स्टॅफर्ड : इंग्लंडच्या स्टॅफर्डशर परगण्यातील प्रमुख शहर. लोकसंख्या १,२२,००० (२०११). हे लंडनच्या वायव्येस २१६ किमी. सॉ नदीकिनारी वसले आहे. हे लंडन–बर्मिंगहॅम–मँचेस्टर या रस्ते व लोहमार्गावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. इ. स. ९१३ च्या अँग्लो–सॅक्सन बखरीत याचा बेथनी असा उल्लेख आहे. १२०६ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला व व्यापारी शहर म्हणून याची भरभराट झाली. १६४३ मध्ये इंग्लिश यादवी युद्धावेळी हे पार्लमेंटरियन्सच्या ताब्यात आले होते. यावेळी शहराची हानी झाली होती. चरित्रकार आयझाक वॉल्टनचे हे जन्मस्थळ आहे. तसेच रिचर्ड शेरिडन याने १७८०–१८०६ पर्यंत स्टॅफर्डचे संसद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले होते. मध्ययुगीन काळात यास प्रशासकीय व व्यापारी ठाणे म्हणून महत्त्व होते.

स्टॅफर्ड येथे रसायने, विद्युतसाहित्य, रोहित्रे, एंजिने, मृत्तिकाशिल्पे, चर्मोद्योग, मीठ इ. व्यवसाय चालतात मात्र विसाव्या शतकाापासून विद्युतसाहित्याच्या उद्योगांमुळे हे विशेष विकसित झालेले आहे. येथील सेंट मेरी चर्च, आयझाक वॉल्टनचा अर्धपुतळा, सेंट चॅड्स चर्च, स्टॅफर्डशर हॉल (१७९८-९९), बरो हॉल (१८७६-७७), गिल्ड हॉल (१९३४), कलावीथी, म्युन्सिपल सेंट्रल लायब्ररी विशेष प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.