फेझंट : फॅजिॲनिडी कुलाच्या फॅजिॲनिनी उपकुलातील पक्ष्यांना फेझंट म्हणतात. प्राचीन कोल्चीस प्रातांतून वाहणाऱ्या फेसिस (आताच्या रीओनी, नैर्ऋत्य रशिया) नदीकाठी सर्वप्रथम व जास्त प्रमाणात हे पक्षी आढळल्याने यांना फेझंट हे नाव पडले. लावा, तितर, मोर, कोंबडा इ. पक्षी याच कुलात अंतर्भूत आहेत. फेझंट पक्ष्यांना फारसे चांगले व लांबवर उडता येत नाही. हे पक्षी आशिया खंडात प्रथम आढळले. तेथून ते यूरोपमध्ये नेले गेले. फेझंटचे शास्त्रीय नाव फॅजिॲनस कॉल्चिकस असे आहे. फॅजिॲनस वंशातील जवळजवळ २०-३० जाती आशियात सापडतात. या सर्व जातींचा आपआपसात संकर झाल्यामुळे बऱ्याच नवीन जातीदेखील उत्पन्न झाल्या आहेत.
पूर्व आणि मध्य आशियात फेझंट जास्त प्रमाणात आढळतात. निरनिराळ्या भडक रंगांच्या मिश्रणामुळे हे पक्षी अत्यंत आकर्षक दिसतात. त्यामुळे प्राणिसंग्रहालयामध्ये व घरात पाळीव पक्षी म्हणून यांना फार मोठी मागणी असते. फेझंट जंगलात मोकळ्या जागेवर किंवा कुरणांमध्ये आढळतो. सर्वसाधारणपणे हा पक्षी कोंबड्याएवढा मोठा असतो. याचे पंख दुबळे आणि दिखाऊ असून त्यांचा लांबवर उडण्यासाठी उपयोग होत नाही. हा पक्षी खूप वेगाने व पंखाचा खूप फडफडाट करत उडतो परंतु त्याला थोडेच अंतर गेल्यानंतर जमिनीवर उतरावे लागते. बहुतेकांना लांबलचक, सुंदर पिसाऱ्याची शेपटी असते.
सामान्य नर मोठ्या कोंबड्याएवढा, सु. ९० सेंमी. लांब असतो व त्याची शेपटी सु. ४०-५० सेंमी. लांब, निमुळती व पट्टेदार असते. याच्या छातीचा रंग तपकिरी काळा आणि तांब्यासारख्या रंगांचे मिश्रण असलेला व धातूसारखी चमक असलेला असून याची मान जांभळट हिरवी, तसेच कानांवर पिसांचे दोन छोटे झुबके,
अंगावर निरनिराळ्या आकारांचे वैशिष्ट्यपूर्ण ठिपके किंवा पट्टे असतात. नर मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. त्यांचे रंग जास्त चमकदार व भडक असल्याने तो मादीपेक्षा देखणा दिसतो. मादी भुरकट तपकिरी किंवा राखाडी रंगावर फिकट पिवळे ठिपके असलेली असते. मादीला पिसारा नसतो. नराच्या मानाने मादी कुरूप दिसते. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो. साधारणतः एका नराबरोबर तीन ते चार माद्या राहतात. बहुधा यांचे असेच छोटे छोटे कळप असतात. मादीसाठी नरांमध्ये भांडणे आणि मारामाऱ्या होतात. याचे घरटे बहुधा जमिनीवर केलेले असते. मादी एका वेळी सु. १० पर्यंत अंडी घालते. ३ ते ४ आठवड्यांत अंडी उबून पिल्ले बाहेर पडतात. अळ्या, किडे, गवताचे बी, निरनिराळी धान्ये वगैरे यांचे खाद्य आहे.
जपानी फेझंट (फॅ. व्हर्सिकलर ) हिरवट रंगाचा असून त्याच्या अंगावर धातूसारखी चमक असते. मानवाच्या लक्षात न येणारे भूकंपाचे सूक्ष्म धक्केदेखील याला समजू शकतात व तो ओरडून भूकंपाची सूचना देतो, असे म्हणतात. फेझंट पक्ष्यांमध्ये लेडी ॲम्हर्स्ट फेझंट (क्रिसोलोफस ॲम्हर्स्टिई) आणि सोनेरी फेझंट (क्रि. पिक्टस ) हे अत्यंत सुंदर पक्षी असून त्यांच्या सौंदर्यामुळे ते कैक शतकांपासून पाळले जात आहेत. यांच्या काही जातींचे मांस अत्यंत रुचकर असून त्यांची मांसासाठी मोठ्या प्रमाणावर शिकार होते. कोंबड्या किंवा टर्की यांच्याप्रमाणे हे पक्षीदेखील हल्ली मोठ्या प्रमाणावर पाळले जातात.
जोशी, लीना
“