भोगांश : (भोग). आकाशातील ज्योतीचे स्थान खगोलावर निश्चित करण्यासाठी योजिलेल्या आयनिक पद्धतीतील एक सहनिर्देशक. कदंब (क्रांतिवृत्ताचा-सूर्याच्या वार्षिक भासमान गतीचा मार्ग दर्शविणाऱ्या वर्तुळाचा-ध्रुव) व ज्योती यांमधून जाणारे बृहद्‌वृत्त (ज्योतीमधून जाणारे क्रांतिवृत्तास लंब असलेले वर्तुळ) क्रांतिवृत्तास म्हणजे आयनिक वृत्तांस ज्या बिंदूत मिळते, त्या बिंदूचे वसंतसंपात बिंदूपासून पूर्वेकडे मोजलेले कोनीय अंतर म्हणजे भोगांश होय. हे अंतर शून्य ते ३६० अंश असे मोजतात. वसंतसंपात बिंदू दरवर्षी सु. ५० विकला पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे ज्योतीच्या (उदा., ताऱ्याच्या) भोगांशात सूक्ष्म बदल होत जातात. यासाठी आकाशातील ज्योतीचे भोगांश देताना वर्षांचाही उल्लेख करावा लागतो.

पहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति शर.

ठाकूर, अ. ना.