कीटोपोडा : ॲनेलिडा (वलयी) संघातील एक वर्ग. या संघाचे कीटोपोडा, हिरुडिनिया आणि आर्किॲनेलिडा असे तीन वर्ग आहेत. कीटोपोडा वर्गामध्ये पॉलिकीटा व ऑलिगोकीटा असे दोन गण आहेत. काही प्राणिशास्त्रज्ञ कीटोपोडाला स्वतंत्र वर्ग मानण्याऐवजी त्याच्या पॉलिकीटा व ऑलिगोकीटा या गणांना स्वतंत्र वर्गांचे स्थान देतात.

या वर्गात शरीराचे खंडीभवन झालेल्या कृमींचा समावेश केला आहे. हे दिसण्यास जरी कृमींसारखे दिसले, तरी ते चपट्या व गोल कृमींहून वेगळे असतात. सर्व खंड जवळजवळ सारखे असतात. काहींत खंडांच्या पार्श्वभागावर पार्श्वपाद (बाजूंवर जोडीने असणारे व पोहण्याकरिता उपयोगी पडणारे लहान स्नायुमय अवयव) असतात. पार्श्वपादांवर शूक (लहान राठ केसांसारख्या रचना) असतात. देहगुहा (शरीराची पोकळी) प्रशस्त असून स्नायुमय पडद्यांनी तिचे खंडश: विभाजन झालेले असते. परिवहन तंत्राचा (रुधिराभिसरण संस्थेचा) चांगला विकास झालेला असतो. काहींत श्वसनासाठी क्लोम (कल्ले) असतात. वृक्कक (निरुपयोगी द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकणारे नळीसारखे इंद्रिय) हे उत्सर्जन तंत्राचे प्रमुख भाग होत. प्रमस्तिष्कातील (मेंदूच्या पुढच्या भागातील) गुच्छिका (ज्यांच्यापासून मज्जातंतू निघतात अशा मज्जापेशींचा समूह) प्रोस्टोमियमामध्ये असते. गुच्छिका असलेली अधर युग्मित तंत्रिका (मज्जातंतू) शरीराच्या शेवटच्या टोकापर्यंत असते. काही  उभयलिंगी (नर आणि मादी या दोहोंची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असणे) व काही एकलिंगी असतात. काहींच्या विकासात डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढांशी साम्य  नसणारी सामान्यतः क्रियाशील अवस्था) असते, पण काहींत ती नसते. डिंभाला ट्रोकोफोर म्हणतात [ → डिंभ]. 

जोशी, मीनाक्षी