प्रिटोरिया : दक्षिणा आफ्रिका प्रजासत्ताकाची प्रशासकीय राजधानी व ट्रान्सव्हाल प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६,३४,४०० (१९७६ अंदाज). ते जोहॅनिसबर्गच्या ईशान्येस सु. ५० किमी. वर लिंपोपो नदीची उपनदी एपीस हिच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. डच वसाहतकार व नेता आंद्रीस प्रेटूरीअसरचा मुलगा मार्तीनस याने १८५५ मध्ये त्याची स्थापना करून वडिलांच्या स्मरणार्थ शहराला ‘प्रिटोरिया’ हे नाव दिले. १८६० मध्ये प्रिटोरिया ट्रान्सव्हालची, तर १९१० मध्ये द. आफ्रिकेची राजधानी होती. दक्षिण आफ्रिकन युद्धाच्या वेळी (१८९९-१९०२) विन्स्टन चर्चिलला येथे तुरुंगात ठेवण्यात आले होते. या युद्धाचा शेवट घडवून आणणाऱ्या शांतता-करारावर ३१ मे १९०२ रोजी येथेच सह्या झाल्या.
प्रिटोरियाच्या आसंमतात सोने, कथिल, लोह, चांदी, कोळसा यांचे साठे असून किमी. ३२ वर हिऱ्याची खाण आहे. अभियांत्रिकी, काचकाम, सिमेंट, पोलाद, खाद्यपदार्थ प्रक्रिया इ. उद्योग शहरात चालत असून येथे एक मोठी रेल्वे कर्मशाळाही आहे. येथील औद्योगिक अर्थव्यवस्था प्रामुख्याने ‘साउथ आफ्रिकन आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन’ (इस्कॉर) या संस्थेकडे आहे. देशातील ‘कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ सारख्या मोठ्या संशोधन संस्थांशिवाय येथे भौतिकी, रसायन, यांत्रिक व विद्युत् अभियांत्रिकी इ. विषयांच्या संस्थादेखील आहेत. जल, अन्न व हवा प्रदूषण संशोधन संस्थाही उल्लेखनीय आहे. ‘प्रिटोरिया’, ‘दक्षिण आफ्रिका’ या विद्यापीठांशिवाय येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. ‘दक्षिण आफ्रिका विद्यापीठ’ ही पत्रद्वारा शिक्षण देणारी जगातील सर्वांत जुनी संस्था मानली जाते.
योजनाबद्ध नगररचना आणि वसंत ऋतूत फुलणारे निळे गुलमोहोर यांसाठी प्रिटोरिया प्रसिद्ध आहे. द. आफ्रिका प्रजासत्ताकाचा अध्यक्ष पॉल क्रूगर ह्याचा पुतळा येथे असून जवळच एका टेकडीवर ‘युनियन बिल्डिंग्ज’ ही भव्य शासकीय इमारत आहे. ‘चर्च स्क्वेअर’ भागातील उत्तुंग इमारतींमध्ये ‘व्होक्सराड’ हिचा समावेश होतो, तर शहरातील उंच टेकडीवर उभारलेले ‘व्हूरट्रेकर स्मारक’ हे बोअर वसाहतकारांनी केलेल्या महान स्थलांतराची (१८३६-३८) स्मृती करून देते. या स्थलांतरामुळेच श्वेतवर्णियांना द. आफ्रिकेच्या अंतर्भागात वसाहती करता आल्या. पर्यटकांची आकर्षणे म्हणून ट्रान्सव्हाल वस्तुसंग्रहालय, आंद्रीस व मार्तीनस प्रेटूरीअस यांची स्मारके, बर्गर्स पार्क, युनियन, बिल्डिंग्ज पार्क, राष्ट्रीय प्राणिसंग्रहोद्यान इ. उल्लेखनीय आहेत.
कापडी, सुलभा