अहिराणी : महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांत बोलली जाणारी ही एक भारतीय आर्य बोली आहे. तिला ‘खानदेशी ’ ही म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली ग्रीअर्सन- च्या मते एक भिल्ली बोली असून, त्याने लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या नवव्या खंडाच्या तिसऱ्या भागात इतर भिल्ली बोलींबरोबर ती दिली आहे. भारतीय जनगणनेच्या भाषाविषयक खंडातही अजूनपर्यंत हीच प्रथा पाळण्यात आलेली आहे.

अहिराणीची काही वैशिष्ट्ये मराठीहून पूर्णपणे भिन्न असून काही बाबतींत ती मराठीशी व काही बाबतींत गुजरातीशी मिळती आहे. यात आश्चर्य वाटण्यासारेख काही नाही कारण या दोन मोठ्या भाषांच्या दरम्यान पसरलेली ही एक संक्रमक बोली आहे. तिच्यात आढळणारे अनेक संस्कृतेतर शब्द खानदेशी लोक पूर्वी कोणती तरी आर्येतर (उदा., ऑस्ट्रिक वंशीय) भाषा बोलत असावेत असे दर्शवतात.

अहिराणी-भाषिकांची संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ३,६७,४७२ होती. पण हा आकडा ग्राह्य मानता येत नाही, कारण घरात अहिराणी बोलणारे सुशिक्षित लोक आपली भाषा मराठी आहे असे सांगतात. त्यामुळे अहिराणी बोलणारे लोक बरेच अधिक असावेत असे वाटते.

अहिराणीचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे करता येईल :

ध्वनिविचार :

स्वर —    अ, आ, इ, उ, ए, ओ.

व्यंजने — क, ख, ग, घ, ङ्, ह.

च, ज, झ, य, श.

ट, ठ, ड, ढ, र, ऱ्ह.

त, थ, द, ध, न, ल, स.

प, फ, ब, भ, म, म्ह, व, व्ह.

(म्ह, ऱ्ह, व्ह ही संयुक्त व्यंजने नसून ध, भ इत्यादींप्रमाणे साधी महाप्राण व्यंजने आहेत).

रूपविचार : अहिराणीत शब्दांचे पाच वर्ग आहेत : नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, अव्यये. अव्यय-वर्गात क्रियाविशेषणे, उभयान्वयी अव्यये व उद्गारवाचके यांचा समावेश होतो.

(अ) नामे : सामान्य नाम—प्रत्येक नाम पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी, एकवचनी किंवा अनेकवचनी असते. नामाचे सामान्यरूप होत नाही. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी एकवचनात नाम विकाररहित असते. अनेकवचनात ते लागण्यापूर्वी नामाला स हा प्रत्यय लागतो.

पुल्लिंगी स्वरान्त नामाचे अनेकवचन एकवचनाप्रमाणेच असते (कुडता—कुडता, धोबी—धोबी, भाऊ—भाऊ, रेडिओ—रेडिओ), तर व्यंजनान्त नामांत काहींचे एकवचनाप्रमाणे, काहींचे ए हा प्रत्यय व उरलेल्यांचे अ हा प्रत्यय लागून होत (साप—साप, मानूस—मानशे, उंदीर—उंदरे).

स्त्रीलिंगी स्वरान्त नामांचे अनेकवचन आ हा प्रत्यय लागून होते (जागा—जागा, बाई—बाया, सासू—सास्वा), तर व्यंजनान्त नामांत काहींचे आ व इतरांचे ई हा प्रत्यय लागून होते (साय—साया, भीत—भिती).

नपुंसकलिंगी स्वरान्त नामांचे अनेकवचन शेवटी अ असल्यास आ हा प्रत्यय लागून (टोपलं—टोपला) आणि ऊ असल्यास तो तसाच ठेवून होते (निंबू—निंबू).

नामाचे मूळ रूप व त्याचे अनेकवचन कर्ता किंवा प्रत्यक्ष कर्म म्हणून वापरले जाते (दगड फुटना— ‘दगड फुटला’, झिप्रू दगड फेकस—‘झिप्रू दगड फेकतो’). इतर ठिकाणी संबंधदर्शक असे शब्दयोगी अव्यय नामाला जोडले जाते.

(आ) सर्वनामे : ए.व. अ.व.
आपु, आपुन, ‘आपण’
द्वि.पु. तू तुमी, तुमू
तृ.पु. तो } त्या
ती
ते

प्रत्ययपूर्व रूपे–‘मी’ चे म–मा– ‘तू’चे तु– ‘तो’ व ‘ते’चे त्या–, ‘ती’चे ति– अनेकवचनात ‘आमी’चे आम–, आमुन– ‘आपु’चे आप-, आपुन ‘तुमी’चे तुम- ‘त्या’चे (पु.न.) त्यास–, (स्त्री.) त्यास–, तिस– (संबंधवाचक) जो, जे, जी. अनेकवचन व प्रत्ययपूर्व रूपे तो, ती, ते यांच्या धर्तीवर.

(प्रश्नार्थक) व्यक्तिवाचक : ए.व. कोन, अ.व. कोन, प्रत्ययपूर्व रूप ए.व. कोन, अ.व. कोनास–

(वस्तुवाचक) काय, प्रत्ययपूर्व रूप कसा–

(दर्शक) दूरचे : तो, ती ते जवळचे : हौ, है, है.

प्रत्ययपूर्व रूप (पु.न.) ह्या-अ.व. ह्यास-, (स्त्री.) हि-अ.व. ह्यास–.

(इ) विशेषणे : विशेषणे दोन प्रकारची आहेत. पुल्लिंगात एकवचनी आकारान्त असणारी विशेषणे स्त्रीलिंगात ईकारान्त व नपुंसकलिंगात अकारान्त होतात. सर्वांचे अनेकवचन मात्र आकारान्तच असते. व्यंजनान्त, ईकारान्त व उकारान्त विशेषणे लिंगवचनाप्रमाणे बदलत नाहीत.

(ई) क्रियापदे : मराठीप्रमाणेच आज्ञार्थाचे एकवचनाचे रूप धातू मानता येईल. आज्ञार्थाचे अनेकवचन ‘आ’ प्रत्यय लागून होते : बोल-बोला. बोल या नियमित धातूची रूपे पुढीलप्रमाणे होतात :

वर्तमान काळ भविष्य काळ *भूत काळ
ए.व. ए.व. ए.व.
१. मी बोलस बोलसू बोलनू, (स्त्री.) ०नी
२. तू    ,, बोलसी (पु.) बोलना, (स्त्री.)    ,,
३. तो. इ.,, बोली (पु.)     ,, (स्त्री.)     ,,
(न.) बोलनं
अ.व.. अ.व. अ.व
१.  आमु बोलतस बोलसूत बोलनूत
२.   तुमु     ,, बोलशात (पु.) बोलताना, (स्त्री.) ०न्यात
३.   (पु.न.) ,, बोलतीन    (पु.न.) बोलताना, (स्त्री.) ०न्यात
 (स्त्री.) बोलतीस
* दुसरा एक भूतकाळ न हा प्रत्यय न लागता होतो

वरील थोड्याशा वर्णनावरून अहिराणी मराठीहून किती वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे ते दिसून येईल. केवळ उच्चारापुरते पाहिल्यास मराठीत ज्या ठिकाणी ळ असतो, तिथे अहिराणीत य आहे (सकाय–‘सकाळ’, धुयं–‘धुळं’), ‘छ’ व ‘ण’ ही व्यंजने नाहीत. रूपविचारात मराठीतील, -ला या प्रत्ययाऐवजी –ले हा प्रत्यय आहे. याशिवाय मराठीला अपरिचित असे-से, -पाईन, -थीन, -जोडे इ. प्रत्ययही आहेत. शब्दसंग्रहात आंडोर ‘मुलगा’, झोऱ्या ‘सतरंजी’, वडांग ‘कुंपण’ यांसारखे अनेक अपरिचित शब्द आहेत.

एखाद्या बोलीच्या भाषिक वैशिष्ट्यांप्रमाणेच ती बोलणाऱ्या लोकांच्या भावनेवरूनही तिचे वर्गीकरण करता येते. त्यामुळे अहिराणीला मराठीची बोलीच म्हणावे लागेल.

साहित्य : अहिराणीत लिखित साहित्य नाही. पण मराठीच्या इतर बोलींप्रमाणे लोकसाहित्य भरपूर आहे. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य मंडळाने त्यातील काही प्रकाशात आणले आहे. प्रा. स. शं. माळी तिचा शब्दकोश तयार करीत असून त्यांनी अहिराणीत बरेच काव्यलेखनही केले आहे.

नमुना : यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याना शेपले मुडना काटा. तो सांगे, ‘नाइभाऊ, नाइभाऊ, मना काटा काड दे.’ ‘नै भाई,’ म्हने, ‘मी काय तुना काटा काडत नै’ म्हने. ‘नै रे भाऊ’ म्हने, ‘तसे कोठे होवाल ग्ये का’ म्हने. ‘काड त खरी काटा’ म्हने. ‘मङ’ म्हने, ‘आते हट्ट धरस. काडू दे’ म्हने,‘याना काटा काडू दे.’

भाषांतर : एक होता सरडा. तो फिरायचा कुंपणाकुंपणावर. त्याच्या शेपटीत मोडला काटा. तो म्हणायला लागला, ‘न्हावीदादा, न्हावीदादा, माझा काटा काढून दे.’ ‘नाही बाबा’ (न्हावी) म्हणाला, ‘मी काही तुझा काटा काढत नाही’ म्हणाला.‘नाही रे बाबा’ (सरडा) म्हणाला, ‘तसं कुठे झालंय का’ म्हणाला. ‘काढ तर खरं काटा’ म्हणाला.‘मग’ (न्हावी) म्हणाला, ‘आता हट्ट धरतोस. काढू दे’ म्हणाला, ‘ह्याचा काटा काढू दे.’

संदर्भ : Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vols. VII, IX part III, Delhi, 1968.

चिटणीस, विजया