अलखनामी पंथ : एक शैव धर्मपंथ. ‘अलखिया’ ही व्यापक संज्ञा असून ती परमेश्वराचे स्वरूप अगम्य व अगोचर आहे असे मानणाऱ्‍या सर्वांस लावली जाते. परंतु ‘अलखनामी’ ही संज्ञा⇨ दसनामी  गोसाव्यांतील ‘पुरी’ नावाच्या विभागाला, तर ‘अलखगीर’ ही संज्ञा त्यांतील ‘गिरी’ विभागाला लावली जाते.

 

परमेश्वराचे स्वरूप अगम्य व अगोचर आहे, हे पंथाचे प्रमुख तत्त्व असून अलखाच्या म्हणजे अलक्ष्य परमेश्वराच्या केवळ नामस्मरणातच त्याची उपासना साठवलेली आहे. पंथाचा संस्थापक बिकानेर येथील लाल नावाचा एक चांभार असून पुढे त्याच्या अनुयायांनी त्याला ‘लालगीर’ अशी पदवी बहाल केली. पंथियांचा वेश म्हणजे कांबळीचा लांब चोगा, डोक्यावर उंच निमुळती टोपी व भिक्षेसाठी हातात लांबट कटोरा असा असतो. ‘अलख कहो’ किंवा ‘अलख को जागो’ असा उद्‌घोष करून ते भिक्षा मागतात व उदरनिर्वाह करतात. भिक्षा मिळाली तर ठीक नाही तर ते भिक्षेसाठी पुढील घरी निमुटपणे निघून जातात.

 

पंथाला आधारभूत असलेली तत्त्वे केव्हा प्रस्थापित झाली व लालगीरचा निश्चित काल कोणता, यांबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. भक्तिमार्गाच्या सगुण उपासनेच्या विरोधी असे त्यांचे मत असल्याने मूर्तिपूजा त्यांना मान्य नाही. मद्य-मांस-सेवनास त्यांचा विरोध आहे. दानधर्म आणि संन्यस्तवृत्तीचा ते पुरस्कार करतात. पुनर्जन्मही त्यांना मान्य नाही. मृत्यूनंतर सर्वच संपते पापपुण्य, सुखदुःख इहजन्मीच भोगावयाचे असते, अशी त्यांची धारणा आहे आणि म्हणूनच विशुद्ध चारित्र्य, समबुद्धीने केलेले ईशचिंतन व शांतपणे जीवन जगणे ह्या गोष्टींचा ते पुरस्कार करतात.

 

सुर्वे, भा. ग.