पोपटवेल : (लॅ. ॲरिस्टोलोकिया ब्रॅसिलेन्सिस कुल-ॲरिस्टोलोकिएसी) ही मोठी वेल [ → महालता] मूळची ब्राझीलमधील असून बागेत सर्वत्र लावलेली आढळते. पाने साधी, हृदयाकृती, मूत्रपिंडाकृती, तळाशी खोलगट व काहीशी टोकदार, लांब देठाची असून एकाआड एक येतात. फुले मोठी, मळकट पिवळी असून त्यांवर जांभळी जाळी व ठिपके आणि खालच्या वाकड्या नळीत गर्द जांभळी असतात. परिदलमंडल पुष्पमुकुटासारखे [→ फूल], दोन ओठांसारखे व एकूण फुलाचा आकार पोपटाच्या चोचीसारखा व डोक्यासारखा असल्याने तसे मराठी नाव पडले. संरचना व शारीरिक लक्षणे ⇨ ॲरिस्टोलोकिएसी कुलात (ईश्वरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे. ⇨ परागणाकरिता कीटकांचा उपयोग विशिष्ट कारायंत्रणेमुळे होतो. फळ (द्वयावृत बोंड) शुष्क व आतील पडद्यांच्या रेषेत तडकणारे असून त्यात अनेक चपट्या सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) बिया असतात.
ॲरिस्टोलोकिया ऑर्निथोसिफॅला ही जाती ब्राझीलमधीलच असून हिची पाने मोठी व परिदलमंडलाचा वरचा भाग भाल्यासारखा व निमुळत्या टोकाचा असून त्याचा फुगीर भाग पक्ष्याच्या चोचीसारखा असतो, ॲ. एलेगन्स (कॅलिको फ्लॉवर), ॲ. ग्रँडिफ्लोरा (पेलिकन फ्लॉवर, स्वान फ्लॉवर) आणि ॲ. इंडिका (सापसंद) ह्या वेली बागेत शोभेकरिता लावतात.
सावलीकरिता मांडवावर चढविण्यास योग्य कारण वेल जोमाने, जलद व कोठेही वाढते. भरपूर पाने येऊन मांडव लवकर झाकाळतो यांवर कवक रोग (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीपासून होणारे रोग) किंवा कीड पडत नाही. पक्क्या काष्ठमय फांद्यांच्या छाटकलमांनी मार्च-एप्रिलमध्ये अभिवृद्धी (लागवड) करतात बियांपासूनही रोपे करून लावतात साधारणपणे लागवडीनंतर एक वर्षाने फुले येतात. (चित्रपत्रे).
संदर्भ : Pal, B. P. Beautiful Climbers of
जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.
“