अपृष्ठवंशी : पृष्ठवंश (पाठीचा कणा) नसणाऱ्या कोणत्याही प्राण्याला ‘अपृष्ठवंशी’ म्हणतात. अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणिसृष्टीचा एक नैसर्गिक विभाग नाही. पृष्ठवंश असणाऱ्या प्राण्यांखेरीज एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या सगळ्या प्राण्यांचा अपृष्ठवंशीसमूहात समावेश होतो. प्रोटोकॉर्डेटासारख्या काही समूहांतील प्राण्यांमध्ये पृष्ठवंश नसतो, पण पृष्ठवंशी प्राण्यांशी त्यांचे वांशिक संबंध असल्यामुळे या सगळ्यांना ⇨कॉर्डेटा संघात स्थान दिले आहे. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या संघांचे परस्पर संबंध मुळीच स्पष्ट नाहीत. अपृष्ठवंशी समूहाची निदान-लक्षणे काहीही नाहीत कॉर्डेटा संघाच्या लक्षणांचा अभाव हेच यांचे मुख्य लक्षण होय. यांना पृष्ठवंश नसतो, केंद्रीय ⇨तंत्रिका तंत्र असलेच तर ते अधर भागात असते आणि ते पृष्ठीय पोकळ नळीच्या स्वरूपाचे केव्हाही नसते जलचर प्राण्यांच्या बाबतीत ग्रसनीय क्लोम-दरणे (तोंडात घेतलेले पाणी घशातून कल्ल्यांवाटे बाहेर टाकण्याचे फटीसारखे मार्ग) केव्हाही नसतात.
पहा: प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग.
कर्वे, ज. नी.