फोर्ट वेन :अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ॲलन काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,००,००० (१९७९अंदाज). हे इंडियानापोलिसच्या ईशान्येस १६८किमी., सेंट मेरीज व सेंट जोसेफ या नद्यांच्या संगमाने तयार झालेल्या मॉमी नदीकाठी वसले आहे.

‌‌

मिआमी इंडियनांचे हे मूळ वसतिस्थान असून ते ‘केकीओंगा’ तसेच ‘मिआमी नगर’ म्हणून ओळखले जात असे. सतराव्या शतकात या भागात येणारा स्यर द साल हा पहिला फ्रेंच समन्वेषक. १६८०नंतर येथे फ्रेंचांनी व्यापारी ठाणे उघडले. १६८५च्या सुमारास येथे फोर्ट मिआमी हा किल्ला बांधण्यात आला. ब्रिटिशांनी१७६० मध्ये त्याचा ताबा घेतला, तर १७६३ मध्ये इंडियनांनी तो परत घेतला. १७९४ मध्ये अमेरिकन जनरल अँटोनी वेन याने इंडियनांचा पराभव केला आणि किल्‍ल्‍याला तटबंदी केली. त्याच्या नावावरून याला ‘फोर्ट वेन’ हे नाव पडले. १८१२ नंतर लोकरीचे व्यापारकेंद्र म्हणून त्याचा उत्तरोत्तर विकास होत गेला. १८४० मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला.

फोर्ट वेन हे विविध उद्योगधंद्यांचे केंद्र असून १८७१ मध्ये येथे जगातील पहि‌ले धुलाई यंत्र बनविण्यात आले. अवजड वाहने, तांब्याच्या तारा, तारनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्याहिऱ्यांचे साचे इ. उत्पादनांचे हे जगातील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. यांशिवाय इलेक्ट्रॉनीय, खनिकर्म व ‌विद्युत्उपकरणे, अन्‍नप्रक्रिया, बीर, मांस डबाबंद करणे, कागद, रेडिओ, प्रशीतक इ. उद्योगांचाही येथे विकास झालेला आहे. येथे काँकार्डीया व सेंट फ्रँसिस ही महाविद्यालये, इंडियाना तंत्रविद्यासंस्था, इंडियाना व पर्‍द्यूविद्यापीठांचे विभागीय केंद्र, फोर्ट वेन बायबल महाविद्यालय, फोर्ट वेन कला संस्था इ. शैक्षणिक संस्था आहेत.

येथील फोर्ट वेन किल्ला, अब्राहम लिं‌कन, ऑर्थर व जॉन्सन या राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत कोषागार सचि‌वाचे काम पाहणाऱ्याह्यूमकलकचे (१८०८–९५) घर, ॲलन काउंटी-फोर्ट वेन इतिहास संस्थेचे संग्रहालय, मिआमी इंडियनांचा प्रमुख लिटल टर्टल व जॉन चॅपमन (जॉनी ॲपलसीड-सफरचंदांच्या बागा उभारणार) या दोघांची स्मारके ‘लिंकन राष्ट्रीय जीवन प्रतिष्ठाना’ने उभारलेले अब्राहम लिंकनसंबंधीच्या अनेक संस्मरणीय गोष्टींचे दालन, ‘वॉर मेमोरिअल कॉलॉसिअम’ हे रंगमंडल इ. प्रवाशांची आकर्षणे आहेत.

लिमये, दि. ह.