रतनगढ : राजस्थान राज्याच्या चुरू जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४३,३६६ (१९८१). हे बिकानेरच्या पूर्वेस सु. १२८ किमी.वर असून दिल्ली-बिकानेर या लोहमार्गावरील महत्त्वाचे प्रस्थानक आहे. धान्य, लोकर, गुरे यांचे व्यापारकेंद्र व हातमाग, लोकरी विणमाल, मातीची भांडी, कातडी आणि हस्तिदंती वस्तू इत्यादींचे उत्पादनकेंद्र म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे.

अठराव्या शतकाच्या अखेरीस महाराजा सूरतसिंग यांनी मूळच्या कोलासर या छोट्या गावालगत हे शहर वसविले. १८२८–५१ या काळात महाराजा रतनसिंग यांनी या शहराची योजनाबद्ध आकर्षक मांडणी करून शहराचा विकास घडवून आणला व शहराला रतनगढ हे नाव दिले. येथे एक जुना किल्ला, धर्मशाळा असून शहराभोवती दगडी तटबंदी आहे. शहरातील अनेक आकर्षक मंदिरांपैकी जैन मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. हे शहर बिकानेर, सरदारशहर, सूजानगढ या शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे.

चौंडे, मा. ल.