फेन्लाँ, फ्रांस्वा द सालीन्याक द ला मॉत :(६ ऑगस्ट १६५१ – ७ जानेवारी १७१५). कॅथलिक पंथीय फ्रेंच ईश्वरविद्यावेत्ता. जन्म शातो द फेन्लाँ, पेरीगॉर (गॅस्कनी ) येथे. आरंभीचे काही शिक्षण घरी आणि काऑर येथील एका जेझुइट शिक्षणसंस्थेत. त्यानंतर पॅरिसच्या ‘कॉलेज द्यू प्लेसिस’मध्ये तत्त्वज्ञान आणि ईश्वरविद्या ह्या विषयांचा अभ्यास. १६७२ किंवा ७३ मध्ये सेंट सल्पिस सेमिनरीत (ख्रिस्ती धर्मशिक्षणसंस्था) प्रवेश. येथे अध्ययन आणि अध्यापन. त्यानंतर पॅरिसच्या आर्चबिशपने ‘न्यू कॅथलिक्स’ (इं. अर्थ) ह्या संस्थेचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक केली. प्रॉटेस्टंट पंथातून कॅथलिक पंथात आलेल्यांना धर्मशिक्षण देणे, हे ह्या संस्थेचे उद्दिष्ट. फ्रान्समधील प्रॉटेस्टंटांना काही धार्मिक स्वातंत्र्य देणारी चौथ्या हेन्रीचीराजाज्ञा (एदी द नांत, १५९८) चौदाव्या लूईने मागे घेतल्यानंतर (१६८५) प्रॉटेस्टंटांना कॅथलिक करून घेण्याच्या कार्याची जबाबदारी फेन्लाँवरही सोपविण्यात आली. चौदाव्या लूईचे प्रॉटेस्टंटांबाबतचे असहिष्णू धोरण पाहता, त्यांचे पंथपरिवर्तन घडवून आणण्यासाठी जबरदस्तीचा मार्ग स्वीकारणे फेन्लाँला शक्य होते तथापि ह्या कामी त्याने आर्जवी, आवाहक अशीच वृत्ती ठेवल्याचे दिसून येते. १६८९ मध्ये राजदरबारातील काही प्रभावी व्यक्ती आणि फेन्लाँचा मित्र, मो’चा बिशप झाक बॉस्यूए ह्यांच्या प्रयत्नांमुळे चौदाव्या लूईचा नातू द्यूक द बूरगॉन्य ह्याचा शिक्षक म्हणून फेन्लाँची नेमणूक झाली. दुराग्रही आणि हट्टी स्वभावाच्या ह्या द्यूकच्या वर्तणुकीत फेन्लाँने लक्षणीय परिवर्तन घडवून आणले. १६९३ मध्ये फ्रेंच अकादमीचा सदस्य म्हणून आणि १६९५ मध्ये कँब्रेचा आर्चबिशप म्हणून त्याची नेमणूक झाली. तथापि त्यानंतर चार वर्षांनी पोप आणि राजा ह्या दोघांचीही गैरमर्जी होण्याचा प्रसंग त्याच्यावर आला.
मादाम म्यूइयाँ (१६४८-१७१७) ह्या स्त्रीशी १६८८ मध्ये फेन्लाँचा परिचय झालेला होता. रोमन कॅथलिक चर्चने पाखंडी ठरविलेल्या ‘क्येतिझ्म’ (इं. अर्थ क्वाएटिझम) ह्या विचारसरणीची मादाम म्यूइयाँ ही एक प्रमुख पुरस्कर्ती होती. ईश्वराशी खरेखुरे ऐक्य साधण्यासाठी आपला ‘स्व’ पूर्णतः ईश्वराधीन करून त्यातून तर्कशुद्धपणे येणारी निष्क्रियता धारण करावी स्वर्ग, मोक्ष, नरक ह्यांचा विचार करू नये आपल्या सर्व कृतींचा कर्ता ईश्वरच असल्यामुळे आपल्या हातून पाप हे घडणारच नाही परिणामतः पापनिवेदनादी (कन्फेशन इ.) प्रकार अनावश्यक आहेत तसेच ईश्वर आणि मनुष्य ह्याच्यांत कोणत्याही मध्यस्थाची जरूरी नाही, अशी ‘क्वाएटिझम’ची स्थूल मानाने भूमिका होती. फेन्लाँला असे तीव्रतेने वाटू लागले होते, की आपल्या ईश्वरविषयक जाणिवेला भावनेचा ओलावा नाही बौद्धिकतेच्या रूक्ष पातळीवरच ती उभी आहे. ह्या परिस्थितीत, खऱ्याखुऱ्या ईश्वरी अनुभवाच्या शोधात, मादाम ग्यूइयाँच्या विचारांकडे तो ओढला गेला. तिच्याशी त्याने विस्तृत पत्रव्यवहार केला तसेच तिने आपले विचार बॉस्यूएकडे अभिप्रायार्थ सादर करावेत, असा सल्लाही त्याने तिला दिला. बॉस्यूएने तिच्या विचारांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली तसेच ‘इन्स्ट्रक्शन ऑन द स्टेट्स ऑफ प्रेअर’ (इं. शी., १६९७) हा ग्रंथ लिहून मादाम म्यूईयाँवर प्रखर टीका केली. त्यावर ‘एक्स्प्लनेशन ऑफ द सेइंग्ज ऑफ द सेंट्स ऑन द इंटिरिअर लाइफ’ (इं. शी., १६९७) ह्या आपल्या ग्रंथातून फेन्लाँने म्यूइयाँच्या विचारांचे जोरदार समर्थन केले. त्यातून बॉस्यूए आणि फेन्लाँ यांचे संबंध दुरावले. हे प्रकरण पोपपर्यंत गेले व १२ मार्च १६९९ रोजी पोप इनोसंट बारावा ह्याने ‘एक्स्प्लनेशन ऑफ द सेइंग्ज ऑफ द सेंट्स ….’ मधील काही भाग काढून टाकण्याचा आदेश फेन्लाँला दिला आणि फेन्लाँनेही तो आज्ञाधारकपणे पाळला. ह्याच वर्षी द्यूक द बूरगॉन्य ह्याला शिक्षण देण्याच्या जबाबदारीतून फेन्लाँला मुक्त करण्यात आले राजदरबारातही त्याला स्थान उरले नाही. त्याने लिहिलेल्या तेलीमाक ह्या ग्रंथामुळे राजाची त्याच्यावर विशेष नाराजी झाली. द्यूक द बूरगॉन्यच्या उद्बोधनासाठी फेन्लाँने तेलीमाकचे लेखन केले होते. ग्रीक महाकवी होमर ह्याने त्याच्या ⇨ ओडिसी ह्या महाकाव्यात आपल्या वडिलांचा-यूलिसीझचा-शोध घेणारा टेलेमॅकस (फ्रेंच रूप तेलीमाक) दाखविला आहे. फेन्लाँचा तेलीमाकही यूलिसीझचा शोध घेतो परंतु त्याच्या साहसांचे वर्णन करण्याच्या निमित्ताने फेन्लाँने अत्यंत प्रागतिक असे राजकीय-नैतिक विचार व्यक्त केले होते. कायदा हा राजापेक्षा श्रेष्ठ आहे, हा त्याचा विचार तर त्याच्या काळाच्या पुढे गेलेला होता. फेन्लाँने युद्धाबद्दल तिटकारा व्यक्त केला आंतरराष्ट्रीय सामंजस्याची आवश्यकता प्रतिपादिली गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणत्याही संशयिताला निरपराधच मानले पाहिजे, असे मत मांडले. १६९९ मध्ये हा ग्रंथ गुप्तपणे प्रकाशित करण्यात आला होता. आज ह्या ग्रंथाला फ्रेंच भाषेतील पहिले गद्यकाव्य, म्हणून संबोधिले जाते. फेन्लाँने आपल्या विचारांचे सर्व परिणाम शांतपणे स्वीकारले. कँब्रे येथे आपले धर्मकार्य तो निष्ठेने करीत राहिला.
फेन्लाँचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ असे (पहिले दोन शीर्षकार्थ इंग्रजीत) : (१) ‘ट्रीटाइज ऑन द एज्यूकेशन ऑफ गर्ल्स’ (१६८७). शैक्षणिक मानसशास्त्राची तसेच स्त्रीमनाची त्याला असलेली जाण ह्या ग्रंथातून दिसते. (२) ‘ट्रीटाइज ऑन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड’ (बहुधा १६७९ पहिली संपूर्ण आवृ. १७१८ मध्ये प्रकाशित). ह्या ग्रंथात ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रामाण्य शोधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. (३) ताब्ल द शोल्त (१७११). ह्यात भावी राजाला सादर करण्यासाठी एक प्रागतिक राजकीय योजना आहे. (४) लॅत्र आ लाकादेमी (१७१४). फ्रेंच अकादमीला उद्देशून लिहिलेल्या ह्या पत्रात फेन्लाँने साहित्यविषयक अनेक प्रश्नांचा ऊहापोह केलेला आहे. कॅब्रे येथेच त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Little, Katherin Day, Francois de Fenelon : A Study of a Personality, Harper, 1951.
कुलकर्णी, अ. र.