प्येर्म : (पर्म). रशियाच्या सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिक विभागातीत प्येर्म प्रांताचे प्रशासकीय केंद्र.लोकसंख्या ९·८५ लक्ष (१९७८).कामा नदीवरील हे बंदर चिल्याबिन्स्कच्या वायव्येस असून सायबीरियन महामार्ग व ट्रान्स-सायबीरियन लोहमार्ग यांच्याशी जोडलेले आहे. या प्रदेशात ‘प्येर्मयाक’ नावाच्या एका फिनिश जमातीने प्रथम वसाहत केल्याचे मानतात. १५६८ मध्ये रशियन व्यापाऱ्यांनी याच भागात वसाहत स्थापिलीतिचेच पुढे सतराव्या शतकात ‘प्येर्म’ शहरात रूपांतर झाले. सोळाव्या शतकात या प्रदेशात तांबे व मीठ आणि सतराव्या शतकात लोह या खनिजांचे उत्पादन सुरू झाले. १७८० मध्ये प्येर्म हे उरल विभागाचे प्रशासकीय केंद्र म्हणून वसविले गेले. प्येर्मच्या परिसरातील खडकांवरूनच एका भूवैज्ञानिक काळाच्या विभागाला ‘पर्मियन कल्प’ असे नाव पडले. सतराव्या व अठराव्या शतकांत प्येर्म हे हद्दपार केलेल्या राजकीय नेत्यांचे आश्रयस्थान होते. १९४०—५७ या काळात शहराला रशियन नेता मॉल्युटॉव्ह याचे नाव देण्यात आले होते.
प्येर्मचा आसमंत विविध खनिजांनी समृद्ध असल्याने आणि शहराजवळच कामा नदीवरील ५ लक्ष किवॉ. क्षमतेच्या जलविद्युत् निर्मितिकेंद्रामुळे ते महत्त्वाचे उद्योगकेंद्र बनले आहे. येथे विमानएंजिने,कारब्युरेटर,कोळसाखाणयंत्रे,जहाजबांधणी,तेलशुद्धीकरण,कागद,दूरध्वनियंत्रसामग्री,खते,रसायने,इलेक्ट्रॉनीय उपकरणे,कातडी वस्तूंची निर्मिती इ. उद्योगांचा विकास झाला आहे. प्येर्म हे शैक्षणिक केंद्र असून येथे ए. एम्. गॉर्की विद्यापीठ (स्था. १९१६)तसेच वैद्यक,कृषी,ओषधिविज्ञान,शिक्षक-प्रशिक्षण इ. शिक्षणसंस्था आहेत. येथे संग्रहालय,चार नाट्यगृहे,रशियामधील सर्वांत जुन्या संगीतिका-कंपन्यांपैकी एक,कलावीथी इ. कलात्मक-सांस्कृतिक केंद्रे आहेत.
फडके, वि. शं. गद्रे, वि. रा.