बहामा : कॉमन्-वेल्थ ऑफ द बहामाज. उत्तर अटलांटिक महासागराच्या दक्षिण भागातील वायव्य—आग्नेय दिशेने पसरलेला स्वतंत्र द्विपसमूह, अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्याच्या दक्षिण किनाऱ्याच्या पूर्वेस ८० किमी. व हैतीच्या उत्तरेस सु. ११२ किमी. वर असून २०º५०’ उ. ते २७º२५’ उ. अक्षांश व ७२º३७’ प. ते ८०º३२’ प. रेखांश यांदरम्यान ही बेटे पसरली आहेत. कर्कवृत्त या बेटांच्या मध्यातून जाते. क्षेत्रफळ १३,९३९ चौ. किमी. लोकसंख्या २,१८,००० (१९७७). राजधानी नॅसॉ (लोक. १,२९,८७७ — १९७७ अंदाज).

या द्विपसमूहामध्ये एकूण ७०० बेटे व २,००० पेक्षा जास्त द्विपकांचा  समावेश  होतो.  द्विपसमूहातील  एकूण  २०  बेटांवरच मानववस्ती आढळते. न्यू प्रॉव्हिडन्स (लोकसंख्या १,०१,५०३ – १९७० अंदाज), ग्रेट अँबको (६,५०१), हार्बर आयलंड व स्पॅनिश वेल्स (३,२२१), ग्रँड बहामा (२५,८५९), कॅट बेट (२,६५७), लाँग बेट (३,८६१), मेअग्वान (५८१), ईलूथर (६,२४७), एक्सूम (३,७६७), सॅन साल्व्हादोर किंवा वट्लिंग्ज आयलंड (७७६), अँकलिन्स बेट (९३६), क्रुक्ड बेट (६८९), इनाग्वा (१,१०९), सर्वांत मोठे अँडॉस (८,९४५), विमिनी (१,५०३), रॅग्ड बेट (२०८) ही बेटे प्रमुख असून न्यू प्रॉव्हिडन्स व ग्रँड बहामा या बेटांना शासकीय व आर्थिक दृष्टया अधिक महत्त्व आहे. देशाची राजधानी न्यू प्रॉव्हिडन्स बेटावरच आहे. टूर्क्स व कायकोस बेटे भूरचनेच्या दृष्टीने बहामा बेटांचाच भाग असली, तरी राजकीय दृष्टया त्यांवर जमेकाचा अधिकार आहे.

भूवर्णन : ही बेटे फ्लॉरिडा राज्यापासून फ्लॉरिडा सामुद्रधुनीने, तर क्यूबापासून ओल्ड बहामा व निकोलस खाडीमुळे वेगळी झाली आहेत. बहामा बेटे म्हणजे सागरांतर्गत उथळ, चुनखडीयुक्त अश्मपठारांचे भाग होत. यांपैकी काही बेटे प्रवाळांची बनलेली आहेत. या बेटांची निर्मिती प्लाइस्टोसीन काळात झालेली असून बेटांचे पृष्ठभाग सपाट, लांबलचक पण कमी उंचीचे व रूंदीचे आहेत. काही बेटांवर लहान टेकड्याही आढळतात. बहुतेक टेकड्या बेटांच्या पूर्व भागातच दिसून येतात.अँड्रास बेटावर जास्तीत जास्त उंची २२ मी. आढळते. देशातील सर्वांत उंच भूभाग (६३ मी.) कॅट बेटावर आहे. बेटांच्या पूर्व किनाऱ्यावर नव्याने तयार झालेल्या बहुतेक टेकड्या वाळूच्या आहेत. ईलूथर व लाँग बेट यांवर सर्वांत जास्त व उंच टेकड्या आढळतात. पांढरी प्रवाळमिश्रित वाळू व समुद्राची पार्श्र्वभूमी यांमुळे किनारपट्टीचे सौंदर्य वाढले आहे. या बेटांवरील खडक सच्छिद्र असल्याने येथे भृपृष्ठीय प्रवाह आढळत नाहीत. जास्त खोल विहिरींचे पाणी खारट-मचूळ असते, तर उथळ विहिरींचे पाणी गोड असते. अशा प्रकारच्या विहिरी विशेषतः न्यू प्रॉव्हिडन्स बेटावर आहेत. अन्यत्र मात्र पिण्याच्या पाणयासाठी बव्हंशी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी टाक्याव हौद बांधून पाण्याचा साठा करण्यात येतो. बेटांवरील खोलगट व किनाऱ्यालगतच्या भआगांत दलदली व पाण्याची डबकी आढळतात.

हवामान: येथे वर्षभर सौम्य स्वरूपाचे उपोष्ण कटिबंधीय हवामान आढळते. कर्कवृत्तावरील हा प्रदेश उष्ण गल्फ प्रवाहाच्या मार्गावर असल्याने येथील हिवाळे आल्हाददायक असतात. हिवाळ्यात येथे हिमतुषारही आढळत नाहीत. येथील हिवाळ्यातील तपमान सरासरी २१ºसे.  असते.  उन्हाळे  सौम्य  असून  सरासरी  तपमान  २७ºसे. असते. मे ते ऑक्टोबर या काळात पावसाचे प्रमाण जास्त असते. पावसाची वार्षिक सरासरी ११२ सेंमी. आहे. कधीकधी जुलै व नोव्हेंबर या महिन्यांत बेटांना हरिकेन वादळांनाही तोंड द्यावे लागते तथापि त्यांचा परिणाम काही बेटांपुरताच मर्यादित राहतो.

वनस्पती व प्राणी : वनसंपदा उष्णकटिबंधीय स्वरूपाची असली, तरी बव्हंशी जमीन शेतीसाठी व शहरी विस्तारासाठी उपयोगात आणल्याने वनसंपत्ती मर्यादित आहे. अँड्रॉस, ग्रेट अँबको व ग्रँड बहामा ही बेटे जंगलयुक्त आढळतात तर पूर्वेकडील बेटांवरील बरीच जंगले लागवडीसाठी तोडण्यात आली आहेत. येथील जंगलांत ‘यलो पाइन’ व ‘कॅरिबियन पाइन’ हे वृक्ष मुख्यत्वे आढळतात. यांशिवाय ‘कॉपिसेस’ या स्थानिक नावाने ओळखले जाणारे कठीण लाकूडही काही बेटांवर आढळते. काही भागांमध्ये मात्र झुडपे आणि कमी उंचीच्या वनस्पती आहेत.  बेडूक, सरडे, साप व अनेक बिनविषारी प्राणी सर्वत्र आढळतात. दऱ्याखोर्यांनतून व गुहांतून अनेक प्रकारची वटवाघळे दिसून येतात. यांशिवाय कृंतक, रॅकून, घोरपड इ. प्राणीही आहेत. बगळे, पाणकोळी या पक्ष्यांबरोबरच शोभिवंत हंसकही आढळतात. ‘हंसक’ हा बहामाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : स्पॅनिश दर्यावर्दी क्रिस्तोफर कोलंबस यास ही बेटे प्रथम आढळली (१२ ऑक्टोबर १४९२). कोलंबसने प्रथम ज्या ग्वानाहानी बेटावर पाय ठेवला, त्याला त्याने सॅन साल्व्हादोर हे नाव दिले. पुढे येथील ‘लूकायोस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मूळ रहिवाशांना (अमेरिकन इंडियनांना) हिस्पॅनिओला व क्यूबा येथील खा-णींमध्ये कामासाठी पाठविण्यात आले. पुढील २५ वर्षांच्या कालावधी-मध्ये येथील बहुतेक सर्व मूळ रहिवासी गुलाम म्हणून हिस्पॅनिओला येथे नेण्यात आले, त्यामुळे या बेटांवरील वस्ती खूपच कमी झाली. सत-राव्या शतकाच्या मध्याला (१६४८) ब्रिटिशांनी आपली पहिली वसाहत ई-लूथर या बेटावर स्थापन केली आणि कापसाच्या लागवडीसाठी येथे निग्रो गुलामांना आणले. १६७० मध्ये ही बेटे कॅरोलायनाच्या जमीन-दारांकडे आली व १७८७ पर्यंत या बेटांचा मालकी हक्क त्यांच्याकडे रा-हिला, तरी १७१७ मध्येच कॅ. वुड्स रॉजर या पहिल्या ब्रिटिश गव्हर्नरची नेमणूक करण्यात आली. त्याने चाचे व लुटारू यांचा बंदोबस्त केला. स्पॅनिशांनी अनेक वेळा या बेटांवर हल्ले केले. १७७६ च्या सुमारास अमेरिकन सैन्य काही काळ नॅसॉमध्ये होते. १७८१ मध्ये स्पॅनिशांनी नॅसॉ शहर घेतले व संपूर्ण वसाहतीवर अंमल बसविला, परंतु १७८३ च्या पॅरिस तहामुळे ही बेटे ग्रेट ब्रिटनच्या ताब्यात आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर अमेरिकेतील अनेक ब्रिटिशधार्जिण्या लोकांनी या बेचांवर येऊन वस्ती केली. १८३८ मध्ये गुलामगिरी बेकायदा ठरविली गेल्याने निग्रो गुलामांची मुक्तता झाली व त्याबरोबरच बहामातील कापूसमळे संपुष्टात आले. त्यानंतर अमेरिकेतील यादवी युद्धात (१८६१-६५) दक्षिणेकडील बंदरांनी केलेल्या नाकेबंदीमुळे व नंतर अमेरिकेतील दारूबंदीच्या काळात दारूच्या धंद्यात या बेटांवरील लोकांनी चांगलाच लाभ उठविला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने सैनिकी तळासांठी बहामा बेटांचा उपयोग केला होता.


अमेरिकेने १९५० मध्ये ग्रेट ब्रिटनशी करार करून क्षेपणास्त्रांच्या प्रयोगांसाठी बहामा बेटांवर केंद्र उभारले. त्याच वर्षी कृष्णवर्णीय बहामी लोकांनी ब्रिटिशांचे वर्चस्व असलेल्या सत्ताधारी युनायटेड बहामियन पक्षाला विरोध करण्यास सुरूवात केली व या विरोधाचे नेतृत्व प्रोग्रेसिव्ह लिबरल पक्षाने केले बहामी स्वातंत्र्याच्या या चळवळीला अंशतः यश लाभून १९६४ मध्ये बहामाला मर्यादित स्वयंशासनाचे अधिकार देण्यात आले. लिंडेन ओ. पिंड्लिंग या पंतप्रधानाच्या  प्रयत्नांमुळे  या  अधिकारांत  १९६९  मध्ये  वाढ  करण्यात आली. या बेटांवर जानेवारी १९६७ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानानुसार पहिली निवडणूक घेण्यात आली. तीत स्वातंत्र्यवादी प्रोग्रेसिव्ह लिबरल पक्षाला बहुमत मिळून त्यांचे सरकार स्थापन झाले. बहामाला १९६८-६९ मध्ये अंतर्गत सुरक्षा, परदेशी व्यापार व संरक्षण या बाबतींत अधिक अधिकार मिळाले. सप्टेंबर १९७२ च्या निवडणुका देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या प्रश्र्नावर प्रोग्रेसिव्ह लिबरल पक्षाने लढविल्या व त्यांत हाच पक्ष बहुमताने निवडून आला. त्यामुळेच १० जुलै १९७३ रोजी राष्ट्रकुलातील एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून ब्रिटिशांनी बहामाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

स्वतंत्र बहामाचा राज्यकारभार १९७३ सालच्या संविधानानुसार चालतो. त्यानुसार देशात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला असला, तरी राष्ट्रप्रमुख म्हणून ग्रेट ब्रिटनच्या राणीने नियुक्त केलेला गव्हर्नर जनरलच हे काम पाहतो. शासनप्रमुख म्हणून पंतप्रधान असतो. देशात द्विसदनी विधिमंडळ असून त्यात १६ सदस्यांचे सीनेट किंवा वरिष्ठ सदन व ३८ सदस्यांची विधानसभा असते. सीनेटमधील नऊ सदस्य पंतप्रधानाच्या सल्ल्याने गव्हर्नर जनरल निवडतो चार सदस्य विरोधी पक्षनेत्यांकडून सुचविले जातात आणि पंतप्रधान तीन सदस्य नेमतो. विधानसभेतील सर्व सदस्य लोकनियुक्त असून त्यांची मुदत पाच वर्षाची असते. पंतप्रधानाची औपचारिक नेमणूक गव्हर्नर जनरल करतो. विधानसभेतील पक्षाचा तो नेता असतो. बहामात ‘बहामियन डेमॉक्रॅटिक’, ‘फ्री नॅशनल मूव्हमेंट’ व ‘प्रोग्रेसिव्ह लिबरल’ असे तीन प्रमुख राजकीय पक्ष आहेत.

देशात सर्वोच्च न्यायालय असून त्याखेरीज अपील न्यायालय, इतर दंडाधिकारी न्यायालये व बाल न्यायालये आहेत. १९७७ मध्ये संरक्षण दल उभारण्यात आले. देशातील ‘रॉयल बहामाज पोलीस फोर्स’ ही निमलष्करी संघटना आहे.

आर्थिक स्थिती : देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये सर्वांत जा-स्त म्हणजे ७०% उत्पन्न पर्यटन व्यवसायापासून मिळते. देशातील ५०% हून अधिक कामगार या व्यवसायात गुंतलेले आहेत. पर्यटन व्य-वसायावर पडणारा बोजा कमी व्हावा यासाठी सरकारने शेती व्यवसाया-कडेही लक्ष दिले आहे. शेती सुधारण्यासाठी नवीन योजनाही आखण्यात आल्या आहेत. देशात एकूण ८०,९३७.२ हे जमीन शेतीयोग्य असून ती बहुधा ग्रेट अँवको, अँड्रॉस व ग्रँड बहामा या बेटांवर आहे. बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते. शेतीसुधारणा, मासेमारी या दृष्टींनीही योजना आखण्यात आल्या आहेत. १९७७ मध्ये सरकारने किनाऱ्यापासून सागरात सु. ३७० किमी. पर्यंतचा प्रदेश आर्थिक उत्पादन व मच्छीमारी प्रदेश म्हणून जाहीर केला आहे. पर्यटनाबरोबरच जंगल उत्पादने हाही देशाचा महत्त्वाचा उद्योग आहे. कॅस्कॅरिला बार्क व लगद्यासाठीचे लाकूड यांची निर्यात केली जाते. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती करण्याच्या दृष्टीने सरकारने काही योजना आखल्या आहेत. विशेषतः खनिज तेलशुद्धीकरण, सिमेंट उत्पादन, औषधनिर्मिती इ. व्यवसायांची वाढ होत आहे. सरकारतर्फे छोट्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते. बहामा डॉलर हे देशाचे चलन १९६६ पासून  ठरविण्यात आले असून १०० सेंट = १ बहामा डॉलर व १ स्टर्लिंग पौंड = २.१० बहामा डॉलर १ अमेरिकी डॉलर = १ बहामा डॉलर असा १९७८ मध्ये विनिमय दर होता. देशात १, ५, १०, १५, २५ आणि ५० सेंट व १, २, ५ डॉलरची नाणी तसेच ५० सेंट आणि १, ३, ५, १०, २०, ५०, १०० डॉलरच्या नोटा प्रचलित आहेत.

वाहतूक व संदेशवहन : मोठ्या बेटांवर पक्के रस्ते असून दोन बेटांदरम्यानची वाहतूक हवाई व सागरी मार्गांनी होते. १९७८ मध्ये न्यू प्रॉव्हिडन्स बेटावर ९६५.६ किमी. लांबीचे व फॅमिली बेटांवर (मुख्यत्वे ग्रँड बहामा, क्रट, ईलूथर व लाँग बेटे) १,३६८ किमी. लांबीचे रस्ते होते. १९७६ मध्ये देशात एकूण नोंदणी केलेल्या ४८,९२८ मोटारी होत्या. देशात रेल्वे सुविधा नाही. सागरी मार्गाने ग्रेट ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडीज बेटे यांच्याशी वाहतूक चालते. याशिवाय नॅसॉ व फ्रीपोर्ट येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. न्यू प्रॉव्हिडन्स व इतर महत्त्वाच्या बेटांवर स्वंयचलित दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. दूरसंदेशवहनासाठी ३६२ किमी. लांबीच्या समुद्रातून अमेरिकेशी संपर्क साधण्यात आला आहे. देशात १९७७ मध्ये ५८,०३३ दूरध्वनी संच व २०,००० दूरचित्रवाणी संच होते. फ्रीपोर्ट येथे १९७३ मध्ये रेडिओ केंद्र उभारण्यात आले असून १९७७ मध्ये देशात १,००,००० रेडिओ संच व १६ चित्रपटगृहे होती, नॅसॉ येथून दोन दैनिके व एक साप्ताहिक प्रकाशित होते (१९७७).

लोक व समाजजीवन : बहामातील मूळचे आरावाक लोक आता शिल्लक राहिले नाहीत. सुरूवातीला ब्रिटिश वसाहतकाळात येथील लोकसंख्येत फारच थोड्या प्रमाणात वाढ होत होती. अमेरिकन व त्यांच्याबरोबरच्या गुलामांच्या वसाहतींमुळे गुलामांच्या वसाहतींमुळे येथील लोकसंख्येत वाढ होत गेली. विसाव्या शतकाच्य सुरूवातीला न्यू प्रॉव्हिडन्स बेटावर वस्ती झपाट्याने वाढत गेली. १९५३ मध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ निम्मी लोकसंख्या या बेटावर होती परंतु त्यानंतर पर्यटन व्यवसायाच्या वाढीमुळे इतर बेटांनाही महत्त्व प्राप्त झाले व तेथील लोकसंख्येचे प्रमाणही वाढले. येथील लोकांत निग्रोंचे प्रमाण जास्त आढळते. गोऱ्या लोकांमध्ये मुख्यत्वे अमेरिकन, कॅनड्डियन व ब्रिटिश अधिक संख्येने आहेत. धार्मिक दृष्टया प्रॉटेस्टंट पंथीयांचे प्रमाण जास्त आहे.


देशात मोफत शिक्षणाची सुविधा असून ५ ते १४ वर्षांपर्यत शिक्षण सक्तीचे आहे. १९७७ मध्ये देशात एकूण ७४ प्राथमिक शाळांत २३,३४८ विद्यार्थी, तर ज्युनिअर हाय, ज्युनिअर — सिनियर हाय व सिनिअर हाय मिळून एकूण ३४ विद्यालयांत अनुक्रमे ८,२९९,१०५,३१५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. देशात मिआमी विद्यापीठाशी संलग्न असलेले ‘कॉलेज ऑफ द बहामाज’ (स्था. १९७४) हे महाविद्यालय असून त्यात ३,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९७७).

समाजकल्याण व आरोग्य : नॅसॉमध्ये आरोग्यविषयक अद्ययावत् सुविधा उपलब्ध आहेत. फॅमिली बेटांवर कुटिर रूग्णालये व आरोग्य केंद्रे आहेत. यांशिवाय फिरती हवाई वैद्यक सेवाही उपलब्ध असून, तीमार्फत वेगवेगळ्या बेटांवरील लोकांच्या वैद्यकीय गरजा भागविण्यात येतात. राष्ट्रीय विमा योजनेतर्फे आजारपण, बाळंतपण, सेवानिवृत्ती इत्यादींसाठी मदतीच्या तरतुदी केलेल्या आहेत.

पर्यटन : पर्यटन व्यवसाय हा बहामाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.  स्वच्छ, निळे  आकाश  आणि  चहूबाजूला  हेलावणारा  विशाल  सागर, हिरवीगार  वनश्री, शंखशिंपल्यांनी  चकाकणाऱ्या  शुभ्र  वाळूच्या  विस्तीर्ण  पुळणी, रंगीबेरंगी  पक्षी, किनारी  भागांतील बाग-बगीचे इ. रूपांनी बहामा बेटांना नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्तच लाभलेला आहे. त्यामुळे विसाव्या शतकात या बेटांना कॅरिबियन परिसरातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील पर्यटन उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. नॅसॉ हे राजधानीचे शहर, फ्रीपोर्ट शहर त्याप्रमाणेच ग्रँड बहामा, क्रुक्ड, इनाग्वा, अँकलिन्स, न्यू प्रॉव्हिडन्स, ग्रेट अँबको, ईलूथर इ. बेटे पर्यटकांची आकर्षणे आहेत. पर्यटकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा तेथे उपलब्ध आहेत. उदा., नॅसॉ येथील रॉयल व्हिक्टोरिया हॉटेल. विशेषतः हिवाळ्यात यूरोपीय पर्यटकांची येथे फार वर्दळ असते.

संदर्भ :   1. Albury, P. The Story of the Bahamas, London, 1975. 

            2. Craton, M. A. A History of the Bahamas, London, 1962. 

            3. Mitchell, H. P. Caribbean Patterns, 1970.

            4. Severin,Timothy, The Golden Antillies, New York, 1970.

 

चौंडे, मा. ल.

राजभवनातील ऐतिहासिक तोफ राजभवन, नॅसॉ. नॅसॉ राजधानीचे विहंगम दृश्य.

बहामा