पाखंड : स्वतःचा रूढ धर्मपंथ न सोडताच त्याच्याविरुद्ध नवे सिद्धांत मांडणाऱ्या किंवा त्यात बदल वा सुधारणा सुचविणाऱ्या व्यक्ती, मते, संप्रदाय इत्यादींना सनातनी लोक पाखंडी वा पाखंड असे म्हणतात. स्वतः त्या धर्मपंथाचा एक घटक असूनही त्याच्या विषयी संशय व्यक्त करणे, त्यावर टीका करणे, त्याच्या सिद्धांतांचा व धर्मग्रंथांचा अर्थ रूढ अर्थाहून वेगळ्या पद्धतीने लावणे इ. परंपराविरोधी कृत्ये पाखंडी आचारात मोडतात. सर्वसामान्यपणे कोणत्याही क्षेत्रातील रूढ विचारसरणीपेक्षा नवी व निराळी विचारसरणी म्हणजे पाखंड असेही म्हणता येते. त्या अर्थाने राज्यशास्त्र, कला इ. विषयांतही पाखंड मते असतात. ‘पाखंड’  हे मूळ ‘पाषण्ड’ या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप असून संस्कृतमध्येही ते रूढ झाले होते. भारतात जैन, बौद्ध, चार्वाक इ. वेदविरोधकांना नास्तिक व पाखंड अशा दोन्ही संज्ञा लावल्या जात असल्या, तरी नास्तिक व पाखंड यांमध्ये फरक आहे. सामान्यतः नास्तिक हे ईश्वरादी पारलौकिक सत्ता नाकारत असतात. पाखंडी मात्र सनातन परंपरागत धर्मशाहीच्या प्रस्थापित स्वरूपात बदल वा सुधारण करून त्याला आव्हान देत असतात. आपले मत जाणीवपूर्वक, आग्रहपूर्वक व पुनःपुन्हा मांडणे, हा पाखंडी लोकांचा बाणा असतो.

परंपरेविरुद्ध बंड करणे आणि स्वतःच्या बुद्दीला न पटणाऱ्या गोष्टी त्याज्य मानणे, ही माणसाची एक महत्त्वाची प्रवृत्ती आहे. हिंदूंच्या वेदांमध्ये आणि खिस्त्यांच्या बायबलमध्येही पाखंडांचे निर्देश आढळतातच. विष्णूने मायामोहाचे रूप घेऊन असुरांना पाखंड शिकविले, देवगुरू बृहस्पतीने शुक्राचार्यांचे रूप घेऊन असुरांना मूढ बनविण्यासाठी पाखंड शिकविले इ. पुराणकथांतून भारतीय पुराणांनी पाखंडाची उत्पत्ती सांगणाचा प्रयत्न केला आहे. 

पाखंडी व्यक्तीने स्वतःचा रूढ धर्म पूर्णपणे सोडलेला नसतो. ज्याने दुसरा धर्म स्वीकारलेला असतो किंवा जो जन्मतःच दुसऱ्या धर्माचा असतो, त्याला पाखंडी म्हटले जात नाही. उदा., हिंदूंच्या दृष्टीने वेदांना कमी लेखणारे वा वेदविरोधी असे पाशुपत, भैरव, पांचरात्र, जैन, बौद्ध, चार्वाक इ. पाखंडी असले, तरी मुसलमान, ख्रिस्ती इ. लोक पाखंडी नव्हेत. कॅथलिक असूनही कॅथलिक तत्त्वांना विरोध करणारे लोक हे रोमन कॅथलिक धर्माच्या दृष्टीने पाखंडी होत परंतु यहुदी, मुसलमान इ. लोक पाखंडी नव्हेत. प्रॉटेस्टंट लोक त्यांच्या चर्चने लावलेला बायबलचा अर्थ न स्वीकारणाऱ्या अनुयायांना पाखंडी म्हणतात. असे असले, तरी आपले सिद्धांत न मानणाऱ्या सर्वांनाच लक्षणेने पाखंड हा शब्द वापरण्याची प्रथाही आढळते.

पाखंडी लोकांना अहिष्णुतेने व तिरस्काराने वागविले जाई. पाखंड हा शब्द शिवीसारखाच वापरला जाई. ते महापापी असतात, त्यांची शास्त्रे ही मोहशास्त्रे होत, त्यांना आश्रय देणारांनाही नरकात जावे लागते, ते नीती, धर्म, सद्गुण इत्यादींना पारखे झालेले असतात इ. विचार मांडले जात. वस्तुतः एखादी व्यक्ती पाखंडी असली म्हणजे अनीतिमानही असतेच, असे नाही. तिच्या नीतिमत्तेच्या कल्पना वेगळ्या असतात एवढेच. भारतात त्यांना स्पर्श करणे वा पाहणे, त्यांच्याशी संभाषण करणे, त्यांना धर्मकृत्यांत वा उत्सवात बोलावणे इ. गोष्टी निषिद्ध मानल्या जात परंतु त्यांचा शारीरिक छळ केल्याची उदाहरणे मात्र फारशी नाहीत. चार्वाकाला जिवंत जाळले, या अनुमानाला भक्कम पुरावा नाही. इस्लामने मात्र पाखंडी असणे हा शारीरिक शिक्षेस पात्र असा गुन्हा मानला होता. रोमन कॅथलिक चर्चने पाखंडी लोकांविरुद्ध धर्मन्यायमंडळे (इन्क्विझिशन) नेमली होती. लोकांना या मंडळांची इतकी दहशत वाटे, की ते खाजगी संभाषणातील शब्दही जपून उच्चारत असत. एखाद्याने आपल्या पाखंडाची कबुली दिली, तर त्याला क्षमा करून प्रायश्चित्त सांगितले जाई परंतु इतरांना मात्र बहिष्कार टाकणे, संपत्ती जप्त करणे, घरेदारे जाळणे, देहान्त शासन देणे इ. प्रकारे छळले जाई. पाखंडांना केवळ आश्रय दिला, तरी लोकांचा वडिलार्जित संपत्तीवरचा वारसाहक्क नष्ट होई आणि असा आश्रय न देण्याची शपथ राजपुत्रांनाही घ्यावी लागे.

पाखंडांमुळे सनातन्यांच्या ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा, गतानुगतिकत्व इ. दोषांवर आघात केले जातात. रूढींचे अस्तित्व, पुरोहितांची सत्ता व उपजीविका इत्यादींना धोका संभवतो. बुद्धिप्रामाण्य, विवेक, वस्तुनिष्ठ विचार व पुरोगामित्व यांना चालना मिळते वैचारिक गुलामगिरी कमी होते विचारकलह आणि विचारस्वातंत्र्य यांना प्रोत्साहन मिळून समाजाची प्रगती होते. परंतु त्याबरोबरच पाखंडी विचाराच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सनातनी लोकांचे ऐक्य वाढते, ते आपले युक्तिवाद अधिक समर्थपणे व सुसूत्र पद्धतीने मांडतात. रूढ कर्मकांड अधिक जाचक व बंधनकारक केले जाते. त्यामुळे रूढ विचारांचा पगडा वाढण्याचाही धोका संभवतो.

साळुंखे, आ. ह.