प्राणिनाम पद्धति : प्राणिजगातील नानाविध जीवांपैकी प्रत्येकाचा निर्देश करण्याकरिता नावांच्या ज्या पद्धतीचा उपयोग करतात तिला प्राणिनामपद्धती म्हणतात. नावे देण्याच्या या पद्धतीमुळे लॅटिन रूपाची नावे प्राण्यांच्या विविध समूहांना, विशेषतः वंश आणि जातींना, दिलेली आहेत. अठराव्या शतकातील स्वीडनमधील प्रकृतिवैज्ञानिक ⇨ कार्ललिनीअस यांनी नावे देण्याची ही पद्धती शोधून काढली आणि तिला व्यवस्थित स्वरूप देऊन ती उपयोगात आणली. यापूर्वी प्राण्यांचा निर्देश एका शब्दाच्या नावाने अथवा वर्णनात्मक शब्दप्रयोगांनी करीत असत.

 

द्विपद नामपद्धती : लिनीअस यांनी सुरू केलेल्या द्विपद नामपद्धतीत जातीच्या नावात दोन भाग असतात. नावाचे पहिले पद वंशाचे नाव असते आणि दुसरे पद त्या वंशातील विशिष्ट जातीचे नाव असते. वंश व जाती या दोन शब्दांत विराम चिन्ह नसते.[रोमन लिपीत नाव देताना वंशाचे अद्याक्षर मोठे (कॅपिटल) व जातीचे लहान लिपीत देतात आणि छापताना संपूर्ण द्विपदनाम तिरप्या टंकामध्ये (इटालिक टाइपमध्ये) छापतात]. उदा., द्विपद नामपद्धतीत लांडग्याचे नाव कॅनिसल्युपस (Canis lupus) असे आहे. यातील पहिले पद कॅनिस हे वंशाचे नाव आहे आणि दुसरे पद ल्युपस हे कॅनिस वंशातील विशिष्ट जातीचे-म्हणजे लांडग्याचे-आहे. दोन पदे मिळून जातीचे नाव बनलेले असून ते अनन्यसाधारण असावे लागते म्हणजे वंशवाचक आणि जातिवाचक नावाचे हे विशिष्ट एकीकरण दुसऱ्या एखाद्या प्राणिजातीचा निर्देश करण्याकरिता वापरता येत नाही. जातिवाचक नावानंतर या नावाच्या निर्मात्याचे अथवा ते पहिल्याने सुचविणाऱ्याचे नाव लिहिले जाते म्हणून प्राणिशास्त्राच्या नियमानुसार लांडग्याचे यथायोग्य नाव कॅनिसल्युपस लिनीअस असे आहे. निर्मात्याचे अथवा सुचविणाऱ्याचे नाव जर कंसात असले, तर त्याचा अर्थ असा होतो की, सुरुवातीला ही जाती ज्या वंशात घातली होती त्यातून ही काढून हल्ली निराळ्याच वंशात घातलेली आहे. अनवधानाने अथवा पुनर्वर्गीकरणामुळे जेव्हा अशा तऱ्हेची दोन अथवा अधिक एकीकरणे अस्तित्वात येतात तेव्हा त्यांना समरूप म्हणतात आणि त्यांच्यापैकी जी जास्त अलीकडची असतात ती रद्द केली जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक जातीला फक्त एकच कायदेशीर नाव असू शकते आणि ते म्हणजे प्रथम योग्य रीतीने पुढे मांडलेले अथवा सुचविलेले असते ते होय. यानंतर तयार केलेली अथवा सुचविली गेलेली सर्व नावे समानार्थक अथवा पर्यायवाचक शब्द समजले जातात आणि ते रद्द केले जातात (अग्रमान्यता नियम). अठराव्या शतकातील सुशिक्षित यूरोपीय माणसांच्या लॅटिन आणि ग्रीक या सामान्य भाषा असल्यामुळे वैज्ञानिक नावे तयार करताना साहजिकच या भाषांचा उपयोग करण्यात आला. नवीन नाव सुचवावयाच्या वेळी ज्या वर्गाकरिता ते सुचविले असेल त्याचे वर्णन अथवा व्याख्या त्या नावाबरोबरच द्यावी लागते हेतू हा की, जरूर पडेल तेव्हा ती चटकन उपयोगात आणता यावी. व्याख्येशिवाय सुचविलेले नाव ‘निरर्थक नाव’ समजले जाते आणि व्याख्या असून तिचा समाधानकारक उलगडा होऊ शकत नसेल, तर सुचविलेले नाव हे ‘संशयास्पद नाव’ समजले जाते.

 

उच्च वर्गक : वंशांची आणि वर्गीकरणातील इतर उच्च वर्गकांची (प्रकारांची) नावे एका शब्दाचीच बनलेली (एकपद) असून तीदेखील अनन्यसाधारण असावी लागतात आणि प्राण्यांच्या इतर समूहांच्या निर्देशनाकरिता त्यांचा उपयोग करता येत नाही. वंशवाचक नाव नेहमी एकवचनी असते याच्यापेक्षा वरच्या वर्गकांची नावे नेहमी अनेकवचनी असतात. वंशापेक्षा वरच्या आणि गणापेक्षा खालच्या प्रकारांची (वर्गकांची) – म्हणजे कुलांची – नावे प्रारूपिक (नमुनेदार) व वंशाच्या नावाच्या मूळधातूला ‘idae’ प्रत्यय लावून आणि उपकुलांची नावे ‘inae’ प्रत्यय लावून तयार करतात उदा., फेलिस (Felis) या वंशांच्या नावापासून फेलिडी (Felidae) आणि फेलिनी (Felinae) ही नावे तयार केलेली आहेत. वंशवाचक नावांना जे नियम लागू आहेत तेच नियम उपवंशवाचक नावांनाही लागू आहेत परंतु लिहिताना ती नावे वंशवाचक नावानंतर कंसात लिहितात. उदा., फेलिस (लिंक्स) कॅनडेन्सिस [Felis (Lynx) canadensis]. कुलांच्या नावांना अग्रमान्यता नियम काटेकोरपणाने लावीत नाहीत. गण, वर्ग आणि संघ यांच्यासारख्या उच्च वर्गांची नावे सापेक्षतेने थोडी असून ती बहुधा नियमांच्या ऐवजी एकमताने ठरविली जातात. गण, वर्ग आणि संघ यांच्या नावांचे शेवट कुलदर्शक नावांच्या शेवटांप्रमाणे सारखे नसतात पण व्यवहारात या बाबतीत काही समूहांमध्ये बरीच एकरूपता आढळून येते उदा., कीटक वर्गातील सगळ्या गणांच्या नावाचा शेवट सामान्यतः ‘-टेरा’ (-ptere) या प्रत्ययाने झालेला असतो.

 

प्राणिनामपद्धती आणि ⇨वनस्पतिनामपद्धती या तत्त्वतः आणि पुष्कळ अंशी व्यवहारात एकसारख्याच असल्या, तरी पहिली दुसरीपासून अगदी स्वतंत्र आहे. म्हणून वनस्पतिशास्त्रात एखादे नाव जरी वापरण्यात आलेले असले, तरी तेच नाव प्राणिशास्त्रात वापरण्यास कोणत्याही तऱ्हेची आडकाठी नाही.

 

आंतरराष्ट्रीय संहिता : जीवांना आणि त्यांच्या समूहांना शास्त्रशुद्ध नावे देण्यासंबंधीचे नियम जरी लिनीअस यांनी काळजीपूर्वक तयार केले होते, तरी त्यानंतरच्या काळात ज्ञानात जसजशी भर पडत गेली तसतशी या नियमांत सुधारणा करण्यात आली किंवा ते बदलण्यात आले. अग्रमान्यता नियम हा या संहितेचा पाया होय. प्रत्यक्ष व्यवहारात निरनिराळ्या कार्यपद्धती सुरू झाल्यामुळे उत्पन्न झालेला गोंधळ टाळण्याकरिता आणि लिनीअस यांची मूळ पद्धती टिकविण्याकरिता अधिक स्थिर आणि सार्वत्रिक नामपद्धती सुरू करण्याची निकड भासू लागली. हा हेतू साध्य करण्याकरिता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी या परिषदेने ‘प्राणिनामपद्धतीची आंतरराष्ट्रीय संहिता’ तयार केली आणि तिचे स्पष्टीकरण आणि अंमलबजावणी करण्याकरिता प्राणिनामकरणाविषयी एक कायमचा आंतरराष्ट्रीय आयोग नेमला. या संहितेत ४१ कलमे आणि २० शिफारसी असून त्या कुल, वंश, जाती आणि उपजाती यांची नावे, त्यांचे प्रामाण्य, निर्मिती आणि शुद्धलेखन, जाती व वंश यांच्या प्रारूपांचे निर्देशन आणि इतर संबंधित बाबींच्या व्यवस्थेविषयी आहेत. प्रकाशनाला प्राधान्य देण्याच्या तत्त्वाचा स्वीकार, वनस्पतिनामकरणापासून वेगळे करणे आणि लिनीअस यांच्या Systema Naturae या ग्रंथाची दहावी आवृत्ती (१७५८) हा प्राणिनामपद्धतीचा प्रस्थान बिंदू मानणे या त्यांपैकी विशेष गोष्टी होत. हे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कार्य वरील परिषदेने केले. तथापि या संहितेतील नियम मागच्या सु. १५० वर्षांतील प्राणिशास्त्रीय प्रकाशकांना लागू करण्यात आल्यामुळे पुष्कळ प्रश्न उत्पन्न झाले आणि त्या वेळी वैद्यक, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी या विज्ञानक्षेत्रांत सर्रास वापरल्या जाणाऱ्या पुष्कळ नावांचे स्थैर्य धोक्यात आले. याचा परिणाम असा झाला की, यानंतर काही प्रकरणांत लागू करण्यात आलेले नियम बाजूला सारण्याचे पूर्ण अधिकार आयोगाला देण्यात आले आणि रूढ झालेल्या नावांच्या रक्षणांच्या तत्त्वाकरिता अलीकडच्या परिषदांनी ते अधिक व्यापक केले. ज्या नावांच्या बाबतीत अशी कृती करण्यात आली ती नावे अधिकृत याद्यांत घालण्यात आली आणि या नावांत आणखी बदल करावयाचा नाही, असे ठरविण्यात आले.

 


  

आंतरराष्ट्रीय आयोगाचे निर्णय अभिप्रायांच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यांच्यापैकी सु. २०० निर्णय १९३५ सालच्या आधीच वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनने प्रसिद्ध केले आणि मागाहून लंडन येथील इंटरनॅशनल ट्रस्ट फॉर झूलॉजिकल नॉमेन्‌क्लेचर या संस्थेने प्रसिद्ध केले. १९४८ च्या सुमारास आंतरराष्ट्रीय नियमांत इतके दोष आढळू लागले, इतकी स्पष्टीकरणे समाविष्ट करण्याची राहून गेली आणि इतके नवीन प्रश्न उघड दिसू लागले की, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी या परिषदेने आपल्या पॅरिस येथील बैठकीत नियमांचा नवा मसुदा करण्याची आज्ञा केली. कोपनहेगन येथे १९५३ मध्ये या नियमांत आणखी बदल करण्यात आले आणि लंडन येथे १९५८ साली संहितेचा नवा मसुदा तयार करण्यात आला. नवी संहिता येथे १९६१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. १९६३ मध्ये वॉशिंग्टन येथे परिषदेची बैठक झाल्यानंतर १९६४ मध्ये या संहितेची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या आवृत्तीत इंग्रजी व फ्रेंच या भाषांत नियम दिलेले असून अधिक माहितीचा वर्गीकरणाला सहाय्यभूत होणाऱ्या सूचनांचा समावेश तीत केला आहे.

 

पहा : प्राण्यांचे वर्गीकरण वर्गीकरणविज्ञान.

 

संदर्भ : 1. Hickman, C. P. Integrtated Principles of Zoology, Tokyo, 1966.

            2. Stoll, N. R. et al., International Code of Zoologycal Nomenclature Adopted by the 15th      International Congress of  Zoology, London, 1964,

            3. Storer, T. L. Usinger, R. L. General Zoology,Tokyo, 1957

 

कर्वे, ज. नी.