अस्मारा : ईथिओपिया देशाच्या एरिट्रीया प्रांताची व दुसऱ्या महायुद्धापूर्वीची इटलीच्या वसाहतीची राजधानी. लोकसंख्या १,७८,५३७ (१९७१). ईशान्य आफ्रिकेतील, तांबड्या समुद्रालगतच्या हामसेन पठारकिनाऱ्यावर, समुद्रसपाटीपासून ३,२१६ मी. उंचीवर हे शहर वसले असून येथील हवामान समशीतोष्ण आहे. जवळच सोने व तांबे यांच्या खाणी आहेत. येथून ६४ किमी. असलेल्या मसावा या बंदराशी हे सडकेने व लोहमार्गाने जोडलेले असून, हे रस्ते अतिशय नयनमनोहर प्रदेशातून जातात. येथून अदिस अबाबा व पोर्ट सूदानपर्यंतही रस्ते आहेत. येथे मोठा विमानतळ आहे. सुमारे निम्मी लोकवस्ती ख्रिश्चन आहे. येथे भव्य चर्च व मशिदी आहेत. हे व्यापारी केंद्र असले तरी शहराच्या आसपासचा प्रदेश रूक्ष आहे. मांस डबाबंद करणे, कातडी कमाविणे, लाकूड कापणे, सुगंधी द्रव्ये बनविणे इ. अनेक छोटे उद्योगधंदे येथे असून, तांत्रिक व व्यवसाय शाळा, शेती संशोधनकेंद्र, प्रेक्षागार, नभोवाणी-केंद्र व चित्रपटगृहे आहेत. सत्तर वर्षांपूर्वी लहानसे खेडे असलेल्या या ठिकाणाचे स्वरूप इटालियनांनी बदलवून प्रवाशांसाठी ते एक आकर्षक स्थळ बनविले आहे.
लिमये, दि. ह.