आ. १. ब्ल्यूबेरी (व्हॅक्सिनम कॉरिंबोजम)

क्रेनबेरी : फुलझाडांपैकी एरिकेसी कुलातील व व्हॅक्सिनम  वंशातील रांगत्या झुडपांच्या जातींना हे नाव सामान्यपणे वापरतात तथापि काहींनी हे नाव ऑक्सिकॉकस  वंशातील फक्त चार जातींनाच वापरले आहे. ब्ल्यूबेरी, बिलबेरी, डीअरबेरी व हलकबेरी ही नावे व्हॅक्सिनम  वंशातील भिन्न जातींना लावलेली आढळतात. या वंशात एकूण सु. १३० जातींचा (विलिस यांच्या मते ३०० ते ४०० जातींचा) समावेश करतात. हलकबेरी हे नाव काहींनी (न्यू इंग्लंडमध्ये) गेलुसाकिया  या वंशातील फक्त ४९ जातींनाच लावले आहे व ब्ल्यूबेरी या नावाचा वापर व्हॅक्सिनम  वंशातील कॅनडेन्सिस, पेनसिल्व्हेनिकम, कॉरिंबोजेम  इ. जातींकरिता केला जातो (आ. १). लाल मृदुफळांच्या जातींना साधारणपणे क्रेनबेरी म्हणतात. समशीतोष्ण कटिबंधातील उत्तर प्रदेश व आफ्रिका, मॅलॅगॅसी (मादागास्कर) इ. प्रदेशांत या वनस्पती आढळतात.

आ. २. क्रेनबेरी (व्हॅक्सिनम मॅक्रोकार्पॉन)

 

जंगली अवस्थेत क्रेनबेरी (आ. २) दलदलीत वाढते लागवडीतील अमेरिकन जातीला (व्हॅक्सिनम मॅकोकार्‌पॉन) वालुकामिश्रित अम्लीय व ओलसर जमीन लागते. क्रेनबेरीच्या ऑक्सिकॉकस वंशातील तीन प्रमुख जातींपैकी ह्या मोठ्या फुलांच्या व फळांच्या जातीची लागवड प्रथमतः १८२० मध्ये अमेरिकेच्या मॅसॅचूसेट्‌स राज्यातील कॅप्टन हेन्‍री हॉल यांनी केली व त्यानंतर १८६५ च्या सुमारास न्यू जर्सीतील बेंजामिन पेंबर्टन यांनी केली. हल्ली या जातीची व्यापारी दृष्ट्या मोठी लागवड अमेरिकेच्या निरनिराळ्या भागांत केली जाते. पण व्हॅक्सिनम ऑक्सिकॉकस या लहान (उत्तरेकडील) क्रेनबेरीची लागवड मात्र फारशी यशस्वी झालेली नाही ती कॅनडा, उ. अमेरिका, उ. व म. यूरोप आणि आशिया येथे जंगली अवस्थेत आढळते व तिच्या लहान फळांची जेली वगैरे बनवितात.

क्रेनबेरीच्या बारीक व कठीण खोडाच्या जाळ्या बनतात ते सरपटत वाढणारे (व्हॅ. एरिथ्रोकार्पम या जातीत उभे व सरळ) व त्यावर लहान, लंबगोल, चकचकीत व सदैव हिरवी (व्हॅ. एरिथ्रोकार्पम या जातीत मोठी व गळणारी) पाने असतात. फुले लहान व गुलाबी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत) व अग्रस्थ (टोकास) असून पाकळ्या चार आणि किंजपुटात कप्पेही चार असतात [→ फूल]. सप्टेंबर ते ऑक्टोबरात पक्व होणारी मृदुफळे लाल, आंबट, गोलसर, मोठ्या करवंदाएवढी व खाद्य असून त्यांच्यापासून अनेक खाद्य प्रकार बनवितात. तसेच सरबते व डबाबंद खाद्य प्रकार बनवितात. यूरोपीय क्रेनबेरी [→ काऊबेरी लॅ. व्हॅक्सिनम व्हायटिस-इडिया] जंगली असून तिची आंबट कडवट फळे शिजवल्यावरच खाद्य होतात.

पहा : एरिकेलीझ.

परांडेकर, शं. आ.