फीनिक्स – १ : (लॅ. फीनिक्स पॅल्युडोजा). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील एका तालवृक्षाचे शास्त्रीय नाव. हा वृक्ष ⇨ खजूर व ⇨ शिंदी यांच्या वंशातील आणि ⇨ पामी कुलातील (ताल कुलातील) असल्याने त्याची अनेक सामान्य शारीरिक लक्षणे त्यांच्याप्रमाणे आहेत. अंदमान व निकोबार बेटे, सुंदरबन व ब्रह्मदेश येथे तो समुद्रकिनाऱ्यावरच्या दलदलीत आढळतो. तो बंगाली भाषेत ‘हिंतल’ नावाने ओळखला जातो. याचे रेलून किंवा जमिनीसरपट वाढणारे खोड २·५-८ मी. लांब व ९ सेंमी. व्यासाचे असते व त्यापासून वर २·५-३ मी. लांबीची मोठी, संयुक्त व पिसासारखी पाने येतात त्यांची दले ३०-६० सेंमी. लांब असतात. या वृक्षांची बेटे बनलेली आढळतात. पानांच्या देठावर काटे असतात. फुलोरे स्थूलकणिश प्रकारचे [→ पुष्पबंध] ४५ सेंमी. लांब, एकलिंगी व विभक्त झाडांवर (वेगवेगळ्या झाडांवर) मार्च ते एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पे पिवळट व स्त्री-पुष्पे हिरवट. मृदुफळ लहान, १·२५ सेंमी. लांब, पिवळे व पक्व झाल्यावर गर्द जांभळे असून ते खाद्य, शीतकर (थंडावा देणारे) व शोथरोधी (दाहयुक्त सूज कमी करणारे) असते. बी एकच असते. खोडातील भेंडही खाद्य असते. लहान खोडापासून हातातील काठ्या व जून खोडापासून तराफे तयार करतात. पानांचा उपयोग छपरे, दोर, कुंपण इत्यादींकरिता करतात.

पाटील, शा. दा.