अजगर:अजगर हा सगळ्यांत मोठा साप आहे. ⇨सरीसृपवर्गातील बोइडी कुलातल्या पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या उष्ण प्रदेशात तो आढळतो. ईजिप्तमधील  ⇨इओसीनकाळात तयार झालेल्या खडकात आढळलेलाजायगँटोफिसहा जीवाश्मी (अवशेषात्मक) अजगर १५ मी. लांब होता.

अजगराच्या पाठीवरचे शल्क (खवले) लहान आणि पुष्कळ असतातअधर (खालच्या) पृष्ठाच्या मध्य रेषेवर असणारे शल्क मोठे पण त्या पृष्ठाइतके रूंद नसून आखूड असतात. शेपटी आखूड असते. श्रोणी (कमरेच्या आत असलेली हाडे व त्यांनी वेढलेली पोकळी) आणि मागचे पाय यांचे अवशेष

अजगरांच्या जाती. (१) पायथॉन मोलुरस (भारत,सुमात्रा, जावा).

गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंना आढळतात. बहुतेक जातींच्या ओष्ठीय (ओठांवरच्या) शल्कांवर खळगा असतो. तापमानात पडणाऱ्‍या फरकाची दखल घेणे हे या खळग्याचे कार्य असावे असे दिसते. डोळे मांजरांच्या डोळ्यांसारखे असतात.

अजगरांच्या बऱ्याच जाती आहेत. पायथॉन रेटिक्युलेटस हा सर्वांत मोठा अजगर ब्रह्मदेश व इंडोचायनापासून फिलिपीन्स बेटांपर्यंत आढळतो त्याची लांबी १० मी. पर्यंत असते. पा.मोलुरस ही भारतातील सामान्य जाती सुमात्रा आणि जावामध्येही आढळते. पा. सेबी ही आफ्रिकेतील जाती सुमारे ६ मी. लांब असते. पा. रेजियस आणि पा. स्पायलोटिस या अनुक्रमे आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्‍या जाती दिसायला सुंदर असतात.

भारतीय अजगर सामान्यतः २․५-५ मी, लांब असतो, पण ७-८ मी. लांबीचे नमुनेही आढळतात. त्याचे शरीर बरेच अवजड असते. रंग फिक्कट पिवळा असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे साधारण चौकोनी सुंदर ठिपके असतात. डोक्यावर बाणाच्या आकृतीचा एक मोठा डाग असतो.

लहान खडकाळ टेकड्यांच्या उतरणीवर आणि नद्या व मोठे तलाव यांच्या आसपास तो आढळतो जंगलातही तो असतो. अजगराला वरचेवर तहान लागत असल्यामुळे पाण्याच्या जवळपास रहाण्याची त्याला जरूरी भासते.

पक्षी आणि हरणाएवढे सस्तन प्राणी यांवर तो आपली उपजीविका करतो ऑस्ट्रेलियातील अजगर सुसरींवरदेखील उपजीविका करतात.

अजगरांच्या जाती. (२) पायथॉन रेटिक्युलेटस (ब्रह्मदेश, इंडोचायना, फिलिपीन्स बेटे).

उंच झाडावरील फांदीला शेपटीने विळखे घालून शरीर लोंबकळत ठेवून तो भक्ष्याची अत्यंत जागरूकतेने टेहळणी करीत असतो. भक्ष्य आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याच्या अंगाभोवती विळखे घालून तो घट्ट आवळतो भक्ष्याच्या फुप्फुसावर आणि हृदयावर दाब पडल्यामुळे ते गुदमरून मरते नंतर खूप मोठा आ वासून तो ते हळूहळू गिळतो. अजगर विषारी नसतो. अचाट शक्ती असलेला हा प्रचंड साप सुस्त असून त्याच्या हालचाली मंद असतात. तो सहज माणसाळतो.

मादी दर खेपेला ८-१०० अंडी घालते आणि अंड्यांभोवती वेटोळी घालून ती उबविते व त्यांचे रक्षण करते. अंडी उबविण्याच्या काळात मादीच्या शरीराचे तापमान २-४ से. वाढते. पिल्लांची लांबी सुमारे ६० सेंमी असते.

अजगराच्या कातडीपासून उत्कृष्ट कमावलेले चामडे तयार करतात. अजगरांनी माणसे गिळल्याचे दाखले आहेत, पण थोडे उलट आशिया आणि आफ्रिका खंडांतील पुष्कळ लोक मात्र अजगर खातात.

संदर्भ: Ditmars, R. L. Snakes of the World, New York 1957.

कर्वे, ज.नी.