कणगर : (इं. द लेसर याम, कारेन पोटॅटो लॅ. डायोस्कोरिया एस्क्युलेंटा कुल-डायोस्कोरिएसी). ही काटेरी, लवदार, वामावर्ती (डाव्या बाजूने आधारावर चढणारी) वेल बहुधा मूळची सयाम व इंडो-चायनातील आहे. भारतात ही मलबार व कोरोमंडल किनारा, दख्खन, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, प. बंगाल, आसाम व हिमालयात ९०० मी. उंचीपर्यंत आढळते. तसेच ही खासी-नागा टेकड्या, गारो टेकड्या व अंदमान बेटांवरही  आढळते. हिची पाने एकाआड एक असतात. कंद चार ते पुष्कळ, सदेठ व जमिनीच्या पृष्ठभागाजवळ घोसाने येतात. ते बशीच्या आकाराचे, गोलसर किंवा पसरट व खंडित (भाग असलेले) असतात. ते सामान्यतः १२ सेंमी. पेक्षा लांब नसतात, पण कधीकधी ५० सेंमी. लांब व तीन किग्रॅ. वजनाचे असतात. काही वाणांत उपमुळे असतात. कंदांची साल पातळ, हरिणाच्या रंगाची, पिंगट किंवा तांबूस पिंगट असते. गर मऊ, पांढरा, खाद्य व कमीअधिक प्रमाणात गोड असतो.

कणगराची लागवड आशियाच्या दमट उष्णकटिबंधीय प्रदेशांत मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्वेस पॅसिफिक बेटांपर्यंत होते. हिचे काटेरी व बिनकाटेरी असे दोन प्रकार ओळखले जातात. स्पायनोजा प्रकारामध्ये लागवडीत असलेले व रानटी आणि फॅसिक्युलेटा  प्रकारात फक्त लागवडीत असलेले वाण आहेत. 

कणगराची लागवड पूर्वी भारतात भरपूर होत असे, परंतु बटाट्याच्या लागवडीस भारतात सुरुवात झाल्यापासून हिचे क्षेत्र घटले आहे. आता हिची लागवड बिहार, मध्य प्रदेश व तमिळनाडूच्या मागास भागात होते. पावसाळ्यात हिची लागवड करतात. पीक तयार होण्यास आठ-नऊ महिने लागतात. कंद खणून काढतात. अनुकूल हवामानात ह्यांचे हेक्टरी ४० टनांपर्यंत भरपूर उत्पन्न येते. एका वेलीपासून ४.५ किग्रॅ. पर्यंत कंद  मिळतात. 

कंद पिठूळ असून त्यांत डायोस्कोरीन नसते. त्यांची चव गोडसर असते. स्वाद व पिठूळपणा या बाबतींत ते बटाट्यासारखे असतात. फॅसिक्युलेटा प्रकारात कार्बोहायड्रेटे ७१.२९%, तंतू ६.५२%, अल्ब्युमिनॉइडे १०.८२%, राख ९.६५%, चरबी १.७२% व फॉस्फरस पेंटॉक्साइड  ०.९४% असतात.

पहा:कोनफळ गोराडू.

जमदाडे, ज. वि. पाटील, ह. चिं.