पोर्टस्मथ-१ : इंग्लंडच्या हॅंपशर परगण्यातील प्रमुख शहर, बंदर व नाविक तळकेंद्र. लोकसंख्या १,९८,५०० (१९७६ अंदाज). हे लंडनच्या नैऋत्येस १०५ किमी. इंग्लिश खाडीत पोर्ट सी बेटावर वसले असून त्याची गणना जगातील सर्वांत मोठ्या नाविक तळांमध्ये होते. पोर्ट सी बेटाचे लष्करी महत्त्व लक्षात घेऊन पहिल्या रिचर्डने ११९४ मध्ये पोर्टस्मथची स्थापना केली. १२१२ मध्ये जॉन राजाने येथे गोदी बांधली. त्यानंतर १४९५ मध्ये येथे सातव्या हेन्‍रीने पहिली निर्जल गोदी बांधली. १९२६ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. दुसऱ्या महायुद्धात पोर्टस्मथची खूप हानी झाली. हे जहाजबांधणी उद्योगाचे केंद्र असून विमान, अभियांत्रिकी, कापडनिर्मिती, मद्यनिर्मिती इ. उद्योग येथे विकसित झाले आहेत. पोर्टस्मथचा दक्षिणेकडील साउथ सी हा भाग पुळणी, क्रीडामैदाने इत्यादींनी युक्त असल्याने पर्यटनस्थल म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. पोर्टस्मथमधील गिल्ड हॉल गोदीमध्ये ठेवलेली लॉर्ड नेल्सनची ट्रफॅल्गरच्या लढाईतील ‘व्हिक्टरी ही ध्वजनौका, प्रसिद्ध कांदबरीकार चार्ल्स डिकिन्झचे जन्मस्थळ, बाराव्या शतकातील कॅथीड्रल इ.पर्यटकांची आकर्षणे आहेत.

यार्दी, ह. व्यं.