बँटिग, सर फ्रेडरिक ग्रांट : (१४ नोव्हेंबर १८९१–२१ फेब्रुवारी १९४१). कॅनेडियन वैद्य व संशोधक. ⇨ चार्ल्‌स हर्बर्ट बेस्ट यांच्याबरोबर ⇨ इन्शुलीन या महत्त्वाच्या हार्मोनासंबंधी [⟶ हॉर्मोने] केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨जॉन जेम्स रिकार्ड मॅकलाउड यांच्या समवेत विभागून मिळाले.

त्यांचा जन्म ॲलिस्टन, आँटॅरिओ येथे झाला. टोराँटो विद्यापीठाची एम्. बी. ही वैद्यकीय पदवी त्यांनी १९१६ मध्ये मिळवली. पहिल्या जागतिक महायुद्धात कॅनेडियन लष्करी वैद्यकीय सेवेत असताना फ्रान्समध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ देण्यात आला. सुद्धसमाप्तीनंतर काही काळ त्यांनी विकलांग चिकित्सेचा पुन्हा अभ्यास केला व काही काळ लंडन(आँटेरिओ) येथे शस्त्रक्रिया विशारद म्हणून व्यवसाय केला आणि तेथील वेस्टर्न विद्यापीठाच्या वैद्यकीय शाळेत प्रयोगनिदर्शक म्हणूनही काम केले. १९२२ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली.

मे १९२१ पासून ते टोराँटो विद्यापीठाच्या शरीरक्रियाविज्ञान विभागात काम करीत होते. ⇨अग्‍निपिंडाच्या कार्याबद्दलच्या काही कल्पना त्यांनी जे. जे. आर्. मॅकलाउड या तेथील प्राध्यापकांना सांगितल्या व त्यांच्या परवानगीने ते प्रमुख असलेल्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांना संशोधन कार्यास मदतनीश म्हणून नुकत्याच पदवीधर झालेल्या बेस्ट यांची मॅकलाउड यांनी नेमणूक केली. जुलै १९२१ मध्ये त्यांनी कुत्र्यावरील प्रयोगान्ती प्रायोगिक ⇨ मधुमेहावर गुणकारी ठरलेला क्रियाशील पदार्थ शोधून काढला. त्यानंतर रात्रंदिवस संशोधन करून नोव्हेंबर १९२१ मध्ये मधुमेहावर गुणकारी असलेले इन्शुलीन शुद्ध स्वरूपात मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. ११ जानेवारी १९२२ रोजी पहिल्या मानवी रुग्‍णावर ते वापरण्यात आले. टोराँटो जनरल रुग्‍णालयात या औषधाची चिकित्सात्मक चाचणी करण्यात आली व ते यशस्वी असल्याचे सिद्ध झाले.

इन्शुलीन शुद्ध स्वरूपात मिळण्यामध्ये प्रथम काही अडचणी होत्या. मॅकलाउड यांनी जे. बी. कॉलिप नावाच्या जीवरसायनशास्त्रज्ञांस या प्रश्नाकडे लक्ष पुरविण्यास सांगितले व त्यांनी सर्व अडथळे दूर करून चिकित्सेस उपयुक्त असे इन्शुलीन तयार केले.

नोबेल पारितोषिक मिळविणारे बँटिंग व मॅकलाउड हे पहिले कॅनेडियन शास्त्रज्ञ होते. या पारितोषिकाकरिता आपले सहकारी बेस्ट यांची निवड न झाल्याबद्दल बँटिंग नाराज होते. पारितोषिक स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यातील अर्धी रक्कम बेस्ट यांना दिली. मॅकलाउड यांनीही आपल्या पारितोषिकाची अर्धी रक्कम कॉलिप यांना दिली.

कॅनेडियन संसदेने १९२३ मध्ये बँटिंग यांना पुढील संशोधनासाठी ७,५०० डॉलरचे वर्षासन दिले. त्याच वर्षी टोराँटो विद्यापीठात ‘बँटिंग आणि बेस्ट वैद्यकीय संशोधन विभाग’ स्थापण्यात आला व त्यांना या विभागाचे प्रमुख नेमण्यात आले. इन्शुलिनाशिवाय ⇨ अधिवृक्क ग्रंथी बाह्यक, कर्करोग आणि सिकतामयता (सिलिकॉन डाय-ऑक्साइडयुक्त धूळ श्वसनावाटे फुप्फुसात जाऊन होणारा रोग) हेही त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

त्यांना १९२२ मध्ये टोरँटो विद्यापीठाने स्टार सुवर्णपदक दिले व १९२३ मध्ये चार्ल्स मिकल फेलोशिप दिली. १९३४ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब मिळाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते वैमानिकीय वैद्यकावर संशोधन करीत होते व या विषयावर ब्रिटिश शास्त्रज्ञांबरोबर विचारविनिमय करायला जाण्यासाठी प्रवास करीत असताना त्यांचे विमान न्यू फाउंडलंडमध्ये कोसळले आणि या अपघातात ते मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.