अपस्मार : (मिरगी). वारंवार बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या चिरकारी (दीर्घकालीन) रोगाला ‘अपस्मार’ किंवा ‘फेपरे’ असे म्हणतात. या रोगात झटके येण्याची प्रवृत्ती असते. सौम्य प्रकारात झटके येत नसले तरी बेशुद्धी असते.
झटके व बेशुद्धी या गोष्टी अनेक रोगांत दिसतात. काही विषांची बाधा मेंदूमधील रक्त्तस्राव, मूत्रविष – रक्त्तता (मूत्रपिंडाचे नेहमीचे कार्य तीव्रतेने बिघडल्यामुळे शरीराबाहेर टाकले जाणारे पदार्थ तसेच रक्त्तात रहाणे), संकंप (स्नायूंमध्ये अधूनमधून वेदनायुक्त्त पेटके येणे हे लक्षणे असलेली एक अवस्था), मुडदूस, गर्भिणी-विषबाधा, मेंदूतील उपदंशजन्य विकृती व उन्माद वगैरे रोगांत ही लक्षणे दिसत असली तरी त्यांचा ‘अपस्मार’ या संज्ञेत अंतर्भाव होत नाही.
प्रकार : अपस्माराचे दोन मुख्य प्रकार आहेत. एका प्रकाराला ‘लाक्षणिक अपस्मार’ असे म्हणतात. जन्मापूर्वी, जन्मवेळी किंवा जन्मानंतर झालेल्या इजेमुळे मेंदूच्या विशिष्ट भागात उत्पन्न झालेली विकृती, मस्तिष्कार्बुद (मेंदूतील गाठ) वगैरेंमुळे मेंदूतील कोशिकांचा (पेशींचा ) मधूनमधून क्षोभ झाल्यामुळे झटके व बेशुद्धी येते. हे झटके शरीराच्या विशिष्ट भागापुरतेच मर्यादित असतात किंवा त्या भागात प्रथम उत्पन्न होऊन नंतर सर्व शरीरभर पसरतात. या प्रकाराला त्याचे प्रथम वर्णन करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या नावावरून ‘जॅक्सोनियन अपस्मार’ असे म्हणतात. काही मानसिक विकारांतही असे झटके व बेशुद्धी येते. या प्रकारात भावनिक उद्रेकामुळे झटके येतात. त्याला ‘मन:कायिक अपस्मार’ असे म्हणतात.
दुसऱ्या प्रकारच्या अपस्मारात मेंदूमध्ये किंवा तंत्रिका (मज्जातंतू) तंत्रात विकृती आढळून येत नाही. या प्रकाराला ‘अज्ञातहेतुक अपस्मार’ असे म्हणतात. हा प्रकार बहुधा वयाच्या पाच ते दहा वर्षांच्या सुमारास प्रथम सुरू होतो. क्वचित वीस वर्षांच्या पुढेही सुरू झाल्याची उदाहरणे दिसतात. हा प्रकार, निदान त्याची प्रवृत्ती तरी, आनुवंशिक असते असे मानण्यात येते.
‘अज्ञातहेतुक अपस्मार’ चे दोन प्रकार पोटप्रकार आहेत. त्यांना अनुक्रमे ‘क्षुद्रापस्मार’ व ‘बृहदपस्मार’ असे म्हणतात.
क्षुद्रापस्मार : या प्रकारात झटके येत नाहीत पण निमिषमात्र का होईना बेशुद्धी येते. काही काम करीत असता रोग्याचा चेहरा एकाएकी शून्यवत दिसतो. हातात असलेला पदार्थ पडतो. रोगी नकळत काही हालचाल करतो. थोड्याच वेळानंतर तो शुद्धीवर येऊन काही विशेष न झाल्यासारखे हातातील काम पूर्ववत करू लागतो.
बृहदपस्मार : या प्रकारात रोग्याला झटके येतात पण त्यापूर्वी त्याला काही विशिष्ट संवेदना होतात. डोळ्यापुढे झगझगीत प्रकाश दिसणे, कानांत विशिष्ट आवाज होणे, किंवा चमत्कारिक वास येणे, अथवा एखाद्या स्नायूचे निष्कारण स्फुरण होणे अशी लक्षणे होतात. त्यांना ‘पूर्वदेश’ असे म्हणतात.
पूर्वादेशाच्या मागोमाग सर्वांगातील स्नायू ताठ होऊन रोगी उभा किंवा बसलेला असल्यास जमिनीवर आडवा पडतो बहुधा जीभ चावली जाते, पडताना अस्थिभंगादी इजा होण्याचा संभव असतो. प्रथम चेहरा पांढरा फटफटीत पडतो, पण थोड्याच वेळात श्वसनस्नायूंच्या आकुंचनामुळे श्वास बंद पडून चेहरा काळानिळा पडतो. स्वरयंत्रातील स्नायूंच्या आकुंचनामुळे सुरुवातीसच रोगी मोठ्याने ओरडल्यासारखा आवाज येतो. त्याच्या तोंडाला फेस येतो. जीभ चावली गेल्यास तो फेस रक्त्तरंजित असतो. विशेष तीव्र प्रकारात मल–मूत्र- -विसर्जन होते. रोगी पूर्णपणे बेशुद्ध असतो. अग्नीजवळ असल्यास भाजणे किंवा पाण्यात पडल्यास बुडणे हेही शक्य असते. प्रथम ताठ असलेले स्नायू सैल सुटून त्यांचे आकुंचन–प्रसरण सारखे होत राहिल्यामुळे सर्व शरीरीला आचके येत राहतात. काही वेळाने आचके कमी होऊन रोग्याला गाढ झोप लागते. जागे झाल्यावर त्याला झालेल्या प्रकाराची आठवणही राहत नाही.
हे झटके काही सेकंदांपासून कित्येक मिनिटांपर्यंत टिकतात. दिवसा व रात्री झोपेतही येतात. झटके दिवसातून किती वेळा येतील, याचा नेम नसतो. उलट कित्येक महिनेही झटक्यावाचून जाऊ शकतात. काही वेळा ते एकामागून एक असे अनेक वेळा येत राहतात. या अवस्थेला ‘सतत अपस्मारावस्था’ असे म्हणतात. योग्य न उपचार झाल्यास ही अवस्था मारक ठरू शकते.
निदान : विशिष्ट प्रकारचे झटके व बेशुद्धी वगैरे लक्षणांवरून निदान कठीण नाही पण त्याच्या प्रकाराचे व्यवच्छेदक निदान करणे मात्र कठीण आहे. त्याकरिता विद्युत् मस्तिष्कालेखाचा [→ विद्युत् मस्तिष्कालेखन] फार चांगला उपयोग होतो. या आलेखात मेंदूमधील विद्युत् वर्चसात (विद्युत् स्थितीमध्ये) विशिष्ट बदल दिसून येतो. हा विशिष्ट बदल झटके किंवा बेशुद्धी नसतानाही दिसतो. त्यामुळे या रोगाच्या निदानास निश्चितता येऊ शकते. याशिवाय मस्तिष्कविवरात वायू भरून किंवा मस्तिष्करोहिणीमध्ये क्ष-किरणरोधी औषधे घालून क्ष-
-किरण-परीक्षा केली असता मेंदूच्या विशिष्ट भागातील विकृती ओळखता येते.
चि कित्सा : रोग्याने अग्नी, पाणी यांच्याजवळ एकटे जाऊ नये. मोटार हाकणे वगैरे टाळावे. जवळ नेहमी आपले नाव व व्यथा यांबद्दल माहिती बाळगावी, म्हणजे रस्त्यात किंवा अनोळखी जागी झटका आल्यास आजूबाजूची माणसे योग्य ती काळजी घेऊ शकतील. जीभ चावली जाऊ नये म्हणून दातांमध्ये रबर किंवा कपडा घालावा. सतत अपस्मारावस्थेसाठी त्वरित शामक औषधे देणे जरूर असते क्वचित संमोहनही (हिप्नॉसीस) करावे लागते.
अपस्मारासाठी अनेक औषधे वापरण्यात येतात पण कोणत्याही औषधाने रोग-निर्मूलन होत नाही. झटक्यांची संख्या व कालमान यांतच फक्त फरक करता येतो. ल्यूमिनॉल, डायलँटीन, ब्रोमाइड वगैरे औषधांचा या कामी उपयोग होतो.
ढमढेरे, वा. रा.
आयुर्वेदिय चिकित्सा : ज्या रोग्यांत एकदम स्मरण नाहीसे होते, बुद्धी व मन विकृत होतात, डोळ्यांपुढे एकदम अंधेरी उत्पन्न होऊन तोंड, हात, पाय यांच्या विकृत हालचाली उत्पन्न होतात आणि तोंडातून फेस येतो, त्याला ‘अपस्मार’ असे म्हणतात. त्याचे दोषांना अनुसरून चार प्रकार होतात.
उपचार : रोग्याला रक्त्तस्रुती करून आणि तीक्ष्ण वमन, विरेचन व नस्य देऊन त्याची शुद्धी करावी. वातापस्मारामध्ये बस्ती, पित्तापस्मारामध्ये विरेचन व कफापस्मारामध्ये वमन प्राधान्याने द्यावयाचे असते. पंचगव्यघृत, महापंचगव्यघृत, ब्राह्मी इत्यादिकांनी सिद्ध केलेले जुने तूप कूष्मांडघृतही पोटामध्ये घ्यावे. काळ्या कपिला गाईचे पित्त व कुत्रा, कोल्हा, मांजर, सिंह यांचे पित्त नाकात घालावे. मुंगूस, घुबड, मांजर, गिधाड, साप, कावळा यांची तोंडे पंख आणि मळ यांची धुरी द्यावी. लसूण तिळाच्या तेलाबरोबर, शतावरी दुधाबरोबर, ब्राह्मी, कोष्ठ, वेखंड यांचा रस मधाबरोबर दोषांचा विचार करून सतत सेवन करावी. रोग्याचा अग्नी, पाणी, खाचखळगे यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.
स्मृतिसागर व रौप्यभस्म ही शतावरीघृतातून सकाळी, संध्याकाळी, जेवण झाल्यावर व रात्री झोपताना द्यावी. मलावरोध असल्यास सुरवारी हिरडा गाईच्या तुपात तळून त्या तुपाबरोबर पोटात द्यावा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
पशूतील अपस्मार : स्नायूंची कंपने सुरू होऊन शरीराची विचित्र व अनैच्छिक हालचाल होताना बेशुद्धी येणे ह्या मेंदूच्या दीर्घकालिक विकाराला अपस्मार म्हणतात. याचे दोन प्रकार कल्पितात : (१) स्वनिर्मित (निज) व (२) कारणजन्य. काही तज्ञांच्या मते हा विकार आनुवंशिक असू शकतो. रोग मुख्यत: कुत्र्यांत होतो व कॉकरस्पॅनियल कुत्र्यांत विशेषेकरून आढळतो. पहिल्या प्रकारात भीती, मोठ्या जखमा, लैंगिक अस्वस्थता, तीव्र वेदना, कुत्र्याच्या खाद्यात जास्त प्रमाणात यकृताचे तुकडे येणे ही कारणे असू शकतात. मेंदूच्या शोथ (दाहयुक्त सूज) मेंदूवरील ग्रंथीची रोगट वाढ, मेंदूवर ताण व विषबाधा ह्या कारणांमुळे दुसऱ्या प्रकारचा विकार होतो. कुत्र्यांतील टिनीया एकिनोकॉकस व अस्कॅरीस डुकरातील एकिनोव्हिक्स गायगस, गाईतील टिनीया डेंटीक्युलेटा व घोड्यातील अस्कॅरीस मेगॅलोसिफेला या कृमींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास अपस्मर हा रोग होतो.
लक्षणे: रोगाच्या स्वरूपाप्रामाणे कमीअधिक प्रमाणात लक्षणे आढळतात. कुत्रा अस्वस्थ होऊन धावतो व मान हलवून जवळपासच्या वस्तू चावतो. घोडा मालकाचा आदेश न जुमानता स्वस्थ राहतो, मग संतापतो किंवा डोके हालवीत पायाने खाजवितो. डुक्कर धावत सुटते, जमीन उकरते व ओरडते. ही प्राथमिक लक्षणे विशेष लक्षात येत नाहीत पण तीव्र स्वरूपात जनावर एकदम अस्वस्थ बनते, जमिनीला खिळून, डोळे विस्फारित करून एकटक नजरेने राहते व नंतर स्नायूंचे कंपन सुरू होते, नाकपुड्या फुगवून कष्टाने श्वासोच्छ्वास घेऊ लागते, जागाच्या जागी डुलते, तोल संभाळण्यासाठी पाय मागेपुढे करते पण तोल जाऊन धाडकन जमिनीवर पडते. गाईम्हशी हंबरल्यासारखा मोठ्याने केकाटतात, शेळ्यामेंढ्या गोलाकार फिरू लागतात. कुत्रा धडपड करीत असताना पडला म्हणजे उठून एकदोन पावले टाकतो पण तोल जाऊन पुन्हा पडतो. पडलेल्या जनावरांचे पाय व मान ताठरलेली, चेहरा तारवटलेला व डोळ्यातील बुबुळे मोठी दिसतात. कान मागेपुढे हालत असतात, तोंडातून फेसाळ लाळ वाहते व जनावर खाली पडताना जिभेस जखम झाल्यास लाळ रक्त्तमिश्रित होते. स्नायूंचे शीघ्रकंपन झाले की, जनावर तडफडते. हृदयाचे ठोके जलद पडतात व नाडी कमजोर बनते. मानेच्या रक्त्तवाहिन्यांवर स्नायू-कंपनाचा ताण पडून डोळ्याची श्लेष्मकला (आतील त्वचा) निळसर दिसते. रोग्याला लघवी किंवा जुलाब होतात. विकार सेकंद किंवा काही वेळा १-२ मिनिटे टिकतो व हूळूहळू शारीरिक क्रिया पूर्ववत सुव्यवस्थित सुरू होतात.
चिकित्सा : बांधलेले जनावर ताबडतोब मोकळे करावे म्हणजे स्वत:ला जखमी करून घेणार नाही. कुत्र्याच्या डोक्यावर गार पाणी मारावे व शक्यतर त्याचे डोके मागील बाजूंनी धरून ठेवावे व कुत्रे शुद्धीवर आल्यावर त्याला इतर कुत्र्यांपासून व गर्दीपासून दूर करावे. लारगॅक्टिल व ब्रोमाइडे यांसारखी शामक औषधे काही काळ देत राहावे. औषधोपचाराने रोगनिर्मूलन अर्थातच होत नाही पण झटक्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
गद्रे, य. त्र्यं
“