पर्ल बकबक, पर्ल : (२६ जून १८९२ – ६ मार्च १९७३). अमेरिकन कादंबरीकर्त्री जन्म हिल्सबोरो, वेस्ट व्हर्जिनिया येथे. वडील चीनमध्ये धर्मोपदेशक. त्यामुळे तिचे बालपण चीनमध्ये गेले. आरंभीचे शिक्षण शांघाय येथे घेतल्यानंतर अमेरिकेत येऊन लिंचबर्ग, वेस्ट व्हर्जिनिया येथील ‘रँडॉल्फ-मॅकन वुमन्स कॉलेज’ मधून ती पदवीधर झाली (१९१४). त्यानंतर ती चीनला परतली १९१७ मध्ये जॉन लॉसिंग बक ह्या धर्मोपदेशाकाशी तिचा विवाह झाला. १९२१ ते १९३१ ह्या काळात नानकिंग विद्यापीठात शिक्षिका म्हणून तिने काम केले.

ईस्ट विंड, वेस्ट विंड ही तिची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची  ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बकने मांडलेली आहे. १९३२ मध्ये ह्याकादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ देण्यात आले. १९३४ मध्ये ती अमेरिकते आली तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि १९३५ मध्ये रिचर्ड जे. वॉल्श. ह्या प्रकाशकाशी ती विवाहबध्द झाली. १९३२ ते १९३५ ह्या काळात सन्स (१९३२) आणि ए हाऊस डिव्हाय्डेड (१९३५) अशा दोन कादंबऱ्या तिने लिहिल्या. द गुड अर्थचेच कथासूत्र ह्या कादंबऱ्यांत पुढे चालविलेले आहे तथापि ह्या कादंबऱ्यांत द गुड अर्थचा जोम आणि प्रभावीपणा दिसून येत नाही.

अमेरिकन पार्श्वभूमीवरही तिने कथा-कादंबऱ्या लिहिल्या परंतु त्या फारशा यशस्वी ठरल्या नाहीत.

बकने आपल्या वडिलांचे (द फाय्टिंग एंजल, १९३६) आणि आईचे (द एक्झाइल, १९३६) चरित्रही लिहिले आहे. माय सेव्हरल वर्ल्ड्स (१९५४) आणि ब्रिज फॉर पासिंग (१९६२) ही तिची आत्मचरित्रात्मक पुस्तके .

१९३८ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक तिला देण्यात आले. डन्बी. व्हर्माउंट येथे ती निधन पावली.

नाईक, म. कृ.