अनाक्रमण–करार: दोन किंवा अधिक राष्ट्रांच्या सरकारांमधील परस्परांच्या इतर सोयींसाठी करण्यात येणारा आपसात सैनिकी आक्रमण न करण्याचा करार.
असा करार करण्यामागे परस्परांपुढील निकडीच्या अगर महत्त्वाच्या इतर अग्रहक्की समस्या सोडविण्यासाठी अथवा साध्ये साधण्यासाठी आवश्यक ती मोकळीक मिळावी म्हणून संभाव्य आक्रमणाचे संकट टाळून त्यापायी अनाठायी व डोईजड होणाऱ्या आर्थिक वा श्रमिक हानीची बचत करणे हा पूरक हेतू असतो.
अनाक्रमणाच्या करारामागे सहसा पुढील कारणे संभवतात : (अ) राज्यांतर्गत उपस्थित झालेली निकडीची समस्या जसे : बंडाळी, दुष्काळादी दैवी आपत्ती. (आ) राज्यसरकारने हाती घेतलेल्या दूरगामी वा अवजड योजनांच्या पूर्तीसाठी हवी असलेली मोकळीक. (इ) राज्याची आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक वा अन्यप्रकारे झालेली कोंडी. (ई) करारेच्छू राष्ट्रांना समशत्रूशी एकजुटीने टक्कर देण्याची जरूरी. (ए) युद्ध वा अन्य तयारीस हवा असलेला अवसर. (ऐ) एकाच वेळी अनेक शत्रूंशी संघर्ष साधण्यात होणारी कुचंबणा व कुतरओढ.
अनाक्रमणाचा करार यशस्वी होण्यास उभय राष्ट्रांना भासणारी कराराची जरूरी, त्यापासून मिळणारी मोकळीक, स्वास्थ्य, अवसर वगैरे सोयींची उपलब्धता आणि परस्पर-आक्रमणाची शक्यता व त्यामुळे उभयतांची होणारी संभाव्य गैरसोय ह्या मूलभूत उद्दिष्टांची परस्परांना वाटणारी तात्पुरती गरज महत्त्वाची असते.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या प्रारंभी हिटलरने स्टालिनशी अनाक्रमणाचा करार करून पश्चिम यूरोपवर हल्ला चढविला व नंतर तो करार मोडून रशियावरही हल्ला चढविला. पंडित नेहरू व लालबहादूर शास्त्री या भारताच्या दोन पंतप्रधानांनी अनाक्रमणाचा कायम करार करण्यासंबंधी तयारी दाखवूनसुद्धा पाकिस्तानने असा कायम करार करण्यास उत्सुकता दाखविली नाही.
पाटणकर, गो.वि.