अळशी : ( जवस हिं. अलसी गु. अलशी क. अगसी सं. अतसी, मलिना, तैलोत्तमा इ. लिन्सीड, फ्‍लॅक्स लॅ. लायनम ॲसिटॅटीसिमम, कुल—लायनेसी ). या वर्षायू ( वर्षभर जगणाऱ्या ) क्षुपी (झुडपासारख्या) वनस्पतीचे मूलस्थाने निश्चित माहीत नाही. भूमध्यसामुद्रिक भागात आढळणाऱ्या तिच्या वंशातील एका जातीचा (लायनम बाएने ) व तिचा जवळचा संबंध असावा किंवा तिचे मूलस्थान पर्शियन आखात, कॅस्पियन व काळा समुद्र यांच्या मधल्या भागात असावे किंवा ती मूळची भारतीय असावी, अशी अनेक मते आहेत. ती जंगली अवस्थेत आढळत नाही. तिची लागवड फारच पुरातन काळापासून होत असल्याचा पुरावा आहे. हल्ली स्वित्झर्लंड असलेल्या ठिकाणी १०,००० वर्षांपूर्वी राहणारा अश्मयुगीन मानव अळशीचे कापड वापरीत होता. ४,००० वर्षांपूर्वीच्या ईजिप्शियन ममी याच कापडात गुंडाळलेल्या आढळल्या आहेत. फिनिशिया, बॅबिलोनिया, कोल्वीस, ग्रीस, ईजिप्त, गॉल, जर्मनी व स्पेन येथून आणण्यात येणाऱ्या अळशीच्या कापडाचा वापर रोमन राजे लोक करीत. रोमनांनी इ.स. ४३ मध्ये इंग्लंडवर स्वारी केली. तत्पूर्वी निदान १०० वर्षे तरी हल्लीच्या बेल्जियममध्ये राहणाऱ्या लोकांनी हे कापड बनविण्याची कला इंग्लंडात नेली. यूरोपमध्ये इ. स. ७००–१७०० पर्यंतच्या कालात कापडाकरिता प्रामुख्याने अळशीचा उपयोग केला जात होता.

हल्ली भारतात सखल भागात सर्वत्र व १,८०० मी. उंचीपर्यंत अळशीची लागवड करतात. भूमध्यसामुद्रिक बेटे, आशिया-मायनर, ईजिप्त, अल्जीरिया, ट्युनिशिया, स्पेन, इटली व ग्रीस येथे रेशमी धागा देणाऱ्या अळशीची लागवड पूर्वीपासून करतात. आशियात तुर्कस्तान, अफगाणिस्तान, भारत इ. देशांत प्रामुख्याने तेल देणाऱ्या अळशीची लागवड होत आली आहे. आशिया-मायनर व द. रशियात दोन्ही प्रकारच्या अळशीची लागवड करतात. रशियाचा या लागवडीत जगात पहिला क्रमांक आहे. फुलझाडांपैकी लायनेसी कुलातील [→ जिरॅनिएलीझ] या क्षुपाची उंची ६०–१२० सेंमी.पर्यंत जाते. पाने साधी रेखाकृती, भाल्यासारखी व लघुकोनी असतात फुले लहान, निळी किंवा पांढरी असून टोकांकडे परिमंजऱ्या [ → पुष्पबंध] फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळात पाच कप्पे असून प्रत्येकात दोन बिया असतात त्या पिवळसर किंवा काळसर भुऱ्या, लहान, चपट्या, गोलसर व चकचकीत असतात. त्यांच्यापासून सु. ४० टक्के तेल मिळते बिया थंड किंवा सु. ९४ से. पर्यंत तापवून त्या घाणीत मळून तेल काढतात, तेलाला थोडा वास येतो ते सहज वाळणारे असल्याने मुख्यत: रंगलेप, मेणकापड, रोगण, लिनोलियम इत्यादींत वापरतात. पेंड पौष्टिक असल्याने तिचा जनावरांस खुराक देतात, शिवाय खताकरिताही वापरतात. उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात व पंजाबात अळशीच्या बियांपासून ‘पिनी’ नावाची मिठाई करतात. मध्य प्रदेश व महाराष्ट्रात चटणी करतात. बी शोथशामक (दाह कमी करणारे), कफोत्सारक (कफ सुटा करणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे) व भाजण्यावर स्तंभक (आकुंचन करणारे) असते. बियांचा काढा पडसे, खोकला, श्वासनलिकाविकार, जनन-मूत्र-मार्गदाह, परमा, अतिसार इत्यादींवर देतात. बियांचे पोटीस जमखा, दाह, गळवे, फोड, संधिवात, सूज इत्यादींवर बांधतात. चुन्याची निवळी व जवस तेल मिसळून शरीराच्या भाजलेल्या अवयवांवर लावतात. खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग दोऱ्या, तलम कापड व किनारी (लेस) ह्यांकरिता मोठ्या प्रमाणावर करतात. इ. स. १८०० पासून दोरांच्या उत्पादनात अळशीची जागा तागाने घेतली आहे.

जमदाडे, ज. वि.

धाग्यांकरिता लावण्यात येणाऱ्या प्रकारापासून तलम पांढरे कापड, चादरी, सतरंज्या, ताडपत्र्या, तंबूचे कापड, मासे धरण्याची जाळी, जहाजांच्या शिडांचे कापड, पाण्याच्या पिशव्यांचे कापड, नवार वगैरे तयार करतात.

दाणे काढून घेतलेल्या अळशीच्या काडापासून काढलेला धागा कमी दर्जाचा असला, तरी मजबूत असतो. तो कातून त्याचे कापड बनवितात. तो कापूस, लोकर व कोशाच्या रेशमातही मिसळतात. त्याच्यापासून दोरा, कॅनव्हास, दोर-दोरखंडे, पोती वगैरे तयार करतात. वाखाच्या बुरकुलापासून सिगारेटीचा, किंमती पुस्तकांचा व चलनी नोटांचा कागद तयार करतात. काडाच्या काष्ठमय भागापासून पुठ्ठे व वेष्टनाचा कागद बनवितात. पेंडीपासून काढलेला बुळबुळीत व चिकट पदार्थ औषधी उत्पादनात व कांतिवर्धक पदार्थांच्या निर्मितीत वापरतात. भुसा गुरांना व घोड्यांना चारतात. अळशीच्या उत्पादनामध्ये भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. भारतात गळिताच्या धान्यात अळशीचा क्रमांक ४ था आहे. १९७०-७१ साली भारतामध्ये अळशीचे क्षेत्र १८·३ लाख हेक्टर व उत्पादन सु. साडेचार लाख टन होते.

केरळ, तमिळनाडू, दिल्ली, मणिपूर सोडून भारतभर हे पीक घेतात. भारतातील एकूण उत्पादनापैकी २/३ उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात होते. बाकीचे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व बिहार यांमध्ये होते. कानपूर (उत्तर प्रदेश), पाटणा (बिहार), झाशी व जबलपूर (मध्य प्रदेश) ही अळशीच्या व्यापाराची प्रमुख केंद्रे आहेत.

हवामान, जमीन इ. : भारतात दरसाल ७५–१७५ सेंमी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशांत अळशी मुख्यत्वे रबी हंगामात कोरडवाहू पीक म्हणून पेरतात. फक्त बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाब येथे काही भागांत थोड्या प्रमाणावर पाण्याखाली लावतात. कानपूर येथील प्रयोगांबाबत असे दिसून आले की, पेरणीच्या व फुले येण्याच्या वेळेला पाणी दिल्यास अळशीचे उत्पन्न वाढते. पुरेशी ओल मिळाल्यास बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक येते. परंतु चांगल्या जलधारणाशक्ती असलेल्या भारी काळ्या जमिनीत तसेच मध्य भारता – तील व द्वीपकल्पीय भारतातील कापसाच्या काळ्या जमिनीत आणि विशेषत: गव्हाळी जमिनीत हे पीक चांगले वाढते.


भारतातील निरनिराळ्या राज्यांसाठी तयार करण्यात आलेली अळशीची सुधारलेली वाणे 

राज्य

सुधारलेले वाण

 

पेरणीवेळ

कापणीवेळ

पिकाचे दिवस

हेक्टरी उत्पन्न किग्रॅ.

तेल शे. प्रमाण

शेरा

महाराष्ट्र

क्र. ३

 

ऑक्टो. नोव्हें.

फेब्रु. मार्च

१२०

४५४

४०–४१

गडद बदामी, ढोबळ बी, उत्पादन जास्त, वाण हळवे, विदर्भासाठी योग्य

क्र. ५५

 

’’

’’

१२०

४२१

४१–४२

वरीलप्रमाणे गुणधर्म विदर्भाकरिता उपयुक्त

माळशिरस १०

 

ऑक्टो. सुरुवात

जानेवारी अखेर

११०

४८२

४१·१

उत्पादन जास्त, उत्तम तेल, सुकण्याबाबतही उत्तम, नाशिक भागासाठी उपयुक्त

सोलापूर ३६

 

’’

’’

११५

४४८

४२·७

बदामी, ढोबळ बी, सोलापूर जिल्ह्यासाठी उपयुक्त

संकरज ४/२९

 

ऑक्टो.

फेब्रुवारी

१२०

४६८

जास्त उत्पादन देणारे तांबेरा-प्रतिकारक वाण

बिहार

तीसी सुधारलेले

 

ऑक्टो. नोव्हें.

फेब्रु. मार्च

११०

१६८२

४१·५

बदामी, लवकर तयार होणारे वाण

पी–१४२

 

’’

’’

१२०

१६२२

४२

बदामी दाणे

बी. आर. १

 

’’

’’

१२०

५००

४२

बी व वाखासाठी उपयुक्त, तेल जास्त, वाख लिननासाठी

बी. आर. २

 

’’

’’

१२०

९१५

४२

उपयुक्त दाणे बदामी

बी. आर. ९

 

’’

’’

११०

२९२

४२

’’

बी. आर. १२

 

’’

’’

११५

३५१

४२

’’

मध्यप्रदेश (उत्तर व पूर्व)

क्र. ३

 

सप्टें. ऑक्टो.

डिसें. जाने.

१२० ते १५०

२३३ ते ४५४

४०–४१

गर्द बदामी उभळा, तांबेरा

ग्रहणशील

क्र. ५५

 

’’

’’

’’

२०२ ते ४२५

४१–४२

’’                      ’’

क्र. ४/२९

 

’’

’’

’’

२२७

’’                      ’’

एन.पी. ११

 

ऑक्टोबर मध्य

फेब्रु. अखेर

१३५

२७५

४०

पिवळा, उभळा-प्रतिरोधी

(माळवा)

आय. पी. १–६

 

’’

’’

१३५

२८८

४०·७

बदामी

आय. पी. ११

 

ऑक्टोबर

मार्च

१५०

२३५

४२·३

पांढरे बी

ओरिसा

मयूरभंज

 

ऑक्टो. अखेर

मध्य फेब्रु.

११०

८९७

पंजाब

के–२

 

ऑक्टोबर

एप्रिल

१७५

८४०

४६·५

बदामी, ढोबळ बी, उभळा, तांबेरा-प्रतिकारक

उत्तर प्रदेश

प्रकार क्र. १

 

मध्य ऑक्टो.

मार्च सुरुवात

१३५ ते १४०

१३४५

४०·९

वरीलप्रमाणे, गंगायमुनेच्या दक्षिणेकडील बुंदेलखंड भागाकरिता

क्र. १२६

 

ऑक्टोबर

मार्च

१४० ते १४५

८१५

४१·४

उत्तर गंगेच्या गाळ जमिनीकरिता उपयुक्त

प. बंगाल

डब्ल्यू. बी–३७

 

ऑक्टो. नोव्हें.

फेब्रुवारी मार्च

१३८

५३८

४०

दुकामी स्थानिकपेक्षा उत्पादन जास्त

डब्ल्यू. बी–६७

 

’’

’’

१३५

८०७

३९·८

जलदुर्भिक्ष सहन करणारे वाण


 व्यापारी दृष्ट्या अळशीचे दोन प्रकार केलेले आहेत. एक पिवळ्या दाण्याचा व दुसरा बदामी दाण्याचा. बदामी प्रकारात परत ढोबळ, मध्यम व बारीक दाण्याचा अशी प्रतवारी लावतात. परंतु पिवळ्यात अशी प्रतवारी लावीत नाहीत. वनस्पति-प्रजननाच्या कामी मात्र पिवळ्याचीही अशी प्रतवारी लावतात. बदामी प्रकारापेक्षा पिवळ्याचे तेल व पेंड यांचा रंग फिकट असतो.

आंत रजातीय संकराने उभळा व तांबेरा रोगांना प्रतिरोध करणारी निरनिराळी वाणे निरनिराळ्या राज्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. ती शेजारील पृष्ठावरील कोष्टकात दिली आहेत.

  

भारतात निरनिराळ्या भागांत पेरणीची वेळ वेगवेगळी असते. दक्षिण भागात बहुधा ऑक्टोबरमध्ये किंवा थोडे आधीसुद्धा पेरतात आणि फेब्रुवारीमध्ये पीक काढतात. गंगेच्या खोऱ्यातील गाळवट जमिनीत नोव्हेंबरमध्ये पीक पेरून ते एप्रिलमध्ये काढतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये पेरतात. काश्मीरमध्ये फ्रेबुवारी-मार्चमध्ये पेरतात. ओळींमध्ये २३–३० सेंमी. अंतर ठेवून बी पाभरीने ओळीत पेरतात. काही भागांत भाताच्या उभ्या पिकात काढणीच्या एक महिना अधी बी मुठीने फेकून पेरतात. स्वतंत्र पिकाला एका हेक्टरला २२-२३ किग्रॅ. व मिश्र पिकाला हेक्टरी ११ किग्रॅ. बी लागते.

महाराष्ट्रात पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बरेचसे क्षेत्र शाळू ज्वारीत आणि केव्हाकेव्हा गहू-हरभऱ्याच्या पिकांत मिश्र पीक म्हणून घेतात. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये गहू किंवा हरभऱ्याच्या पिकात घेतात. उत्तर प्रदेशात अळशी बहुतकरून गहू, जव, हरभरा, ज्वारी, सरसू, मोहरी इत्यादींत मिश्र पीक म्हणून घेतात. उत्तर प्रदेशात अळशीच्या एकंदर क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र मिश्र पीक असते.

गुरे, हरणे, जंगली डुकरे वगैरे पशू अळशीचे पीक खात नाहीत, म्हणून बऱ्याचशा ठिकाणी मुख्य पिकाच्या चारी बाजूंनी शेताच्या कडेने अळशी पेरतात. हरभरा, गहू, शाळू ज्वारी वगैरे पिकांच्या ६ ओळींनंतर ३ ओळी अळशीच्या पेरतात. यामुळे पिकाचे संरक्षण होते.

हरभरा वगैरेसारख्या कडधान्यात अळशीचे मिश्र पीक घेतल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते, त्याचप्रमाणे प्रतिकूल हवामानापासून होणारी हानी टळते.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील प्रयोगांवरून असे दिसून आले की, अळशीला हेक्टरामध्ये ४५ किग्रॅ. नायट्रोजन दिल्यास ७४८ किग्रॅ. जास्त उत्पन्न मिळते. उत्तर प्रदेशात जिरायत पिकास हेक्टराला १८ आणि ३६ किग्रॅ. नायट्रोजन दिल्यामुळे अनुक्रमे ११८ आणि २०० किग्रॅ. उत्पन्न जास्त मिळाले. ऑस्ट्रेलियातील व अमेरिकेतील रोगप्रतिरोधी जातींचा पुसा येथील जातीशी संकर करून रोगप्रतिरोधी हळव्या, जास्त उत्पादनाच्या व जास्त तेलाच्या जाती काढल्या आहेत.

कापणी, मळणी : फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत झाडावरची बोंडे वाळू लागली म्हणजे झाटे उपटून किंवा जमिनीसरपट कापून ती खळग्यात वाळवून मोगरीने अगर काठीने बडवून किंवा बैलांच्या पायाखाली तुडवून, मळून, उफणून दाणे काढून घेतात व ते साफ करतात. हेक्टरामध्ये सरासरी २२५–२८० किग्रॅ. दाणे इतके उत्पन्न निघते. इतर देशांशी तुलना करता हे उत्पन्न फार कमी दिसते. अमेरिकेत ४९३ किग्रॅ., अर्जेंटिनात ५२८, यूरग्वायात ६१०, कॅनडात ६२८ आणि मेक्सिकोमध्ये ९९६ किग्रॅ. उत्पन्न दर हेक्टरामधून निघते. परंतु विशेष उल्लेखनीय म्हणजे हल्ली काही सुधारलेल्या जातींपासून भारतातील निरनिराळ्या राज्यांत जास्तीत जास्त १,६८२ ते १,७९४ किग्रॅ. पर्यंत उत्पन्न दर हेक्टरामधून मिळत असल्याचे आढळून आले आहे. अळशीचे बी पोत्यात भरून कोरड्या जागी ठेवल्यास पुष्कळ दिवस चांगले राहते. दमट हवेत ठेवल्याने तेलात अम्‍ल वाढून रंग काळा होतो. दाणे ४–७ मिमी. आकाराचे व ३·५ ते ११ मिग्रॅ. वजनाचे असतात. त्यांना सौम्य वास व बुळबुळीत तेलकट चव असते. त्यांत अ व ई ही जीवनसत्त्वे असतात.

भारतातील अळशीच्या एकंदर उत्पादनातील ८८ टक्के दाण्यांमधून तेल काढतात. बियांत सरासरीने ३३–४३ टक्के तेल असते. त्यापैकी देशी घाणीमधून २८–३० टक्क्यांपर्यंत तेल मिळते. बैल घाणीचे तेल खाण्यासाठी वापरतात.

वाखाकरिता लावलेल्या अळशीच्या प्रकाराला इंग्रजीत फ्लॅक्स म्हणतात. हे पीक बोंडे कच्ची असतानाच काढतात. या पिकातून अळशी काढून घेतल्यानंतर उरलेल्या काडांपासून वाख काढतात, पण या अळशीमध्ये तेल कमी असते. साधारणत: एक हेक्टरामधील पिकापासून ९२०–१,४०० किग्रॅ. वाख मिळतो   [ → फ्‍लॅक्स].

भारता च्या शासन-नियमांप्रमाणे १९५२-५३ पासून कच्चा माल बाहेर निर्यात करण्यापेक्षा तयार माल निर्यात करण्याच्या धोरणामुळे अळशीची निर्यात बंद झाली. १९६० मध्ये भारतातून ६,६८२ हजार टन कच्चे तेल आणि ५३१ हजार टन उकळलेले तेल (बेलतेल) परदेशी निर्यात झाले.

चौधरी, रा. मो.


रोग : या पिकावर प्रामुख्याने तांबेरा व मर हे रोग आढळतात.

(१) तांबेरा: हा रोग मेलँप्‌सोरा लायनाथ  या कवकामुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव प्रथम पानांवर नंतर खोडावर होतो. प्रथम नारिंगी रंगाची भुकटी असलेले फोडासारखे ठिपके तयार होतात. नंतर ते काळपट पडतात. रोगामुळे कित्येकदा रोगट झाड मरते. रोगाचा प्रसार हवेतून होतो. रोगकारक कवक रोगट पाला – पाचोळ्यावर राहू शकते. रोगामुळे झाडांना बोंडे कमी येतात. बोंडातील दाण्याचा आकार लहान होतो त्यामुळे उत्पादन कमी येते. यावर उपाय म्हणून तांबेरा-प्रतिकारक जातींची लागवड करतात, असे कार्य भारतीय कृषी संशोधन संस्था येथे झालेले असून आर. आर. ५, ९, १०, ३७, ३८, ४०, ४५ इ. तांबेरा-प्रतिकारक वाणे उपलब्ध झाली आहेत.

(२) मर : हा रोग फ्युजेरियम लायनाय  या कवकामुळे होतो. रोगामुळे सुरुवातीस झाडाची पान पिवळी पडून नंतर झाड मरते. रोगट मुळाच्या व खोडाच्या आतील वाहकवृंद ( पाणी व अन्नरसाची ने-आण करणारे शरीर घटक) काळसर झालेले दिसतात व त्यामुळे अन्नपोषणात अडथळा येऊन झाड मरते. हे कवक मृदेत असते व मुळावाटे वाहकवृंदात प्रवेश करते. रोगनिर्मूलनासाठी मर-प्रतिकारक वाणांची लागवड करावी लागते. असे कार्य दिल्ली, उत्तर प्रदेश व पंजाब येथे झाले असून आर. आर. ९, के–२ हे तांबेरा-प्रतिकारक व मर-प्रतिकारक वाणे उत्तर प्रदेशात व पंजाबात शोधून काढली आहेत.

कुलकर्णी, य. स.

कीड : पाने खाणाऱ्या अळ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, उंट अळ्या, मावा, पिवळी कीड (डॅसीन्यूरा लायनाय ) वगैरे कीटकांचा अळशीला उपद्रव होतो.

दोरगे, सं. कृ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

           2. Indian Oilseed Committee, Linseed Monograph, Hyderabad. 1962.

अळशी : (१) पाने व फुलोरा यांसह फांदी (पानांवरील ठिपके तांबेऱ्याचे), (२) फूल, (३) पक्व गोड, (४) बिया.