आतिथ्य : अन्य स्थळी राहणारी, परिचित अगर अपरिचित, परंतु स्वकुटुंबीय नसलेली व्यक्ती दारी आली तर तिला योग्य असे अन्न, आसन, वस्त्र, निवारा आणि संरक्षण किंवा यांपैकी शक्य ते देऊन, तात्पुरते अगर काही विशिष्ट काळ आदराने वागविणे म्हणजे आतिथ्य अथवा पाहुणचार होय. दारी आलेला पाहुणा हा अतिथी म्हणजे आगाऊ तिथी-वार निश्‍चित नसता अकल्पितपणे आलेला, अशी आणखी एक व्याख्या आहे.

आतिथ्य सर्व प्रकारच्या समाजांत सर्व काळी दिसून येते. आदिवासी समाजात आतिथ्य हा रूढीचा आणि परंपरेचा एक भाग असतो. अन्नवस्त्राबरोबरच अतिथीची करमणूक करणे आणि त्याच्या उपभोगाकरिता स्वत:ची पत्‍नी देऊ करणे, अशी प्रथा अमेरिकन इंडियन आणि मायक्रोनेशियाच्या जमातींत होती. काही भारतीय आदिवासींमध्ये पराजित शत्रू जर पाहुणा म्हणून आला, तर त्याला आसरा देणे कर्तव्य समजले जाते. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत पाहुण्याने मागितलेली वस्तू नाकारणे कमीपणाचे समजत. वस्तूंची देवघेव व व्यापार हेही आतिथ्याच्या प्रथेचे एक कारण होते. सर्व प्राचीन संस्कृतींत–उदा., ईजिप्शियन, बॅबिलोनियन, ग्रीक, गॅलिक आणि रोमन यांच्यात– आतिथ्य सर्वमान्य होते. अतिथीबरोबर जेवण घेणे आणि त्याच्याशी इमान पाळणे, हे अरबांच्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य होते. राजकीय दृष्ट्या अतिथी हा शत्रू किंवा हेरही असण्याची शक्यता असे. त्याच्यापासून धोक्याची शक्यता असल्यामुळे स्पार्टासारख्या ग्रीक नगर-राज्यात आणि रोमन साम्राज्यात तत्संबंधी काही संरक्षक स्वरूपाचे कायदे केले गेले होते. 

समूहाची भावना आणि समूहातील सर्व घटकांच्या उदरनिर्वाहाच्या जबाबदारीची जाणीव ही आतिथ्यामागची एक सामाजिक प्रेरणा आहे. खाजगी मालमत्तेच्या अस्तित्वाबरोबरच तशी मालमत्ता नसलेल्या गरीब वर्गाची तरतूद करणे ही एक सामाजिक गरज होती. सर्वच धर्मांनी, विशेषत: हिंदू, ख्रिस्ती आणि कन्फ्यूशियन यांनी, अतिथ्य हे एक मोठे सामाजिक आणि नैतिक मूल्य मानले. आतिथ्य हा त्यामुळे एक वैयक्तिक गुण न ठरता त्याला एका सामाजिक व धार्मिक मूल्याची प्रतिष्ठा आली. कुराण, बायबल, श्रुति, स्मृती इ. धर्मग्रंथांत आतिथ्याची महती सांगून त्याबद्दलचे पवित्र आदेश देण्यात आले आहेत.

सर्व धर्मांत आतिथ्य हे सामाजिक मूल्य मानले गेले असले, तरी त्याचे स्वरूप आणि आविष्कार भिन्नपणे झालेला दिसून येतो. हिंदुधर्मात मोक्ष आणि पुण्य या कल्पनांभोवती आतिथ्यकल्पना केंद्रित झालेली असून मुख्यत: गृहस्थाचा आणि राजाचा धर्म म्हणून तिचा आविष्कार झालेला आहे. माता, पिता आणि आचार्य यांच्यानंतर अतिथीलाही हिंदुधर्मात देवासमान मानले आहे. ‘अतिथिदेवो भव’ हे उपनिषदातील वचन सुप्रसिद्ध आहे. तसेच गृहस्थाश्रमी पुरुषास म्हणजे यजमानास सांगितलेल्या पंचमहायज्ञांपैकी एक यज्ञ अथीतिसाठी करावयाचा, असे सांगितले आहे. तथापि याचबरोबर जातिजातींतील स्पर्शास्पर्श, अन्नाबद्दलच्या विटाळाही कल्पना व पूजा, दान इत्यादींबाबत ब्राह्मणाला दिला जाणारा अग्रमान या मर्यादांचाही उल्लेख केला पाहिजे. या मर्यादा आणि जातीनुरूप अतिथीला मिळणाऱ्या मानाचा आणि इतर रीतीभातींचा प्रश्न सोडला, तर प्रत्यक्ष प्रथा म्हणून भारतीयांच्या आतिथ्यात कुठे उणेपणा आलेला नाही. जात-जमातीचा विचार करू नये व दाराशी आलेल्या व्यक्तीला अन्नावाचून परत धाडू नये, असा संकेत भारतात रूढ झालेला दिसतो. मिश्रभोजनास मान्यता नसलेल्या ग्रामसमूहांमध्येसुद्धा विजातीय पाहुणा घरी आला आणि त्यातून तो उच्चवर्णीय असला, तर त्यास शिधा देऊन वेगळ्या स्वयंपाकाची सोय करून दिली जात असे. काही खेड्यांतून त्याची त्याच्याच जातीच्या कुटुंबाकडे सोय करून देण्याची परस्परपूरक पद्धत होती.

ख्रिस्ती धर्मातील आतिथ्य चर्चमुळे संस्थाबद्ध झालेले आहे. कोणाही माणसाचे आतिथ्य प्रत्येक बिशपने अंगीकारले पाहिजे, असे बायबलमध्ये सेंट पॉलच्या तोंडचे वचन आहे. यूरोपमध्ये ‘हॉस्पिटल’ आणि बऱ्याच मठांशेजारी थकल्याभागल्या प्रवाशांसाठी निवास म्हणून स्थापन झालेली दीनगृहे, या संस्था या प्रेरणेतूनच निर्माण झाल्या. पुढे ख्रिस्ती मिशनमधून आतिथ्यकल्पनेचा विस्तार एका व्यापक सेवाधर्मात झाला.

सामाजिक आचार या दृष्टीने आज आतिथ्याचे स्वरूप पालटले आहे. आतिथ्य कोणाचे करावे, ही आता वैयक्तिक बाब झाली आहे. ते कोणत्या प्रकारे करावे, याबाबतची पूर्वींची धार्मिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये पुसट झाली असून नवे संकेत रूढ होत आहेत. समाजकल्याण हा आधुनिक राज्यसंस्थेचा ध्येयवाद आणि कार्यक्रम असल्यामुळे अतिथींसाठी प्रवास, दळणवळण आणि संरक्षण ह्या बाबतींत अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. आधुनिक उद्योगप्रधान समाजात हॉटेलसारख्या धंदेवाईक व्यापारी संघटना अन्न आणि निवारा देण्याचे कार्य फार मोठ्या प्रमाणावर आज करीत आहेत.

कुलकर्णी, मा. गु. काळदाते, सुधा