मच्छू : गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील याच नावाच्या नदीवरील प्रमुख प्रकल्प. मच्छू ही राजकोट जिल्ह्यातून वाहणारी एक प्रमुख नदी असून ती सौराष्ट्र पाठारावरील आनंदपूर उच्चभूमीत उगम पावते. जिल्ह्यातून सु. ११० किमी. अंतर वाहत जाऊन ती उत्तरेस छोट्या रणाला मिळते. या नदीवर दोन धरणे बांधण्यात आलेली आहेत. त्यांपैकी मच्छू–१ हे घरण वांकानेर तालुक्यात वांका नेरपासून २३ किमी. वर असलेल्या जलसिका गावाजवळ बांधण्यात आलेले आहे धरणाच्या कामाला १९४९ मध्ये सुरूवात होऊन ते १९६१–६२ मध्ये पूर्ण झाले. यापासून ८,९०३ हे. क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. मच्छू–२ हे धरण मोरवी तालुक्यात मोरवीपासून १० किमी. वरील जोधपूर या गावाजवळ बांधण्यात आले आहे. १९६०–६१ मध्ये धरणाच्या कामाला सुरूवात झाली. यापासून ७,२८४ हे. क्षेत्राला पाणीपुरवठा होतो.

मच्छू नदीच्या जलवाइन क्षेत्रात ११ ऑगस्ट १९७९ रोजी तुफान पर्जन्यवृष्टी होऊन मच्छू–२ हे धरण फुटले. त्यामुळे बरीच प्राणहानी आणि वित्तहानी झाली. पुरामुळे १,४८५ लोक प्राणास मुकले, तर ६५ लोक बेपत्ता झाले १,०३३ कोटी रुपयांची वित्तहानी झाली. त्यांपैकी मोरवी येथील घड्याळाच्या कारखान्याचे ५ कोटी रूपयांचे नुकसान झाले.

चौधरी, वसंत