फळ : बीजी (बीजे निर्माण करणाऱ्या) वनस्पतींचे आवृत्तबीज (फुलझाडे; उदा., आंबा, निंब इ.) व प्रकटबीज (उदा., देवदार, सुरू इ.) असे दोन उपविभाग केलेले असून पहिल्यात दुसऱ्याप्रमाणे बीजे उघडी नसून त्यांवर आच्छादन असते. या गोष्टीला वनस्तींच्या वर्गीकरणात महत्त्व देण्यात आले आहे. बीजे तयार होण्यापूर्वी ⇨ प्रजोत्पादनाकरिता या वनस्पतींत जी लैगिंक प्रकिया (फलन) होते त्याचा परिणाम असा होतो की, फुलातील ज्या अवयवाचे (बीजकाचे) रूपांतर बीजात होते त्याच्या जवळचा भागही यात समाविष्ट होतो [→ फूल]. आवृतबीज वनस्पतींत बीजके फुलातील किंजपुटात (स्त्री-केसराच्या तळभागात) असल्याने बीजकात होणाऱ्या फलनानंतर किंजपुटाचे रूपांतर ज्या इंद्रियात होते त्यास वनस्पतिविज्ञानात ‘फळ’ ही संज्ञा आहे. याचेच आच्छादन बीजकापासून बनलेल्या बीजांना मिळून त्यांचे पोषण व संरक्षण तर होतेच, शिवाय पुढे बीजांच्या प्रसारासही (विकिरणासही) कमीजास्त प्रमाणात साहाय्य होते, फळाचे हे कार्य होय. पुढील पिढीची सुरुवात करून जातीचे सातत्य चालू ठेवणे, ही जीवनाची सफलता यामुळे साधते म्हणून फळ ही संज्ञा सार्थ दिसते. प्रकटबीज वनस्पतींत बीजके उघडीच असल्याने कंजपुटाच्या अभावी त्यांना अशी फळे नसतात त्यांची बीजे प्रथमपासून उघडीच असतात. फळ ही संज्ञा वैदिक वाङ्मयात व वेदोत्तर कालीन वाङ्मयात आढळते आणि फळांचे महत्त्व फार प्राचीन काळापासून मनुष्यास परिचित होत आले आहे, असा पुरावा आढळतो.

फळ हे नेहमी गोड, आंबट किंवा मधुर, मांसल, रसाळ किंवा विशिष्ट प्रकारे रुचकर, स्वादिष्ट व आकर्षक असणे आवश्यक आहे अशी कल्पना फळाबद्दल सर्वसाधारणपणे लोक बाळगतात. तथापि तसे ते नेहमीच असावे याला शास्त्रीय आधार नाही. कित्येक फळे व्यवहारतः ‘भाज्या’ या सदरात येतात हे आपण पाहतोच. उदा., टोमॅटो, वांगे, काकडी, कारले, गवार, घेवडे, मिरची, वाटाणा इत्यादींचे भिन्न आकार व चवीही सामान्यतः परिचित आहेत. शिवाय भाज्यांच्या यादीत फुले (उदा., अगस्ता, फुलकोबी इ.), पाला [उदा., माठ, कोबी, पोकळा, अळू इ.; → पालेभाजी], मुळे (उदा., गाजर, मुळा, बीट), खोड (उदा., बटाटा, सुरण, नवलकोल इ.) ही येतात.

फलनाच्या (पुं- व स्त्री- प्रजोत्पादक घटकांच्या संयोगाच्या) प्रक्रियेने उत्तेजित झाल्यामुळे बीजकांची बीजे बनणे व किंजपुटाचे फळ बनणे क्रमप्राप्त असते. किंबहुना फलनाशिवाय बी व फळ तयार होत नाही असा नियमच आहे असे म्हटल्यास चालेल. तथापि याला अपवाद आढळतात. केळ, पपई, पेरू व द्राक्षाच्या काही जाती यांपैकी काही अलीकडे मानवी प्रयत्नाने तशा बीजविरहित केल्या आहेत, तर अनेक वर्षे बीजाशिवाय लागवडीत असल्याने निसर्गतःच केळीचे फळ फलनाशिवाय बनते, मात्र या सर्व बाबतींत बी तयार झालेच तर ते वंध्य (वांझ) असते. हा प्रकार ‘अनिषेक फलन’ या नावाने ओळखला जातो. किंजपुटाला इंडॉल ॲसिटिक, इंडॉल ब्युटिरिक आणि बीटा-नॅप्थॉक्सी- ॲसिटिक ही अम्ले अथवा त्यासारखी इतर रसायने लावून कृत्रिम रीत्या हा हेतू साधला जातो [→ गर्भविज्ञान].

किंजपुटाखेरीज फुलातील इतर भागही कधीकधी फलन प्रक्रियेने उत्तेजित होऊन फळासारखे भाग बनतात. काजू व बिब्बा यांच्या फुलाच्या देठाचा काही भाग मांसल व आकर्षक बनतो व खरे फळ त्यावर चिकटलेले दिसते व ते कठीण कवचाचे (‘कपाली’) असते. सफरचंदाचा व नासपतीचा गोड व खाद्य भाग बहुतांशी फुलातील पुष्पस्थलीचा (तळाचा) असून त्याने खऱ्या फळाला पूर्णपणे वेढलेले असते (काकडी व पेरू यांच्या फळाला पुष्पस्थलीचे वेष्टन असते, मात्र मांसल भाग बहुतांशी किंजपुटातील असतो). अंजीर व उंबर यांच्या पक्व फळातील खाद्य व मांसल भाग त्यांच्या विशिष्ट फुलोऱ्याच्या [कुंभासनी; → पुष्पबंध] पोकळ देठापासून (पुष्पबंधाक्षापासून) बनलेला असून खरी सूक्ष्म फळे त्यात असतात. फणस, अननस, तुती वा बारतोंडी यांच्या फळात फुलातील अक्ष, पुष्पबंधाक्ष, परिदले इ. भाग खऱ्या फळाबरोबर वाढून त्या सर्वांचे विशिष्ट (संयुक्त) फळ बनते. अशा बाबतीत खऱ्या फळाखेरीज इतर प्रामुख्याने फळासारख्या दिसणाऱ्या व अंशतः किंवा पूर्णतः फळांचे कार्य करणाऱ्या भागास ‘छद्मफळ’ म्हणतात.

साल (शाल) व पोपटी यांच्या फळाचा पंखासारखा किंवा फुगीर भाग संवर्तापासून (पुष्पकोशापासून) बनलेला असतो, तसेच वांगे व करमळ यांचाही संवर्त फळाबरोबर वाढून त्यावर पक्कावस्थेत आढळतो, पण तो फळाचा प्रमुख भाग नसतो.

काही प्रकटबीज वनस्पतींत उदा., ⇨ आभाळ,  ⇨ जूनिपर, बिरमी [यू → टॅक्सेलीझ] व गिंको [→  गिंकोएलीझ] यांच्यात छदे, छदके किंवा शल्कासारखे भाग बीजाभोवती अंशतः किंवा पूर्णतः वाढून त्यांचे मांसल वेस्टन बनते, पण ते खरे फळ नव्हे कारण या वनस्पतींत किंजपुटाचा पूर्ण अभाव असतो. तथापि याला सामान्य लोक फळ म्हणतात.

आवृतबीज वनस्पतींच्या वर्गीकरणास व भिन्न वनस्पती ओळखून काढण्यास त्यांच्या फळांची संरचना व त्यांचे शास्त्रीय प्रकार माहीत असणे जरूर असते. पुढील काही विवेचन त्या दृष्टीने केले आहे. फळांमध्ये फार वैचित्र्य आढळते. रंग, आकार, गाभा, वास, चव व त्यातील पदार्थांची रासायनिक संघटना बियांची संख्या, रंग आकार व फळाच्या सालीशी त्यांचे संबंध या बाबींतील विविधता सर्वांना परिचित असते. तथापि फुलातील किंजमंडल, पुष्पस्थली, देठ वगैरे भागांचे परस्पराशी संबंध [→  फूल] या सर्वांचा विचार करून फळांचे वर्गीकरण केले जाते. फळाची साल (फलावरण) व त्यातील बी हे फळाचे दोन मुख्य भाग होत. फलावरण पातळ किंवा जाड, कडक, मऊ, शुष्क, सूत्रल (धाग्यांनी बनलेले) अथवा मांसल (रसाळ) असू शकते. त्याचे बाह्यकवच, मध्यकवच व अंतःकवच असे तीन पदर कधी स्पष्ट दिसतात (उदा., आंबा, नारळ इ.). परंतु, तिन्हींचा एकच सलग पदरही असतो (उदा., भुईमुग). वाटाणा, घेवडा, पावटा, संकेश्वर इत्यादींच्या शेंगा वाळल्यावर आपोआप तडकतात; तर काजू, कवठ, सूर्यफूल यांची फळे तशी तडकत नाहीत. मांसल फळे व शुष्क एकबीजी फळे ही अस्फुटनशील (न तडकणारी) व अनेकबीजी शुष्क फळे बहुधा स्फुटनशील (आपोआप तडकणारी) असतात. ज्या किंजपुटापासून फळ बनते तो ऊर्ध्वस्थ (उदा., आंबा) किंवा अधःस्थ (उदा., काकडी) असल्याने तीच विशेषणे फळांनाही लावतात [→  फूल]. ऊर्ध्वस्थ फळांचे (उदा., वांगे, चिकू) तळाशी व अधःस्थ फळाच्या टोकांवर (उदा., पेरू, डाळींब, सफरचंद इ.) बहुधा संवर्त किंवा त्याचे शेष दिसतात. त्यावरून त्यांचे भिन्नत्व कळते.

वर्गीकरण : लोकांच्या सामान्य बोलीत विविध फळांची जी नावे सध्या रूढ आहेत, ती एकदोन बाह्य लक्षणांवरून पडली असल्याने शास्त्रीय दृष्ट्या बिनचूक नाहीत. शास्त्रीय वर्णनात आवश्यक असलेला बिनचूकपणा आणण्यास विशिष्ट तात्त्विक भूमिकेवरून फळांचे भिन्न प्रकार ओळखले जातात व त्याला अनुरूप अशी नावे दिली जातात. उदा., शेवगा, मोहरी व घेवडा यांच्या शुष्क फळांना सामान्यपणे ‘शेंगा’ म्हणतात. निवडुंग, अफू यांच्या फळांना आणि काजू व बिब्बा यांच्या रसाळ भागाला ‘बोंडू’ (जांब) म्हणण्याचा प्रघात आहे. इंग्रजीत ‘नट’ हे नाव माड, पोफळी, अक्रोड, भुईमूग, हॅझेलनट, चेस्टनट व काजू इत्यादींच्या फळांना लावतात. तथापि शास्त्रीयदृष्ट्या वरील नावे त्या त्या प्रकारातील सर्वांनाच योग्य नाहीत, हे पुढील विवेचनात आढळून येईल. गूजबेरी, ब्लॅकबेरी, रासबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी (तुती) इ. सर्वांची फळे ‘बेरी’ (मृदुफळ) या नावाच्या शास्त्रीय प्रकारात येत नाहीत. एका फुलातील फक्त एका किंजदलापासून बनलेल्या किंवा अनेक किंजदले एकत्र जुळून बनलेल्या संयुक्त किंजपुटाच्या फळाला ‘साधे’ फळ म्हणतात व एका फुलातील अनेक सुट्या किंजदलांच्या किंजपुटापासून बनलेल्या अनेक फळांच्या समूहाला ‘घोसफळ’ (संघफळ) म्हणतात (उदा., पिवळा चाफा, हिरवा चाफा, सीताफळ इ.) व यातले प्रत्येक लहान फळ एक साधे फळ असते. अनेक फुलांच्या गुच्छातील (पुष्पबंधातील) किंजपुटापासून बनलेल्या एकरूप फळाला संयुक्त फळ म्हणतात (उदा., तुती, अननस, उंबर इ.) यात अनेक साधी फळे समाविष्ट असतात. फळांच्या वर्गीकरणात यापुढे साध्या फळांचे ‘शुष्क’ व ‘मांसल’ असे प्रकार ठरवून शुष्क प्रकारात ‘स्फुटनशील’ व ‘अस्फुटनशील’ असा भेद केला जातो. फळ पूर्णपणे पिकल्यावर त्याचे आवरण अंशतः किंवा पूर्णतः नरम,  मऊ किंवा मांसल अथवा रसाळ असल्यास ते फळ मांसल गणले जाते, केव्हा केव्हा मांसल भाग पुष्पस्थळीपासून (उदा., सफरचंद, नासपती), बीजकाधानीपासून (म्हणजे बीजक किंजपुटातील ज्या भागाला चिकटलेले असते त्यापासून उदा., काकडी, टोमॅटो) किंवा बीजावरणापासून (उदा., डाळिंब) अथवा फळाच्या अंतःकवचावरील केसांपासून [उदा., लिंबू, संत्रे (नारिंग) इ.] बनलेला आढळतो. शुष्क फळांचे आवरण पातळ, जाड, कडक किंवा चिवट असून ती बहुधा रसाळ व मांसल नसतात. फळांच्या तपशीलवार वर्गीकरणात किंजपुटाची लक्षणे, किंजदलांची संख्या, मगजाचा (गराचा) प्रकार, बियांची संख्या, फलावरणाचे पदर, तडकण्याचे प्रकार इ. गोष्टींचा विचार करून फळांचे पुढील विविध प्रकार व उपप्रकार ओळखले जातात.

(अ) साधी अस्फुटनशील शुष्क फळे : (१) कृत्स्न :  एका किंजदलापासून बनलेले, ऊर्ध्वस्थ, एकबीजी, फलावरण पातळ, शुष्क व बीजावरणापासून अलग असते. उदा., मोरवेल, फळ व बी एकमेकांपासून फारसे भिन्न नसतात. ह्या (अ) प्रकारातील सर्वच फळांना ‘कृत्स्न फळे’ म्हणतात. (२) सस्यफल : हे कृत्स्नाप्रमाणे असून फलावरण व बीजावरण परस्परांस चिकटलेली असतात; उदा., मका, गहू व इतर गवते. (३) संकृत्स्न : दोन किंजदलांच्या पण एका संयुक्त अधःस्थ किंजपुटापासून बनलेले कृत्स्न फल; उदा., सूर्यफूल, सहदेवी. (४) क्लोम : फलावरण पातळ व फुगीर, बी एक अथवा अनेक व मोकळी; उदा., माठ, आघाडा इत्यादी (५) कपाली : अनेक किंजदलांपासून बनलेल्या एका संयुक्त किंजपुटाचे, कठीण फलावरणाचे व बहुधा एकबीजी फळ; उदा., काजू बी, शिंगाडा, चेस्टनट, ओक, हॅझेलनट. ओकच्या फळाला तळाशी पेल्याच्या आकाराचे कठीण छदकांपासून बनलेले वेष्टन असते, म्हणून याला ‘छदक कपाली’ म्हणतात. हॅझेलनटालाही तसेच जाड वेष्टन असते. (६) सपक्ष फल : येथे कृत्‍स्‍न फलाच्या आवरणापासून पंखासारखा अवयव बनतो व अशी फळे वाऱ्याने सहज दूरवर नेली जातात [→  विकिरण, फळांचे व बीजांचे]; उदा., एल्म, बिबळा, मधुमालती (माधवलता), वावळा.


आ. १. साधी शुष्क फळे : अस्फुटनशील शुष्क फळे : (१) कृत्‍स्‍नफल-मोरवेल (२) सस्यफल – गहू (३) संकृत्‍स्‍न – सूर्यफूल (४) क्लोम - आघाडा (५) कपाली - शिंगाडा (६) कपाली – काजू (अ) सत्यफल, (आ) छद्मफल (७) छदक कपाली – वंजू (ओक) (८) सपक्ष फल – एल्म स्फुटनशील शुष्क फळे : (९) करंडरूप - कुरडू (१०) पेटिका फल - रुई (११) शिंबा - वाटाणा (१२) सार्षप – मोहरी (१३) सार्षपक – कॅप्सेला. बोंडे : (१४) छिद्रल स्फुटन - अफू (१५) पटभिदुर - पोपटवेल (१६) पुटकभिदुर व पटभंगुर – धोतरा (१७) पुटकभिदुर – भेंडी (१८) द्व्‍यावृत – वेलदोडा. भंगुरपालिभेदी शुष्क फळे : (१९) मुद्रिका - मुद्रा (२०) आंदोलिपाली - बडिशेप (२१) मालाशिंबा - लाजाळू (२२) पालिस्फोटी – भांड (जिरॅनियम) (२३) सपक्ष युग्मफल – मॅपल


आ. २. बोंडांचे स्फुटन-प्रकार : (१) पुटकभिदुर, (२) पटभिदुर, (३) व (४) पटभंगुर.

(आ)  साधी स्फुटनशील शुष्क फळे : या सदरात आपोआप तडकून आपल्या बियांना बाहेर निसटून पडण्यास वाव देणाऱ्या शुष्क फळांचा अंतर्भाव होतो. क्वचित एकबीजी व न तडकणारी शुष्क फळे यात समाविष्ट करतात, कारण ती इतर लक्षणांत साम्य दर्शवितात. फळ तडकण्याचे अनेक प्रकार आढळतात. फळावर कधी स्पष्ट दिसणाऱ्या दोन शिवणींपैकी (सेवन्यांपैकी) एका किंवा दोन्हीवर उभी चीर पडून फळ तडकते; (उदा., रुई, वाटाणा). फलावरणाच्या सुट्या भागांना ‘शकले’ म्हणतात, हे अनुदैर्घ्य (उभे) स्फुटन ‘सेवनी (शकल) स्फुटन’ होय. काटे धोतऱ्याच्या फळास फक्त टोकासच मोठी भोके पडून अंशतः तडकते. पण वाटाण्याची शेंग पूर्णपणे तडकून दोन शकले होतात. घोळीच्या व कुरडूच्या फळाला सभोवार गोलाकार चीर पडून डबीच्या झाकणाप्रमाणे ते तडकते, त्याला ‘वृत्तीय स्फुटन’ व अशा फळाला ‘करंडरूप’ (करंड्यासारखे) म्हणतात. अफूच्या व स्नॅपड्रॅगॉनच्या फळांना लहान भोके पडून त्यांतून बिया बाहेर पडतात म्हणून याला ‘छिद्रल स्फुटन’ म्हणतात. अनेक किंजदलांपासून बनलेल्या संयुक्त किंजपुटाच्या फळांचे (बोंडांचे) स्फुटन मुख्यतः तीन प्रकारांनी होते (आ. २). फळावरील (किंजदलांच्या) संधिरेषेवर चीर पडून फळ तडकते तेव्हा ‘पटभिदुर’ जितकी किंजदले तितकी फळाची शकले होतात व प्रत्येक शकलाबरोबर बीजकाधानी व बी स्वतंत्र होते (उदा., पोपटवेल). फळाच्या पृष्ठसेवनीवर चिरा पडून ते फुटते तेव्हा पडदे (पट) तसेच राहून, प्रत्येक शकलाच्या मध्यभागी ते चिकटून राहतात व बिया त्यावर असल्याने शकलाबरोबर त्या स्वतंत्र होतात. याला ‘पुटकभिदुर’ म्हणतात, कारण फळाच्या कप्प्यावर चिरा पडतात. (उदा., भेंडी). तिसरा प्रकार काळ्या व पांढऱ्या धोतऱ्याच्या फळात आढळतो. येथे फळाची शकले वर दिलेल्या दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारे होतात, शिवाय पडदेही तुटल्यामुळे बिया फळाच्या मध्यभागी अक्षाला चिकटून राहतात. याला ‘पटभंगुर’ म्हणतात.

हे स्फुटन – प्रकार विशेषत: लक्षात घेऊन या सदरातील फळांचे प्रकार पुढे दिल्याप्रमाणे ओळखले जातात : (१) पेटिका फळ : एका किंजदलापासून बनलेले, एक अथवा अनेकबीजी व एकाच शिवणीवर (औदरसेवनीवर) तडकणारे (पेटीप्रमाणे उघडणारे) फळ; उदा., रुई, सदाफुली, कौशी, नवा इत्यादी. (२) शिंबा : दोन्ही शिवणींवर तडकणारे, बाकी वरीलप्रमाणे मात्र दोन शकलांचे, सामान्यतः शेंग म्हटले जाणारे फळ; उदा., वाटाणा, संकेश्वर, भुईमुगाची शेंग, ⇨ बाहव्याची व ⇨ चिंचे ची शेंग अशी तडकत नाही व चिंचेत मगज असतो, हे अपवादात्मक आहे. (३) सार्षप : दोन किंजदलांपासून बनलेले बहुधा लांबट शेंगेसारखे, बारीक, प्रथम एक कप्प्याचे पण पुढे एका छद्मपटामुळे द्विपुटक (दोन कप्प्यांचे) होणारे व दोन उभ्या चिरांनी खालून वर तडकणारे फळ. बिया छद्मपटाला चिकटून राहतात व दोन शकले अलग होतात, उदा., मोहरी, कोबी, ‘सार्षपक’ हे नाव अखूड व रुंद सार्षपाला दिले जाते; उदा., कँडिटफ्‌ट, कॅप्सेला. (४) बोंड : हे एक अथवा अनेक बीजी व अनेक किंजदलांच्या संयुक्त किंजपुटापासून बनलेले, ऊर्ध्वस्थ व भिन्न प्रकारे तडकणारे (क्वचित न तडकणारे) फळ असते; उदा., भेंडी, कापूस, धोतरा, नाणा, तून, निलगिरी, घोळ, अफू, स्नॅपड्रॅगॉन इत्यादींपैकी काहींचा उल्लेख मागे आला आहे. वेलदोडा, कर्दळ व ऑर्किड यांची बोंडे अधःस्थ असल्याने त्यांना द्वयावृत असे म्हणतात. कारण तेथे फलावरणाभोवती पुष्पस्थलीचेही वेष्टन असते.

(इ) भंगुर ‘पालिभेदी’ फळे : ही शुष्क फळे फुटून त्यांचे बहुधा न तडकणारे एकबीजी भाग ( फलांश) स्वतंत्र होतात. काही फळांचे हे भाग तडकणारे असतात. त्यांना प्रत्येकी ‘कुडी’ म्हणतात. यांमध्ये पाच प्रकार आढळतात. (१) मुद्रिका : ऊर्ध्वस्थ व अनेक कप्प्यांचे, मध्य अक्षाला सर्व किंजदलांनी सांधलेले, पक्वावस्थेत अनेक सुटे भाग (फलांश) होणारे व मुद्रेसारखे दिसणारे फळ; उदा., गुलखेरा (हॉलिहॉक), मुद्रा, कसिली. (२) आंदोलिपाली : दोन बीजांचे दोन कप्प्यांचे, अधःस्थ व पिकल्यावर दोन्ही एकबीजी फलांश फळाच्या मध्य अक्षाला (फलधराला) चिकटून पण अलग लोंबत राहणारे फळ; उदा., शेपू, बडीशेप, धने, गाजर इत्यादी. (३) मालाशिंबा : शिंबेप्रमाणे परंतु तसे न तडकता फलांश स्वतंत्र होतात; उदा., लाजाळू, गारदळ इत्यादी. (४) पालिस्फोटी : या फळाचे तीन किंवा अधिक फलांश स्फुटनशील असून ते परस्परांपासून एकदम अलग होतात, त्याच ‘कुड्या’ होत; उदा., एरंडाच्या फळाच्या तीन व जिरॅनियम (भांड)च्या पाच कुड्या होतात. (५) सपक्ष युग्मफल : दोन एकबीजी कप्प्यांच्या किंजपुटापासून बनलेले व पूर्ण पिकल्यावर दोन पंखधारी फलाशांचे हे फळ मॅपल नावाच्या झाडाला येते.

(ई) सांधी मांसल फळे : (१) अश्मगर्मी फळ : एक अथवा अनेक युक्त (जुळलेल्या) किंजदलांचे पण एका संयुक्त किंजपुटाचे व बहुधा एकबीजी असून फलावरणाचे तीन पदर स्पष्ट असतात. अंतःकवच कठीण असते व बियांना संरक्षण देते. मध्यकवच मांसल (उदा., आंबा, जरदाळू, बदाम व अक्रोड) किंवा सूत्रल असते (उदा., नारळ, सुपारी). बाह्यकवच साधारण कठीण सालीसारखे असते. आंब्याची कोय (आठळी) म्हणजे बी आणि त्यास वेढणारे अंतःकवच. बाजारात मिळणारा असोला अगर ‘शहाळे’ हे सूत्रल, अश्मगर्मी संपूर्ण फळ, परंतु ‘नारळ’ ही त्याची कोय असते. ज्याला ‘गोटा’ म्हणतात, ते नारळाचे संपूर्ण बी असते. बाजारात सामान्यतः मिळणाऱ्या अक्रोडाच्या कठीण कवचीच्या फळाला (वास्तविक ते कोयीसारखेच असते) इंग्रजीत वॉलनट म्हणतात. पण ते शास्त्रीय दृष्ट्या ‘नट’ (कपाली) प्रकारचे फळ नव्हे. तसेच कोकोनट (नारळ) व ॲरेकानट (सुपारी) ही फळे ‘नट’ नव्हेत. ती दृढ कवचाची कोय (अष्ठी, आठळी) फळे होत. चेरी, तोरण, बोर, ऑलिव्ह, पीच (सप्ताळू) ही यातलीच उदाहरणे होत. बदामाच्या आठळीत कधी दोन बिया आढळतात. तसेच तोरण व बोराच्या आठळीतही अनेक बिया असतात. केव्हा आठळीही विभागलेली असून प्रत्येक बीला स्वतंत्र कवच असते [अष्ठिका →  व्हर्बिनेसी]. रासबेरी व ब्लॅकबेरी यांच्या फळात अनेक अश्मगर्मी लहान फळे असतात. नारळ व अक्रोड यांच्या फळातील खाद्य भाग बियांचे पुष्क (बीजातील गर्भाचे अन्न) असते.

आ. ३. साधी मांसल फळे : अश्मगर्भी फळे (आठळी फळे) : (अ) आंबा : (१) बाह्यकवच, (२) मध्यकवच, (३) अंतःकवच, (४) बी (आ) नारळ : (१,२,३,४) आंब्याप्रमाणे, (५) पुष्क, (६) गर्भ, (७) बाह्यकवच व मध्यकवच काढलेला नारळ (इ) चेरी : उभा छेद : (१,२,३,४) आंब्याप्रमाणे. मृदुफळे : (ई) द्राक्ष : उभा छेद (उ) पोपटी संवर्त वेष्टित (ऊ) संत्रे (नारिंग) : आडवे कापलेले, जंबीरसम (ए) काकडी : आडवा छेद, कर्कटी फल (ऐ) डाळिंब : उभा छेद, दाडिम (ओ) सफरचंद : आक्रांत फल, उभा छेद : (१) पुष्पंस्थंली, (२) सत्यफल, (३) बी, (४) संवर्त.

(२) मृदुफळ : या प्रकारच्या मांसल फळात कठीण अंतःकवचाचा अभाव असतो, परंतु बिया बहुधा कठीण असतात. उदा., द्राक्ष, पेरू, संत्रे, टोमॅटो, केळ, कवठ इत्यादींना इंग्रजीत ‘बेरी’ म्हणतात. परंतु, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी, मलबेरी ही फळे यांपैकी नव्हेत. मृदुफळात बिया थोड्या किंवा अनेक असून बहुधा ते अनेक संयुक्त किंजदलांपासून बनलेले असते व फलावरणाचे तीन पदर स्पष्ट असतातच असे नाही. पोपटीच्या मृदुफळावर दीर्घस्थायी संवर्ताचे आवरण असते. खारीक व खजूर यांत एकच फार कठीण बी असते, वांगे, टोमॅटो, मिरची यांचे मृदुफळ ऊर्ध्वस्थ; परंतु केळ, काकडी, पेरू व डाळिंब यांचे अधःस्थ असते. डाळिंबातील रसाळ भाग बीजावरणापासून बनतो म्हणून अशा फळांना ‘दाडिमसम’ म्हणतात. कवठ, बेल व गोरखचिंच यांच्या मृदुफळांचे बाह्यकवच कठीण असून मांसल मगजात बिया विखुरलेल्या असतात म्हणून या मृदुफळास ‘घनकवची’ हे विशेषण लावतात. लिंबू, संत्रे, मोसंबी यांसारख्या रसाळ आणि अनेक कप्प्यांच्या मृदुफळांतील मधुर रस पातळ अंतःकवचावरील केसात भरलेला असतो, यांना ‘जंबीरसम’ म्हणतात. काकडी, कलिंगड यांसारख्या चिवट सालीच्या अधःस्थ मृदुफळातील रसाळ भाग मुख्यतः बीजकाधानीपासून बनलेला असल्याने त्यांना ‘कर्कटी फल’ म्हणतात. सफरचंद, नासपती यांसारख्या छद्मी (आभासी)  मृदुफळास ‘आक्रांत’ (पुष्पस्थलीने खऱ्या फळाला पूर्णपणे वेढून बनलेले) म्हणतात. बिही (क्वीन्स) व लोक्वाट यांची फळे अशीच असतात.

(उ) घोसफळे : (संघफळे). आरंभी निर्देश केल्याप्रमाणे ही फळे एकाच फुलातील अनेक सुट्या (मुक्त) किंजदलांपासून स्वतंत्रपणे बनल्यामुळे तेथे दोन किंवा अनेक लहान साध्या फळांचा झुबका बनतो, कधी आ. ४. घोसफळे : (अ) रासबेरी : अश्मगर्भी फळांचा घोस : (१) पूर्ण फळ, (२) विस्तृत उभा छेद, (३) अष्ठिका (आ) स्ट्रॉबेरी : कृत्‍स्‍न फळांचा घोस (इ) सोनचाफा (पिवळा चाफा) : पेटिकाफळांचा घोस (ई) सीताफळ : अनेक मृदुफळांचे बनलेले एक घोसफळ. ( उदा., रामफळ व सीताफळ) पक्वावस्थेत त्या सर्वांचे एकच फळ बनते. अशा घोसफळांतील साध्या फळांच्या सर्व लक्षणांप्रमाणे (शुष्क, मांसल, स्फुटनशील आणि अस्फुटनशील इ.) भिन्न प्रकारची घोसफळे ओळखण्याची पद्धत आहे. उदा.,  कृत्स्न फळाचे घोसफळ ( उदा., मोरवेल), अश्मगर्मी फळाचे घोसफळ (उदा., रासबेरी व ब्लॅकबेरी), मृदुफळांचे घोसफळ (उदा., हिरवा अशोक), पेटिकाफळांचे घोसफळ (उदा., सोनचाफा, कौशी, कांडोळ इ.). स्ट्रॉबेरीत पुष्पस्थळी मांसल बनते व त्यात खरी कृत्स्न फळे विखुरलेली असतात. ते खरे मृदुफळ (बेरी) नव्हे, परंतु ते छद्मी प्रकारचे फळ ठरते.

आ. ५. संयुक्त फळे : फलपुंज : (अ) फणस : उभा छेद (आ) तुती (इ) अननस (ई) बारतोंडी. औदुंबरिक : (उ) अंजीर उभे कापलेले व विस्तृत.

(ऊ) संयुक्त फळे : ही फळे संपूर्ण फुलोऱ्यापासून [→ पुष्पबंध] अर्थात त्यातील प्रत्येक फुलाच्या किंजपुटापासून परंतु ती सर्व एकत्रित वाढून बनतात. यात दोन मुख्य प्रकार आढळतात : (१) कणिश फुलोऱ्यापासून बनते त्याला ‘फलपुंज’ आणि (२) कुंभासनीपासून (गोलसर व बंद राहणाऱ्या फुलोऱ्यापासून) बनणाऱ्यास ‘औदुंबरिक’ म्हणतात. तुती, अननस, फणस, केवडा व बारतोंडी यात फलपुंज आढळते. यातील मुख्य गाभा अक्ष, परिदले इत्यादींपासून मुख्यतः बनतो. तुतीची खरी फळे कृत्स्न प्रकारची म्हणून ते ‘मृदुफळ’ नव्हे. फणसाचे ‘गरे’ परिदलापासून बनतात व खरी फळे त्यांनी वेढलेली मृदुफळे असतात. वड, पिंपळ, उंबर व यांची खरी फळे कृत्स्न प्रकारची आणि ती मांसल पुष्पबंधाक्षाच्या (कुंभासनीच्या) फुगीर पोकळीत बनून सर्वदा झाकलेली राहतात. येथेही छद्मी भागाचे प्रामुख्य आढळते.

 उपयोग, व्यापारी महत्त्व, प्रसार वगैरे : फार प्राचीन काळापासून मनुष्यप्राणी विविध फळांचा अन्न, तेले, पेये, औषधे वगैरेंकरिता मोठ्या प्रमाणावर उपयोग करीत आला आहे. त्याकरिता अनेक फळझाडांची लागवड, संवर्धन व प्रसारही तो करीत आला आहे. गेली कित्येक वर्षे विज्ञानाच्या वाढीबरोबर उपयुक्त फळांचा शोध, लागवड, संवर्धन, जलद वाहतुकीच्या साधनाने प्रसार, डबाबंद करून टिकविणे आणि आयात-निर्यात करणे, त्यांना व्यापारी महत्त्व आणणे, नवीन जातींचे संशोधन व संकर पद्धतीने उत्पादन वगैरे बाबींकडे बरेच लक्ष दिले जात असून आज फळांचे उपयोग विविध प्रकारे केले जातात. अधिकात अधिक मानवी समाजांना त्यांचे महत्त्व पटले आहे. फळे व फळझाडे यांचा भविष्यकाळ मानवी कल्याणार्थ उज्ज्वल होत आहे.

सर्वदा उपयुक्त फळे देणाऱ्या झाडांचे त्यांना अनुकूल असे हवामान, त्यांच्या सह्यतेच्या मर्यादा व त्यांचे अनुयोजन, मूलस्थान वगैरे बाबी विचारात घेता, ‘उष्ण कटिबंधीय, उपोष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय’ असे वर्गीकरण स्थूलमानाने केले जाते. व्यापारी दृष्ट्या त्यांची पैदास करण्यास हे महत्त्वाचे असते. सामान्यपणे पहिले दोन वर्गच विशेषेकरून मानतात व त्याचा अर्थ उष्ण कटिबंधातील व त्याच्या आसपासच्या प्रदेशांतील फळे इतकाच प्रत्यक्ष व्यवहारात होतो. विषुववृत्ताच्या आसपासच्या उष्ण प्रदेशांत आढळणाऱ्या कित्येक फळांना पाड येण्यास उच्च तापमानाची आवश्यकता असते. याउलट समाशीतोष्ण प्रदेशातील कडक थंडीत गारठण्याची सवय असलेल्या काहींना ती परिस्थिती इतरत्र मिळत नाही. सर्व उष्ण प्रदेशीय फळझाडे सदापर्णी व समशीतोष्ण प्रदेशीय फळझाडे पानझडी असतात. उपोष्ण प्रदेशात दोन्हींचा समावेश होतो. संकरामुळे काहींची सहनशक्ती बदलल्याने त्यांचे प्रसारक्षेत्र वाढले आहे (उदा., अव्होकॅडो व पीच यांचे प्रकार). व्यापारात अप्रविष्ट अशा फळांचा मूळ प्रदेशाबाहेर अजून अभ्यास न झाल्याने हे वर्गीकरण अद्याप पूर्ण नाही. परंतु, ते होणे आवश्यक आहे कारण त्याशिवाय व्यापारीदृष्ट्या त्यांची पैदास तोट्यात येण्याचा संभव आहे.

जगाच्या व्यापारक्षेत्रात अन्न, पेये (रस, मद्ये इ.) तेले, औषधे आणि इतर उपयोगांमुळे महत्त्वास आलेली फळे विशेषेकरून उष्ण व उपोष्ण कटिबंधीय असून ती समशीतोष्ण प्रदेशातल्या बाजारपेठेत परिचित झाली आहेत. कित्येक उपोष्ण कटिबंधीय फळे मनुष्याने प्रथमच लागवडीत आणली असून त्याच्या पुरातन संस्कृतीची केंद्रे तेथेच विकसित झाली आहेत. पश्चिम गोलार्धातील विसाव्या शतकातील फलसंवर्धनाचा विकास मुख्यतः या दोन प्रकारच्या फळांबाबतचा आहे. उष्ण प्रदेशीय फलसंवर्धन विकासात केळ व अननस व्यापारी क्षेत्रात आल्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व कॅनडात ती उपलब्ध झाली. उपोष्ण कटिबंधीय फलसंवर्धन विकासात संत्री व द्राक्षे यांचे अमेरिकेतील संवर्धन व लागवड यांचा निर्देश करता येईल. तसेच लिंबाच्या वंशातील [→ सिट्रस] अनेक फळे अमेरिकेतील सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. प्रस्तुत काळी सुकविणे, डबाबंद करणे, प्रशीतन, वायुसंचयन, पातळ आच्छादने घालणे इ. संरक्षण व परिरक्षण यांच्या (टिकवून ठेवण्याच्या) अनेक उपायांमुळे उपोष्ण कटिबंधीय व्यापारात पूर्वी माहीत नसलेली किंवा असूनही पूर्ण पक्वावस्थेत प्राप्त न होणारी कित्येक फळे आज विपुलतेने आढळतात. फळांची उपलब्धता व अनेक फलोद्योग (संवर्धन, संरक्षण, परिरक्षण इ.) दिवसेंदिवस वाढत आहेत. मँगोस्टीन, चेरिमोया, आंबा, पपई व अननस यांसारखी उत्तम फळे जगप्रसिद्ध झाली आहेत. [→  खाद्यपदार्थ उद्योग डबाबंदीकरण पेये मुरंबे व जेली लोणची व चटण्या].

उष्ण कटिबंधीय फळांत साधारणपणे पन्नास फळे अन्नदृष्ट्या महत्त्वाची आहेत. केळ, नारळ, आंबा व अननस ही चार फळे फार महत्त्वाची असून कोको, पेरू, काजू, ब्राझील नट, सापुकिया नट, चिकू, फणस, चिंच, मॅंगोस्टीन, रामबुतन, फलसान, दुरियन इ. फळे कमी महत्त्वाची आहेत. त्याखालोखाल सीताफळ, रामफळ, मामफळ, मॅमे ॲपल, ताराफळ, अबनुस, कवठ, कामरुख, आवळा, काकर, मलाका जांब, करवंद इ. फळे महत्त्वाची आहेत.

उपोष्ण कटिबंधीय फळांमध्ये संख्येने साधारण वरच्या इतकी व मनुष्यमात्रास अधिक उपयुक्त अशी अनेक फळे आहेत. द्राक्षे, ऑलिव्ह, अक्रोड, बदाम, अंजीर, खारीक, लिंबूगट ही प्रमुख फळे असून ॲव्होकॅडो, चेरिमोया, निवडुंग, डाळींब, कौकी, पिस्ता, लोक्वाट, लिची, बोर, जांभूळ इ. फळे सामान्य आहेत.

फळे, कवच फळे व आठळ्या (अष्टी) इत्यादींसंबंधी सामान्य व शास्त्रीय विवेचन आरंभी आले आहे. त्यावरून ‘फुलातील पक्व झालेला किंजपुट’ अशी फळांची शास्त्रीय व्याख्या रूढ आहे त्यांची निर्मिती फक्त आवृतबीज वनस्पतीच करतात. किंजपुटाचा अभाव असलेल्या म्हणजे प्रकटबीज वनस्पतींतील बीजोत्पादक किंवा बीजाशी संलग्‍न भाग (छदे, बीजोपांग, खवले इ.) कधीकधी सामान्य भाषेतील फळ या संज्ञेत समाविष्ट होतो (उदा., जूनिपर, यू, गिंको इ.). शुष्क व कठीण फलावरण असलेल्या बिया म्हणजे कपाली (कवचफले) ह्या फळांच्या प्रकाराचा मागे उल्लेख आलेला आहे (उदा., काजू, बिब्बा, ओक, चेस्टनट इ.). तथापि बियांभोवती कधीकधी फलावरणातील फक्त आतील कठीण भाग (अंतःकवच) राखून त्या संपूर्ण वस्तूंचा व्यापारी देवघेवीत वापर केला जातो (उदा., बदाम, अक्रोड, नारळ, जरदाळू, पिस्ता इ.), त्यांना आठळी(अष्ठी) म्हणतात. कपाली व आठळी या दोन्ही प्रकारांना सामान्य इंग्रजी भाषेत फार व्यापक अर्थी ‘नट’ ही संज्ञा वापरतात. सर्व नट खाद्य असतातच असे नाही, काहींपासून तेल किंवा मेद काढतात, तर काहींचा उपयोग दागिन्यांकरिता मण्यासारखा करतात. नटमधील मगज किंवा खोबरे कित्येकदा तेलयुक्त असते. (चित्रपत्रे ४२, ४३).

पहा :  पुष्पबंध, प्रजोत्पादन, फळबाग, फूल, बीज वनस्पति, बीजी विभाग विकिरण, फळांचे व बीजांचे वृद्धि, वनस्पतींची हॉर्मोने.

संदर्भ :  1 . Children, N.F. Modern Fruit Science, New Brunswick, N. J. 1961.

2 . Crow, W. B. Synopsis of Biology, Bristol, 1960

3 . Esau, Katherine, Plant Anotomy, New York, 1965.

4 . Fenton, C.L. Hermine. B.K. Fruits We Eat, New York, 1961.

5 . Lawrence, G.F.M. AnIntroduction to Plant Taxonomy, New York, 1958.

6 . Robbins,W.W. Weier,T.E. Stocking, C.R. Botany, New York, 1961.

7. काशीकर,  चिं.  ग.  भारतीय वनस्पतींचा इतिहास,  नागपूर.  १९७४.

 पंराडेकर, शं. आ.