अँथ्रॅकोलिटिक संघ : भौगोलिक परिस्थितीत विशेषसे फेरफार न होता, गाळ अखंड साचत राहून तयार झालेल्या कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) व पर्मियन (सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातल्या थरांच्या राशी कित्येक प्रदेशांत आढळतात. त्यांच्यातील कार्‌बॉनिफेरसचे खडक कोठे संपतात व पर्मियनचे कोठे सुरू होतात हे काटेकोरपणे सांगता येत नाही. म्हणून कार्‌बॉनिफेरस व पर्मियन मिळून झालेला अँथ्रॅकोलिटिक नावाचा एकच संघ मानावा, असे डब्ल्यू. वॅगनर यांनी सुचविले होते (१८९१). भारतातील जीवाश्मांचे (जीवांच्या अवशेषांचे) वर्णन करताना सी. डीनर यांनीही ती संज्ञा वापरलेली आहे. काश्मीर, स्पिटी, उत्तर हिमालय व ब्रह्मदेशातील शान संस्थाने यांच्यातील सागरी शैलसमूहांत या संघाची उदाहरणे सापडतात.

केळकर, क. वा.