मक्येफ्का : रशियातील युक्रेन प्रजासत्ताकाच्या डोनेट्स्क विभागातील कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध असलेले औद्योगिक शहर. लोकसंख्या ४,४२,००० (१९८१). हे लोहमार्ग प्रस्थानक असून डोनेट्स कोळसा क्षेत्रात डोनेट्स्क शहराच्या ईशान्येस १६ किमी. अंतरावर ग्रूसेकाया नदीकाठी वसले आहे. मक्येफ्का नावाच्या एका छोट्या गावाजवळ १८९९ मध्ये दमीत्रीयेफ्स्क ही एक खाणकामगार वसाहत स्थापन करण्यात आली. रशियाच्या पंचवार्षिक योजनाकाळात डोनेट्स कोळसा क्षेत्रातील सर्वांत मोठे धातुकाम व खाणकाम उद्योगाचे केंद्र म्हणून या वसाहतीची झपाट्याने वाढ झाली. पूर्वीच्या मक्येफ्का गावाचा हिच्यात समावेश होऊन १९३१ मध्ये या सबंध वसाहतीचे मक्येफ्का असे नामकरण करण्यात आले. या परिसरात कोळशाच्या बऱ्याच खाणी असून रसायने, सिमेंट, कोक, झोतभट्टी, लोह आणि पोलाद, पोलादी नळ्या, पादत्राणे, खाद्यपदार्थ इत्यादींचे कारखानेही आहेत. शहरात एक खाणकाम संशोधन संस्थाही आहे. कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील तेलक्षेत्रे व डोनेट्स्क प्रदेश यांना जोडणारे तेल व नैसगिक वायू यांचे नळमार्ग येथून जातात.

चौधरी, वसंत