प्रॉपर्शस, सेक्स्टस : (सु. ५० – सु. १६ इ. स. पू.). श्रेष्ठ लॅटिन विलापिकाकार. अंब्रियातील असिसी ह्या शहरी एका सुखवस्तू कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या लहानपणीच त्याचे वडील निवर्तले आणि इ. स. पू. ४० मध्ये त्याच्या वडिलार्जित मालमत्तेपैकी काही सरकारतर्फे जप्त करण्यात आली. पुढे तो आपल्या आईसह रोमला आला. तेथे त्याने कायद्याचा अभ्यास केला तथापि वकिली करण्याऐवजी त्याने स्वतःला काव्यलेखनास वाहून घेतले व व्हर्जिल आणि ऑव्हिड या कवींशी स्नेहसंबंध जोडले. रोम येथे असताना हेस्टिआ नावाच्या एका सुंदर, अभिरुचिसंपन्न स्त्रीच्या प्रेमपाशात तो पडला. ती एक गणिका होती, असे म्हणतात. तिच्याबरोबरचे त्याचे संबंध पाच-सहा वर्षेच टिकले परंतु तिच्याबद्दल त्याला वाटणारी ओढ कायम राहिली. ‘सिथिंआ’ ह्या नावाने ही स्त्री त्याच्या कवितेत येते.
प्रॉपर्शसच्या कवितेची चार अधिकृत संकलने आज आपणास उपलब्ध होतात. त्यांचा अंदाजाने दिला जाणार काळ असा : संकलन पहिले, ३३ ते २८ इ. स. पू. दुसरे, २८ ते २५ इ. स. पू. तिसरे, २४ ते २२ इ. स. पू. आणि चौथे, २१ ते १६ इ. स. पू. ह्या सर्व संकलनांतील कवितांत सिंथीआविषयक कविता अंतर्भूत असल्या, तरी पहिल्या संकलनातील कवितांचा विषय प्रधानतः सिंथिआविषयीचे त्याचे प्रेम हाच असल्यामुळे सिंथिआ मोनोबिब्लोस ह्या नावाने ते ओळखले जाते. त्यातील कवितांत वर्णिलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांतून आणि भाववृत्तींतून सिंथिआबरोबरचा त्याचा भावबंध साकार होत राहतो. हे संकलन प्रकाशित होताच प्रॉपर्शसला कीर्ती प्राप्त झाली प्रसिद्ध रोमन मुत्सद्दी आणि साहित्याचा उदार आश्रयदाता मिसीनस ह्याची मर्जीही त्याला लाभली. इ. स. पू. तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रिया येथे उदयाला आलेल्या कॅलिमाकस ह्या ग्रीक कवीचा प्रॉपर्शसवर प्रभाव होता. महाकाव्यासारखी दीर्घकाव्ये लिहिण्याचा काळ संपुष्टात आला असून लघुकाव्यांची रचना करणेच औचित्यपूर्ण होय, अशी कॅलिमाकसची भूमिका होती. आपल्या कवितांच्या दुसऱ्या संकलनात, एके ठिकाणी, प्रॉपर्शसने आपण महाकाव्य लिहिण्यास असमर्थ असून प्रेम हाच आपल्या काव्याचा एकमेव विषय असल्याचे म्हटले आहे तसेच तिसऱ्या संकलनात, आपण कॅलिमाकसचा पहिला रोमन अनुयायी असल्याचे तो नमूद करतो. मात्र त्याच्या काही कवितांतून प्रेमाखेरीज अन्य विषय त्याने हाताळले आहेत. उदा., रोमन सैन्याने मिळविलेल्या एका विजयासंबंधीची कविता. मिसीनसच्या दडपणामुळेही हे झाले असणे शक्य आहे. सम्राट ऑगस्टसची मुलगी कॉर्नेलिया हिच्या मृत्यूवरील एक सुंदर विलापिका चौथ्या संकलनात आढळते. प्रॉपर्शसच्या कवितेत, काही ठिकाणी, उत्स्फूर्ततेचा अभाव जाणवत असला, विद्वत्तानिदर्शक वाङ्मयीन वा अन्य प्रकारचे संदर्भ देण्याची त्याची प्रवृत्ती काही वेळा प्रबल ठरत असली, तरी त्याच्या एकूण कवितेतील उत्कट आत्मपरता लक्षणीय आहे. सिंथिआबरोबरच्या संबंधांतून निर्माण झालेले भावनिक ताण त्याच्या वाट्याला आलेला अवमान आणि प्रणयाचे अनेक गहिरे रंग ह्यांचे दर्शन त्याने प्रत्ययकारीपणे घडविले आहे. चित्रमयतेकडे झुकणारी त्याची शैली प्रसंगी भाषेशी धसमुसळेपणाही करते व म्हणूनच ती पौरुषयुक्त वाटते. पंचमात्रिक छंद (पेंटॅमिटर) त्याने समर्थपणे हाताळलेला आहे. ऑव्हिडसारख्या रोमन कवींवर प्रॉपर्शसचा प्रभाव होता. प्रॉपर्शसच्या मृत्युसंबंधीचे तपशील मिळत नाही. इ. स. पू. सु. १६ नंतरचे त्याचे लेखन मिळत नसल्यामुळे त्यानंतर तो हयात नसावा, असे सामान्यतः मानले जाते.
संदर्भ : Butler, H. E. Barber, E. A. The Elegies of Propertius, Oxford, 1933.
कुलकर्णी, अ. र.