बरबँक, ल्यूथर:(७ मार्च १८४९-११ एप्रिल १९२६). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. अनेक भिन्न वनस्पतींत कृत्रिम प्रकारे संकर (मीलन) घडवून आणवून जगातील वनश्रीत बहुमोल भर टाकण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांचा जन्म लँकेस्टर (मॅसॅचूसेट्स, अमेरिका) येथे व आधीचे शिक्षण तेथेच झाले. पुढे चार वर्षे ते लँकेस्टर ॲकॅडेमीत शिकले. या काळातच शाळेबाहेरील शेतांमध्ये त्यांनी वनस्पतींसंबंधी बरीच माहिती मिळविली. लँकेस्टर ग्रंथालयातील ग्रंथाचे अवलोकन करीत असताना ⇨चार्लस् डार्विन यांचे ॲनिमल्स अँड प्लँट्स अंडर डोमेस्टिकेशन हे पुस्तक त्यांच्या नजरेस आले. ते त्यांनी वाचल्यानंतर उत्पन्न झालेल्या गोडीमुळए डार्विन यांची इतर पुस्तके, तसेच इतर अनेक विज्ञान-ग्रंथही त्यांनी वाचून काढले. त्यानंतर १८७५ पर्यंत त्यांनी लुनेन्‌बर्ग (मॅसॅचूसेट्स) जवळच्या सु. ८ हेक्टर क्षेत्रावर वनस्पतींत संकर घडवून आणण्याचे कार्य केले. त्यानंतर कॅलिफोर्नियातील सांता रोझा येथे त्यांनी एक पन्हेरी बाग बनविली व एक पादपगृह (नियंत्रित परिस्थितीमध्ये वनस्पती वाढविण्याची बंदिस्त जागा) बांधवून घेतले. नंतर या ठिकाणी त्यांचे प्रायोगिक व सर्जनशील कार्य सु.५० वर्षे चालू होते. त्यामुळे त्यांना जागतिक महत्व प्राप्त झाले. तेथे त्यांनी ज्या ‘नवनिर्मिती’ केल्या त्यांमध्ये अनेक फळे, फुले, भाज्या, धान्ये, गवते यांचा अंतर्भाव असून त्यांतील कित्येकांच्या नावांशी बरबँक यांचे नाव निगडित झाले आहे.

आपल्याभोवती निसर्गतः आढळणाऱ्या वनस्पतींपैकी विशेष गुणयुक्त जाती व प्रकार यांची निवड करून त्यांमध्ये कृत्रिम संकर [गर्भधारणा ⟶वनस्पति-प्रजनन] घडविणे व त्यातून नवीन जाती निर्माण करून त्यांची लागवड व प्रसार करणे, हेच मुख्य ध्येय होते. या त्यांच्या प्रयत्नांमुळे वनस्पति-प्रजननाकडे इतरांचे अधिकाधिक लक्ष वेधले गेले व वनस्पतिविज्ञानच्या  या शाखेचा विकास घडवून आणण्यास त्यांच्या  या कार्यामुळे फार मोठी प्रेरणा मिळाली, हे निर्विवाद आहे.

बरबँक यांच्या प्रयोगांत सु. २०० वंशांतील वनस्पतींचा समावेश होत असून अलुबुखार व बदाम यांसंबंधीच्या प्रयोगांत त्यांनी सु. ४० वर्षे खर्च केली त्यातूनच सु. ११३ नवीन प्रकार उपलब्ध झाले. त्यांपैकी सु. २० आज कॅलिफोर्निया व द. आफ्रिका येथील  महत्वाचे प्रकार आहेत. बरबँक यांनी शोधलेली नवीन महत्वाची फळे सफरचंद, सप्ताळू, बिही, चेरी, टोमॅटो, ब्लॅकबेरी इत्यादींपैकी आहेत. भाज्यांच्या ९० नवीन प्रकारांपैकी एक अतिमहत्वाचा म्हणजे ‘बरबँक बटाटा’ हा होय. हा त्यांनी १८७३ मध्ये लागवडीखाली आणला व तो आजही भरपूर पिकविला जातो. तसेच बिनकाट्याचा⇨निवडुंग हा त्यांनी गुरांच्या (व घोड्यांच्या) उत्तम चाऱ्याकरिता शोधून काढला होता. फुलझाडांपैकी शोभेकरिता लावले जाणरे शेकडो प्रकार त्यांनी निर्मिले असून त्यांपैकी ‘शास्ता डेझी’ प्रसिद्ध आहे त्याशिवाय कर्दळ, डेलिया, गुलाब, ग्लॅडिओलस, लिली, पॉपी, व्हर्बिना इत्यादींचे अनेक शोभिवंत प्रकार त्यांच्याच प्रयोगांमुळे आज उपलब्ध झाले आहेत. ल्यूथर बरबँक, व त्यांचे कार्य यांसंबंधी पुढील ग्रंथ उपलब्ध आहेत : ल्यूथर बरबँक, हिज मेथड्स अँड डिस्कव्हरीज (१२ खंढ, १९१४-१५) हाऊ प्लँट्स आर ट्रेंड टू वर्क फॉर मॅन (८ खंड, १९२१) व न्यू क्रीएशन्स (१८९३-१९०१).

बरबँक यांनी विल्बर हॉल यांच्या मदतीने हार्वेस्ट ऑफ द इर्यस (१९१७) हा आत्मचरित्रपर माहिती असलेला ग्रंथ लिहिला. बरबँक सांता रोझा येथे मृत्यू पावले.

परांडेकर, शं.आ.