सालीनास : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील माँटरे परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,५०,८९८ (२००८ अंदाज). माँटरे उपसागर किनाऱ्यापासून पूर्वेस काही अंतरावर, सालीनास खोऱ्यात हे वसले आहे. अमेरिकन संशोधक इलायस हो याने याची स्थापना केली.

एकेकाळी येथील बराचसा भाग लवणयुक्त पाणथळ स्वरूपात होता. त्याच संदर्भाने ‘सॉल्ट’ (मीठ) या स्पॅनिश शब्दावरून या ठिकाणाचे ‘सालीनास’ हे नाव पडले असावे (१८५६). इ. स. १८६८ मध्ये येथपर्यंत दक्षिण पॅसिफिक लोहमार्ग आल्यानंतर याच्या परिसरातील कृषिविकासास चालना मिळाली. तसेच सालीनास खोरे सुपीक व जलसिंचित असल्यामुळे ते लेट्यूस (सालीट), आर्टिचोक, सेलरी, अजमोदा, साखरबीट, भाजीपाला इ. कृषिउत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, खडीसाखर, जॅम, जेली इ. प्रक्रियाउद्योग येथे चालतात. १८७४ पासून येथे दरवर्षी उन्हाळ्यात ‘द कॅलिफोर्निया रोडेओ’ हा महोत्सव होत असतो. हार्टनेल महाविद्यालय (स्था.१९२०), द सालीनास व्हॅली म्यूझीयम, यूथ सायन्स सेंटर येथे आहे. सालीनास ही ⇨ जॉन स्टाइनबेक या प्रसिद्घ अमेरिकन साहित्यिकाची जन्मभूमी असून येथील परिसराचे वर्णन त्याने मुख्यतः आपल्या ईस्ट ऑफ एडन (१९५२) या कादंबरीत केलेले आढळते. त्याचे येथेच दफन करण्यात आले असून त्याचे घर लोकांना पाहण्यासाठी खुले ठेवले आहे.

कुंभारगावकर, य. रा.