आंधळा साप : हा साप टिफ्लॉपिडी या सर्पकुलातील आहे. या कुलातील साप लहान, कृमिसदृश व बिळे करणारे असून जगाच्या उष्ण आणि किंचित उष्ण प्रदेशांत आढळतात. यांचे दोन वंश आणि सु. शंभर जाती आहेत.
या सापाच्या भारतात सगळीकडे आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव टिफ्लॉप्स ब्रॅमिनस आहे. यासापाच्या दोन पोटजाती महाराष्ट्रात आढळतात. कुजणाऱ्या पालापाचोळ्यात हा साप सापडतो. त्याची लांबी सु. १७ – १८ सेंमी. असते. रंग तपकिरी असतो. शरीराची वरची बाजू तकतकीत धुपेली (चॉकोलेटी) रंगाची व खालची फिकट असते. शरीरावरील खवले गुळगुळीत, गोल आणि चकचकीत असून पाठीवरील आणि पोटाकडील खवल्यांत फरक नसतो. ते कौलांप्रमाणे बसविल्यासारखे दिसतात. डोके स्पष्टपणे निराळे नसते शेपूट बोटके असते. दोहोंचा रंग पांढुरका असतो. याच्या वरच्या जबड्यात थोडे दात असतात. डोळे लहान असून खवल्यांनी उणेपुरे झाकलेले असतात म्हणून ते अस्पष्ट ठिपक्यांसारखे दिसतात. शरीराच्या पश्च भागात श्रोणीय (ढुंगणाच्या) आणि मागच्या पायांच्या अस्थींचे अवशेष त्वचेखाली आढळतात.
यांची गती मंद असते, पण मऊ मातीत ते फार झपाट्याने बिळे करतात. कृमी, मऊ शरीराचे कीटक आणि त्यांच्या अळ्या हे यांचे खाद्य होय. हे साप अंडज (अंडी घालणारे) आहेत. प्राचीन सर्पांचे हल्ली अस्तित्वात असलेले हे प्रतिनिधी आहेत, असे मानले जाते.
कर्वे, ज. नी.