गो. बा.; ठकार, चिं. वि.; इनामदार, ना. भा.

कामकरी मधमाशी फुलातील मकरंद गोळा करीत आहे
राणीमाशी व तिची देखभाल करणाऱ्या कामकरी माश्या
मारकारा (कुर्ग) येथील केंद्रातील मधुपेटी
महाबळेश्वर येथील जंगलात ठेवलेल्या काही मधुपेट्या
अंडी व डिंभ बंदिस्त ठेवलेला शिशुकोश
मध-उत्सर्जक यंत्र