प्रूडेन्शिअस, ऑरिलिअस क्लेमेंझ : (३४८-४१० ?). प्राचीन लॅटिन कवी. तो स्पेनमधील सेसरा ऑगस्टा (हल्लीचे सॅरगॉसा शहर) येथे जन्मला. वक्तृत्वशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. काही काळ त्याने वकिली केली प्रशासकीय पदेही भूषविली. रोमन सम्राट पहिला थीओडोशियस (कार. ३७९-३९५) ह्याने प्रूडेन्शिअसला आपल्या दरबारी मोठ्या सन्मानाची जागा दिली होती. तथापि दरबारी जीवनास विटून सु. ३९२ पासून ख्रिस्ती धर्मकाव्यनिर्मितीस त्याने स्वतःला वाहून घेतले अभिजात कवितेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मसिद्धांतांचा उद्‌घोष केला पेगन आणि पाखंडी ह्यांच्यावर हल्ले केले ख्रिस्ती हुतात्म्यांना गौरविले. ‘हिम्स फॉर डेली यूज’, ‘क्राउन्स ऑफ मार्टरडम’ ‘द ऑरिजिन ऑफ सिन’, ‘अपॉथिऑसिस’, ‘बुक्स अगेन्स्ट सिमॅकस’, ‘कॉन्‌फ्लिक्ट फॉर द सोल’, व ‘द डबल टेंस्टामेंट’ अशा इंग्रजी शीर्षकार्थांनी त्यांनी रचिलेले सात कवितागुच्छ प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी धर्मभोळेपणाचा अतिरेकच त्याच्या साहित्यात दिसला, तरी लॅटिन भाषेतील ख्रिस्ती धर्मकवितेचे परिपक्व रूप प्रूडेन्शिअसच्या कवितेतून प्रत्ययास येते. विविध लॅटिन वृत्तांवरील त्याचे प्रभुत्व लक्षणीय आहे.

कुलकर्णी, अ. र.