दत्त : (१८७५–१८९९). अर्वाचीन मराठी कवी. संपूर्ण नाव दत्तात्रेय कोंडो घाटे. त्यांचा जन्म अहमदनगरचा. शालेय शिक्षण अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबई (विल्सन कॉलेज) आणि इंदूर (ख्रिश्चन कॉलेज) येथे झाले. १८९८ मध्ये ते कलकत्ता विद्यापीठाचे बी. ए. झाले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या शिकवणुकीचा दत्तांच्या मनावर काहीसा परिणाम झालेला होता. त्यांचे वडील प्रार्थना समाजाचे सदस्य असल्यामुळे तेही संस्कार त्यांच्या मनावर झालेले होते. गायनवादनाचा त्यांना विशेष छंद होता.महाविद्यालयीन जीवनातच दत्तांनी कविता करावयास सुरुवात केली. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी (रोमँटिक) कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. पदवी मिळविल्यानंतर नोकरीनिमित्त दत्त बडोद्यास गेले. तेथे कवी ⇨चंद्रशेखरांशी त्यांचा स्नेह जमला. तेथे काव्यात्म जीवनात काल घालवीत असतानाच प्लेगने त्यांना अकाली मृत्यू आला.

दत्तांच्या संगृहीत रूपाने उपलब्ध असलेल्या कवितांची संख्या सु.५० आहे. कवितेसंबंधीची उत्कट निष्ठा त्यांच्या ‘प्रिये-कविता सुंदरी’ सारख्या कवितेतून प्रत्ययास येते. ऐतिहासिक, प्रणयात्म, निसर्गपर अशी विविध प्रकारची कविता दत्तांनी लिहिली. ‘विश्वामित्रीच्या काठी’ ही त्यांची निसर्गपर कविता विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी काही सुंदर शिशुगीतांचीही रचना केली. ‘ताई गुणाची माझी छकुली’, ‘या बाई या’, ‘मोत्या शीक रे अ आ ई’, ‘गडे तू बोलत का नाही?’ यांसारखी त्यांची शिशुगीते आजही लोकप्रिय आहेत. ‘वत्सलतेचे कवी’ म्हणून ते ओळखले जातात. ‘नीज नीज माझ्या बाळा’ ह्या त्यांच्या प्रसिद्ध अंगाईत कारुण्य आणि वात्सल्य ह्यांचा परिणामकारक आणि एकात्म आविष्कार आढळतो.

दत्तांच्या कवितेने पूर्ण आकार घेण्याच्या आतच त्यांचे निधन झाले. तथापि अर्वाचीन मराठी कवितेच्या आरंभीच्या मानकऱ्यांपैकी ते एक होत. प्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ ⇨वि. द. घाटे  हे दत्तांचे पुत्र होत. दत्तांची कविता  त्यांनी संपादिली आहे (१९२१).

जोग, रा. श्री.