पुदुकोट्टई संस्थान : ब्रिटीशांकित हिंदुस्थानातील जुन्या मद्रास इलाख्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,०८·२४ चौ. किमी. लोकसंख्या ४,३८,३४८ (१९४१). वार्षिक उत्पन्न २८ लाख. पुदुकोट्टई या तमिळ शब्दाचा अर्थ नवा किल्ला असून त्यावरून संस्थानास हे नाव पडले. पश्चिमोत्तर तिरुचिरापल्ली, दक्षिणेस मदुराई, पूर्वेस तंजावर यांनी संस्थान सीमित झाले होते. रामनाडच्या सेतुपतींनी मदुराईच्या नायकांकडून जिंकलेल्या या प्रदेशावर सेतुपती रघुनाथ किळवनने मेहुणा रघुनाथ तोंडिमानला १६८० च्या सुमारास या संस्थानचा मुख्य नेमले. अठराव्या शतकातील कर्नाटक युद्धांत तोंडिमानाने इंग्रजांना फ्रेंचांविरुद्ध तसेच हैदर, मदुराई, तिनेवेल्ली, शिवगंगापांजालमकुरिचीचे पाळेगार या सर्वांविरुद्ध साह्य केले व तंजावरचा किलनेल्ली जिल्हा मिळवला. एकोणिसाव्या शतकात तंजावर, मदुराई व पुढे तिरुचिरापल्लीचा जिल्हाधिकारी हा या संस्थानचा पोलिटिकल एजंट असे. त्या शतकाच्या अखेरीस दिवाण सर ए. शेषय्यशास्त्रींनी शासनात बऱ्याच सुधारणा केल्या. वनसंरक्षण, जमिनीची पाहणी, पक्क्या सडका, रेल्वे, डाक, आरोग्य अशा क्षेत्रांत उत्तम प्रगती झाली. येथे संस्कृत पाठशाळांची खास व्यवस्था असून, शिक्षणावर सढळ खर्च होई. १९२४ पासून ५० सदस्यांचे (पैकी १५ नियुक्त) विधिमंडळ अस्तित्वात आले. शेवटचे संस्थानिक बृहदंबादास रोजगोपाळ तोंडिमान १९४४ मध्ये गादीवर आले. संस्थानचे स्वतःचे सैन्य व तांब्याची नाणी (अग्गम कास) होती. पुदुकोट्टई शहराव्यतिरिक्त ३७७ खेडी, कोळत्तूर, अलंगुडी तिरुमयम हे तीन तालुके संस्थानात होते. कल्लर जातीच्या या राजांची कुलदेवता बृहदंबा असून राजाचा वार्षिक तनखा सव्वा लाख होता. एकोणिसाव्या शतकात पुदुकोट्टई राजधानी नव्याने बांधली गेली व तिच्या सौंदर्यात विविध इमारतींनी भर पडली. ३ मार्च १९४८ रोजी संस्थान त्या वेळेच्या मद्रास (तमिळनाडूू) राज्यात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.