ॲरंडेल, रुक्मिणीदेवी : (२९ फेब्रुवारी १९०४–). भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका. मदुराई येथे जन्म. डॉ. जॉर्ज ॲरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आन्न पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्चे अध्ययन केले. भरतनाट्यम्च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती, त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६). थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली.
राज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ साली त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी ‘इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस’ची १९५७ त स्थापना केली. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. ‘ॲरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स’, मद्रास, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स’, लंडन ह्या संस्थांच्या संचालिका, ‘अनिमल वेल्फेअर बोर्ड’च्या अध्यक्षा, ‘इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन’, लंडन इत्यादींच्या उपाध्यक्षा आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील ‘डॉक्टरेट’ (१९६०), कलकत्त्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) ह्यांखेरीज ‘प्राणिमित्र’ पारितोषिक, भरतनाट्यम्साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले आहेत.
पार्वतीकुमार