आटरबुम, पेअर डानिएल आमाडेअस : (१९ जानेवारी १७९०–२१ जुलै १८५५). स्वीडिश कवी आणि टीकाकार. जन्म ऑस्बो येथे. अप्साला विद्यापीठात शिक्षण व पुढे तेथेच प्राध्यापक. स्वीडनमधील स्वच्छंदतावादी चळवळीचा तो सूत्रधार होता. तेथील स्वच्छंदतावादी साहित्यमंडळाच्या मुखपत्रातून त्याने अनेक कविता व टीकालेख लिहिले. त्याच्या काव्यविचारांवर शेलिंगच्या निसर्ग–कलाविषयक विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो. Blommorna (१८१२–३७, इं. शी. द फ्लॉवर्स) हा त्याचा काव्यसंग्रह. त्याच्या काव्यात्म नाटकांपैकी Fagel bla (१८१८, इं. शी. द ब्लू बर्ड) हे अपूर्ण आहे, तर Lycksalighetens (१८२४–२७, इं. शी. द आइल ऑफ द ब्लेस्ड) हे पूर्ण स्वरूपात आढळते. ह्या दोन्ही साहित्यकृतींमधील काव्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. Svenska siare och Skalder (१८४१–५५, इं. शी. स्वीडिश सीअर्स अँड पोएट्स) ह्या आपल्या सप्तखंडात्मक ग्रंथातून स्वीडिश साहित्यिकांची चरित्रे लिहून त्याने फार मोठे वाङ्मयीन कार्य केले. स्टॉकहोम येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.