फोर्स्टर, गेओर्ख : (२६ नोव्हेंबर १७५४–१२ जानेवारी १७९४). जर्मन समन्वेषक, लेखक, शास्त्रज्ञ आणि राजकारणपटू. पोलंडमधील गदान्यस्कजवळील नासेनहुबेन या लहानशा गावात जन्म. गेओर्खचे वडील योहान राइनहोल्ट हे धर्मोपदेशक व हुषार शास्त्रज्ञ होते. १७६६ मध्ये गेओर्ख पित्यासमवेत इंग्लंडमध्ये आला. केप हॉर्न ते न्यूझीलंड या कॅ. जेम्स कुकच्या दुसऱ्या सफरीत (१७७२-७५) फोर्स्टर पितापुत्रांचा समावेश होता. गेओर्खचा प्रवासवृत्तांत ए व्हॉयिज राउंड द वर्ल्ड लंडनमध्ये (१७७७), तर त्याचे जर्मन भाषांतर बर्लिनमध्ये (१७७८–८०) प्रसिद्ध झाले. गेओर्खचा हा ग्रंथ म्हणजे वाङ्मयीन गुणवत्ता आणि शास्त्रीय माहिती यांचा संगम असलेली, जर्मन साहित्यातील एक महत्त्वाची साहित्यकृती होय. या ग्रंथामुळे गेओर्खला एक आघाडीचा जर्मन तत्त्वज्ञ व शैलीदार लेखक म्हणून मान्यता मिळाली. जगप्रसिद्ध साहित्यिक योहान गटे (१७४९-१८३२), तत्त्वज्ञ योहान गोटफ्रीट फोन हेर्डर (१७४४–१८०३), शास्त्रज्ञ व प्रवासी अलेक्झांडर हंबोल्ट (१७६९–१८५९) यांसारख्यांच्या लेखनावर त्याचप्रमाणे जर्मन शास्त्रीय व वाङ्मयीन साहित्यावर फोर्स्टरच्या उपर्युक्त ग्रंथाचा प्रभाव पडला. त्याच्या इतर लिखाणामधून दक्षिण समुद्रामधील वनस्पतींची माहिती मिळते.
फोर्स्टरने सोव्हिएट रशियाच्या लिथ्युएनियन प्रजासत्ताकातील व्हिल्निअस विद्यापीठात (स्था. १५७९) प्राध्यापक म्हणून (१७८४–८७) आणि नंतर प. जर्मनीच्या माइन्त्स विद्यापीठात (१४७७) ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. फ्रेंच राज्याक्रांतीबाबत फोर्स्टरला सहानुभूती असल्याने त्याने प. जर्मनीच्या ऱ्हाईनलँड (पलॅटिनिट) राज्यातील परंतु फ्रेंचांच्या ताब्यातील माइन्त्सच्या स्वतंत्र शासनाची बाजू १७९२ मध्ये मांडली. पुढल्याच वर्षी तो याच कामासाठी माइन्त्स शासनाच्या वतीने पॅरिसला गेला. दरम्यान जर्मनांनी माइन्त्स बळकावले आणि ‘विश्वासघातकी’ म्हणून फोर्स्टरची जर्मनांकडून अवहेलना करण्यात आली. आपल्या आयुष्याचा अखेरचा काळ त्याने पॅरिसमध्येच घालविला.
गद्रे, वि. रा. चौधरी, वसंत