अल्पाका : हा सस्तन प्राणी मूळचा अँडीज पर्वतातील असून उंटाच्या कुलातील आहे, पण याच्या पाठीवर मदार नसते. हा माणसाळलेला आहे. चिली, पेरू आणि बोलिव्हिया या देशांत ४,२५० ते ५,००० मी. उंचीवर असलेल्या अँडीज पर्वतावरील सपाट प्रदेशात यांचे मोठाले कळप पाळलेले असतात. खूप मोठ्या मेंढीशी याचे बरेच साम्य असले तरी याची मान लांब व ताठ उभी असते आणि डोके लांबट असते.
हे प्राणी लोकरीकरिता बाळगतात. त्यांच्या अंगावरील लोकर सु. ६०—६२ सेंमी. लांब असते. दर वर्षी तिची वाढ सु. २०-२१ सेंमी. होते व तितकीच दर वर्षी कापून घेतात. मेंढीच्या लोकरीपेक्षा हिचा धागा जाड, मजबूत, मऊ व चिवट असून त्याच्यावर एक प्रकारची चकाकी असते. लोकरीचा रंग पिवळसर तपकिरी, करडा, पांढुरका किंवा जवळजवळ काळा असतो. अल्पाकाच्या लोकरीचे कापड विणण्याचा उद्योग यूरोपात सुरू होण्यापूर्वी अनेक शतके पेरू देशातील इंडियन लोक या लोकरीचा कापड विणण्याच्या कामी उपयोग करीत असत. या कापडालाही ‘अल्पाका’ म्हणतात व त्याचा बराच खप असल्यामुळे इतर प्राण्यांच्या लोकरीपासूनदेखील हल्ली अल्पाकासारखेच कापड तयार करतात व ते अल्पाका म्हणून विकले जाते. पेरूमधून या लोकरीची दर वर्षी सु. २८ लक्ष किग्रॅ. निर्यात होते.
कर्वे, ज. नी.