फॉर्लामी : मध्य आफ्रिकेतील चॅड देशाची राजधानी. विद्यमान नाव अन्जामेना. लोकसंख्या २,४१,६३९ (१९७६). हे देशाच्या नैर्ऋत्येस, चॅड-कॅमेरून सरहद्दीवर शारी व लोगोन नद्यांच्या संगमावर वसलेले असून ते चांगले नदीबंदर आहे. लगतच्या नायजेरिया, सूदान यांसारख्या देशांशी ते सडकांनी जोडलेले आहे. 

फ्रेंचांनी लष्करी तळ म्हणून १९०० मध्ये वसविलेल्या या शहरास मेजर एल्. जे. एम्. लामी या संशोधक व लष्करी अधिकाऱ्याचे नाव मिळाले. अन्जामेना हे नवीन नाव नोव्हेंबर १९७३ मध्ये देण्यात आले. आधुनिक नगररचना असलेले हे शहर खाजगी व शासकीय उद्योगधंद्यांच्या प्रमुख कार्यालयांनी गजबजलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पर्यटनकेंद्र म्हणूनही त्याची भरभराट होत आहे. शहरात हस्तव्यवसाय, कापड व भात सडण्याच्या गिरण्या, मांस-प्रक्रिया उद्योग, कत्तलखाने यांसारखे अनेक व्यवसाय चालतात. कापूस, मीठ, द्विदल धान्ये, खजूर, मांस, जनावरे इत्यादींची निर्यात होते. मत्स्यसंशोधन केंद्र, कापूस व कापड अभ्यासकेंद्र, प्रशासकीय शिक्षण संस्था, पशुवैद्यक महाविद्यालय यांसारख्या अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था शहरात असून तेथे राष्ट्रीय विद्यापीठही (स्था. १९७१) आहे. 

लिमये, दि. ह.