प्रचंडगड : (तोरणा). शिवकालीन एक डोंगरी किल्ला. तोरणा या नावाने तो प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भोरच्या वायव्येस सु. २६ किमी. व पुण्याच्या नैर्ऋत्येस सु. ६५ किमी.वर तो वसला आहे. नसरापूर-वेल्हे रस्त्यावरील वेल्हे बुद्रुकपासून किल्ल्याकडे रस्ता जातो. उंची समुद्रसपाटीपासून सु. १,४०४ मीटर. शिवाजी महाराजांपूर्वी कानद खोऱ्याचा देशमुख कान्होजी झुंजारराव मरळ हा या किल्ल्याची व्यवस्था पाही. शिवाजी महाराजांनी १६४६ च्या सुमारास तो घेतला आणि त्यास प्रचंडगड हे नाव दिले. पुढे मिर्झाराजा जयसिंगबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजीने तो औरंगजेबास दिला (१६६५) पण पुन्हा १६७१-७२ मध्ये तो परत घेतला आणि सु. ५,००० होन खर्चून त्याची डागडुजी केली. संभाजीच्या मृत्यूनंतर तो कधी मोगलांकडे, तर कधी मराठ्यांकडे होता. औरंगजेबाने तो १७०४ मध्ये जिंकल्यावर त्याचे नाव फुतूहुल्घैब असे ठेवले. शाहूच्या कारकीर्दीत तो मराठ्यांकडे आला आणि भोर संस्थान विलीन होईपर्यंत भोरच्या पंतसचिवांच्या आधिपत्याखाली होता. या गडाचे झुंजारमल व बुधला अशा दोन माच्या व थोड्याशाच उंचीचा बालेकिल्ला असे तीन भाग आहेत. झुंजारमल माची विस्ताराने लहान आहे पण ही उणीव बुधला माचीच्या विस्ताराने भरून काढली आहे. कदाचित या विस्तारामुळेच याला प्रचंडगड असे नाव दिले असावे. या किल्ल्यास एकामागून एक बिनी व कोठी असे दोन मुख्य दरवाजे असून त्यांतून गडाच्या माथ्यावर येताच तोरणजाईची देवळी, अंबारखाना, तोरण व खोकड ही टाकी लागतात. येथील तटास टकमक, भेद, झुंजार, सफेती, माळेचा, फुटका व चिलखती असे बुरूज आहेत. पाण्यासाठी खांब, कापूर, शिवगंगा, पाताळगंगा, महाळुंगे, महार, मेंगाई इ. टाक्या आहेत. गडावर सदरा, विशाळा, दारूखाना, लक्कडखाना इ. वास्तू असून शिवाय घंगाळजाई व वरदानी यांची मंदिरे आहेत.

संदर्भ : खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, पुणे, १९६७.

खरे, ग. ह.