प्लिनी, थोरला : (इ.स. ? – २४ ऑगस्ट ७९). प्रसिद्ध रोमन विश्वकोशकर्ता. पूर्ण नाव गेयस प्लिनिअस सिकंदस. उत्तर इटलीतील कॉमूम (कॉमो) गावी सधन घराण्यात जन्म. उच्च सामाजिक दर्जानुसार त्याचे सैनिकी शिक्षण पार पडल्यावर तो काही काळ जर्मनीमध्ये घोडदलाचा अधिकारी होता. (इ. स. ४७ ते ५७). त्यानंतर त्याने वकिली केली असावी. सम्राट नीरोच्या वेळी (कार. इ. स. ५४-६८) त्याने तत्कालीन उपलब्ध अशा सर्व प्रकारच्या वाङ्‌मयाच्या अभ्यासाला वाहून घेतले. हा १४ वर्षांचा अखंड व्यासंगाचा काळच त्याच्या विश्वकोश कार्याचा पाया होय. नीरोनंतर सम्राट टायटस फ्लेव्हिअस व्हेस्पेझनच्या कारकीर्दीत त्याने अनेक शासकीय पदांवर काम केले पण त्याचा खरा व्यासंग वाचन आणि लेखन हाच होता. त्याचा पुतण्या व दत्तक पुत्र धाकटा प्लिनी याने टॅसिटसला लिहिलेल्या पत्रांतून त्याच्या जिज्ञासू वृत्तीची व लेखनाची कल्पना येते.

धाकट्या प्लिनीच्या मते त्याने सु. १०२ पुस्तके लिहिली. त्यांपैकी Historia Naturalis (इं. शी. नॅचरल हिस्टरी) या ग्रंथाव्यतिरिक्त इतर लेखन आज उपलब्ध नाही. ऑन द युझ ऑफ द जॅव्हेलिन इन द कॅव्हलरी ऑन द जर्मन वॉर्स (इं. शी.-२० खंड) द स्ट्यूडंट (इं. शी.-३ खंड) डाउटफुल स्पीच (इं. शी. – ८ खंड) व पाँपोनिअस सिकंदस या मित्राचे चरित्र (दोन भाग) आणि ऑफिडिअस बेससच्या इतिहासाविषयी (३१ खंड) ही त्याची इतर पुस्तके होत.

नॅचरल हिस्टरीचे ३७ खंड असून या ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्याने टायटस सम्राटाविषयी प्रथम लिहून, आपण या ग्रंथात सु. २०,००० विविध घटना, बाबी इत्यादींविषयींची माहिती दिली असून शंभर लेखकांच्या सु. २,००० संदर्भग्रंथांतून अनेक विषयांवरील ही माहिती संकलित केली, असे लिहिले आहे. पहिला खंड हा उरलेल्या ३६ खंडांचा सारांश असून याच्या शेवटी अनुक्रमणिका दिलेली आहे. खंड २ ते ६ यांत विश्व आणि पृथ्वी यांचा पृष्ठभाग यांची चर्चा आहे खंड ७ मध्ये मानवासंबंधी साधकबाधक चर्चा खंड ८ ते ११ यांत प्राणिविज्ञान-मासे, पक्षी व कीटक यांची चर्चा खंड १२ ते २७ वनस्पतिविज्ञान व कृषिविज्ञान यांतील शाखांवर चर्चा (त्यांतील काही प्रकरणे वनस्पतींच्या औषधी उपयोगांसंबंधी आहेत.) खंड २८-३२ वैद्यक व प्राणिजन्य औषधे आणि खंड ३३ ते ३७ मध्ये खनिजे, त्यांचा उपयोग व ग्रीक-रोमन कलांविषयक मजकूर आहे. त्याची शैली लवचिक होती व कोणताही विषय त्याने हाताळला नाही, असे नाही.

प्लिनीचा हा आद्य लॅटिन विश्वकोश श्रेष्ठ अशा अभिजात ग्रीक-रोमन ज्ञानपरंपरेत मोडतो. ज्ञानजिज्ञासा, ज्ञानसंपादन आणि ज्ञानसंकलन यांच्या अखंड साधनेतून तात्कालीन समग्र ज्ञानक्षेत्राचे विश्वकोशीय संपादन करण्याचे प्लिनीने केलेले कार्य अनन्यसाधारणच आहे. त्यात आधुनिक शास्त्रीय दृष्टीची अपेक्षा करणे अनैतिहासिक ठरेल. मध्य युगातील सर्वसाधारण शिक्षणाचा आधारभूत ग्रंथ म्हणून याचा उपयोग होत असे मात्र १४९२ पासून त्याच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्याचे महत्त्व कमी होत जाऊन सतराव्या शतकाच्या अखेरीस त्याला फक्त ऐतिहासिक महत्त्व उरले.

या ग्रंथात निरनिराळ्या ठिकाणी भारताविषयीचा उल्लेख आलेला असून सहाव्या खंडात भारताच्या भूगोलाविषयी माहिती आहे. प्लिनी ज्या ज्ञानपरंपरेत निर्माण झाला, त्या ज्ञानपरंपरेतील शेकडो ग्रंथ नष्ट झालेले आहेत. पश्चिमी मानवाने उभ्या केलेल्या पण आता हरवलेल्या त्या प्रचंड ज्ञानसंभाराचा एक अवशिष्ट प्रतिनिधिक नमुना मात्र प्लिनीच्या विश्वकोशाच्या रूपाने अक्षर झाला आहे.

व्हीस्यूव्हिअस उद्रेकाच्या वेळी प्लिनी नजीकच्या मिझेनममध्ये (मिझेनॉ) नाविक अधिकारी होता (७९). धाकट्या प्लिनीच्या वर्णनानुसार ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या प्रत्यक्ष अभ्यासाची ही संधी टाळणे थोरल्या प्लिनीला अशक्य होते. या प्रसंगी त्याने काही मित्रांचे जीवही वाचविले आणि आपल्या नौदलाचा उपयोग करून लोकांना सुरक्षित जागी हलविले. तो स्वतः मात्र पाँपेईपासून ६ किमी. अंतरावरच थांबला. त्याच वेळी भूकंप झाला. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या धुरामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी स्टाब्याच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

संदर्भ : 1. Rose, H. J. A Handbook of Latin Literature, London, 1966.

2. Schwartz, George Bishop, P. W. Ed. Moments of Discovery : the Origins of Science, New York, 1958.

देशपांडे, सु. र. जमदाडे, ज. वि.