मतंग : महाभारतरामायण या ग्रंथांत निर्दिष्ट एक ऋषी. ब्राह्मणाशी विवाह झालेल्या एका ब्राह्मणीने एका नाभिक पुरूषाशी केलेल्या व्यभिचारातून याचा जन्म झाल्यामुळे हा चांडाळ ठरला. त्यामुळेच मतंग या शब्दापासून बनलेल्या मातंग या शब्दाला चांडाळ असा अर्थ प्राप्त झाला, असे दिसते. मातंग हे मतंगाचे पर्यायी नावही मानले जाते. मराठीतील मांग हा जातिवाचक शब्द मातंग या संस्कृत शब्दावरूनच बनला आहे. कर्नाटकात पूर्वी मातंग वंशाचे एक राज्य होते आणि या नावावरूनच मादिग हे जातिवाचक नाव बनले असावे, असे काही संशोधक मानतात. मतंग एक होता की अनेक, याविषयी निश्चित माहिती मिळत नाही.

गाडीला जुंपलेल्या गाढवाच्या पिलाला याने चाबकाचे फटकारे मारले. तेव्हा व्याकुळ झालेल्या त्या पिलाला त्याच्या आईने सांगितले, की चांडाळ क्रूर असतात आणि मतंगाचे हे वागणे त्याच्या जातीला साजेसेच आहे. इतके दिवस आपली जन्मकथा ठाऊक नसल्यामुळे स्वतःला ब्राह्मण मानणाऱ्या मतंगाने आता गर्दभीकडून ती जाणून घेतली व ब्राह्मण्यप्राप्तीसाठी पुनःपुन्हा कठोर तप केले. प्रत्येक वेळी इंद्राने त्याला नकार दिला. शेवटी इंद्राने त्याला स्वेच्छेने कोठेही संचार करणे, हवे ते रूप धारण करणे आणि ब्राह्मण व क्षत्रिय यांना विरोध न केल्यास त्यांना पूज्य ठरणे हे वर दिले. तसेच ऐश्वर्यप्राप्तीसाठी स्त्रिया तुझी पूजा करतील आणि त्या तुला छंदोदेव मानतील, असे सांगितले. ब्राह्मण्य जन्मजात असते, हे सांगण्यासाठी महाभारतात ही कथा आली आहे.

प्रियंवद या गंधर्वाने घमेंडखोरपणा केल्यामुळे मतंग ऋषीने त्याला हत्ती होण्याचा शाप दिला आणि त्याच्या उःशापानुसार अजराजाने हत्तीच्या गंडस्थळात बाण मारल्यावर तो पुन्हा गंधर्व बनला, असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे. ऋष्यमूक पर्वतावर पुन्हा आल्यास मस्तक गळून पडेल असा शाप त्याने वालीला दिला, अशी कथा वाल्मिकी रामायणात आढळते. हरिश्चंद्राचा पिता त्रिशंकू याने वसिष्ठपुत्रांकडे सदेह स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी त्याला चांडाळ होण्याचा शाप दिला व त्यामुळे त्याला मतंग हे नाव मिळाले. संगीतशास्त्रावरील बृहद्देशी हा संस्कृत ग्रंथ रचणारा मतंग नावाचा एक संगीतशास्त्रकारही मध्ययुगात होऊन गेला आहे.

कूचिमार नावाच्या शिष्याने केलेल्या विनंतीनुसार मतंग ऋषीने त्याला राजश्यामलारहस्योपनिषद सांगितले, असे त्या उपनिषदाच्या प्रारंभी म्हटले आहे. मतंगाश्रम व मतंगकेदार या दोन स्थलांना मतंगाचे नाव प्राप्त झाले आहे. ऋष्यमूक पर्वताजवळील मतंगाश्रमाला राम व सीता यांनी भेट दिली होती. तेथील फुले कधीही कोमेजत नाहीत कारण ती मतंग शिष्यांच्या घामापासून बनली आहेत, अशी पुराणकथा आढळते. शबरी या आश्रमात तप करीत असल्याचा व मतंग हा तिचा गुरू असल्याचा निर्देशही आढळतो. मतंगकेदार या ठिकाणी स्नान केल्यास हजार गाईच्या दानाचे पुण्य लाभते, अशी समजूत होती.

साळुंखे, आ. ह.